राजेरजवाडे मुंबईत कुठे राहायचे माहित आहे का ? जाणून घ्या मुंबईतल्या ऐतिहासिक महालांबद्दल !!

मुंबईत तुम्ही हाजीअली दर्ग्याजवळ आलात की रस्त्याला तीन फाटे फुटतात.डावीकडचा रस्ता ताडदेवकडे म्हणजे मुंबईतल्या पहिल्या एअर कंडीशन्ड मार्केट कडे जातो.हे मार्केट आजही 'ताडदेव एसी मार्केट' याच नावानी ओळखले जाते . हाजीअलीपासून पुढे सरळ रस्ता जातो ज्याचं नाव आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख मार्ग पण हे नाव फक्त सरकार दरबारीच आहे. या रस्त्याची खरी ओळख पेडर रोड अशीच आहे.  या रस्त्याने पुढे गेलात तर डाव्या हाताला एक फाटा फुटतो त्याचं नाव आहे अल्टमाउंट रोड. त्या अगोदर डाव्या बाजूला एकेकाळी कॅडबरी हाउस होते. पुढे गेलात तर लता मंगेशकर यांचे निवास स्थान 'प्रभूकुंज ' आहे. प्रसिध्द उद्योगपती सज्जन जिंदल यांचा जिंदल मॅन्शन आहे. 

स्रोत

पण मंडळी या रस्त्याला न जाता हाजी अलीवरून उजव्या हाताला जो रस्ता आहे तिकडे गेलं तर तुम्ही थोड्याच वेळात नेपीअन सी रोडला पोहचाल. पेडर रोडवर अतीश्रीमंतांची वस्ती आहे पण हे सगळे "नीओ रिच", नव्याने श्रीमंत झालेल्यांची वस्तीस्थान समजले जाते. 

हाजीअलीजवळ उजवं वळण -गामडीया रोड- आत घेऊन गेलो तर आपण पोहचतो अती अती श्रीमंतांच्या वस्तीत ! या लोकांना अल्ट्रा हाय नेटवर्थ इन्डिविज्युअल असं म्हटलं जातं.

जर खानदानी गर्भश्रीमंत कुबेरांची वस्ती कुठली म्हणाल तर ही आहे. मलबार हील, नेपीअन सी रोड, वॉर्डन रोड, लिटल गिब्ज रोड , ब्रिच कँडी हाच तो परीसर जिथे एकेकाळी राजे महाराजे संस्थानीकांचे महाल होते. त्याची कारणंही तशीच होती . एकतर हा इलाका समुद्राच्या किनार्‍याला लागून आहे आणि दुसरे कारण असे की इथेच मुंबईचा गव्हर्नर रहायचा. गव्हर्नरासोबत उठबस करणारे राजे रजवाडे त्याच्या शेजारी राहणं पसंत करायचे. या गव्हर्नराच्या घराच्या आसपास बंगला बांधणे ही खरी श्रीमंती समजली जायची. 

स्रोत

आपण ज्याला राजभवन म्हणजे राज्यपालांचे निवासस्थान म्हणून ओळखतो ते एकेकाळी मुंबईच्या गव्हर्नराचे निवासस्थान होते.गव्हर्नराचे मूळचे घर पूर्वी परळला , हाफकीन इंस्टीट्यूट आहे त्या जागेवर होते. या भागातल्या रोगराईला कंटाळून गव्हर्नर इथे राहणं टाळायचे त्यातच १८८४ साली फर्ग्युसन नावाच्या गव्हर्नराची पत्नी कॉलर्‍यानी मरण पावली आणि गव्हर्नराचे निवास स्थान मलबार हीलवर हलवण्यात आले.

चला, आज बोभाटाच्या माध्यमातून एक फेरी मारू या या ऐतिहासिक रस्त्यावर !!!

पहिल्यांदा जाऊ या ब्रिच कँडी रोडवर अमेरीकन वकीलातीच्या  'लिंकन हाऊस ला" ! लिंकन हाऊस हे नाव देण्यापूर्वी ही इमारत गुजरातमधील वांकानेरच्या महाराजांचा महाल -वांकानेर हाऊस -म्हणून ओळखली जायची. संस्थाने खालसा झाल्यावर कर भरण्यासाठी महाराजांनी ही इस्टेट अमेरीकन वकीलातीला १९५७ साली  १८ लाख रुपयांना विकली होती. 

स्रोत

२०१५ साली अमेरीकन वकीलात बांद्रा कुर्ला काँप्लेक्स मध्ये हलवल्यावर अमेरीकन सरकारने लिंकन हाऊस सायरस पूनावाला या उद्योगपतींना ७५० कोटी रुपयांना विकली. दोन एकराच्या प्लॉटवर ५०००० चौरसफूटांची ही इमारत आता सायरस पूनावाला यांचे निवासस्थान आहे.

आज इतकंच पुरेसे आहे. पुढच्या भागात आपण जाऊ सिंदीयांच्या समुद्र महल-होळकर पॅलेस आणि  निजामाच्या हैद्राबाद इस्टेटला भेट द्यायला !!!

सबस्क्राईब करा

* indicates required