११,४०० कोटींचा घोटाळा करणारा निरव मोदी आहे तरी कोण?

आता पर्यंत विजय मल्ल्या हे नाव आपल्या चांगल्या परिचयाचे झाले आहे पण काल आपल्याला कळलेच असेल की निरव मोदी नावाच इसम मल्ल्याचाही बाप आहे .निरव मोदी नाव तुमच्या आमच्या ओळखीचे असण्याची शक्यता फारच कमी आहे. पण मुंबईच्या हिरे व्यापार्‍यांमध्ये हे नाव जणू एखाद्या देवाचे नाव असावे अशा आदराने घेतले जाते. घेतले जायचे असेही म्हणायला हरकत नाही कारण त्यांनी ११,४०० कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याची माहिती काल खुद्द त्यांच्या बँकेने जाहीर केली आहे. कोण आहेत हे निरव मोदी ? हे जाणून घेण्याआधी आपण मुंबईत हिर्‍यांचा व्यापार कसा चालतो हे आधी बघू या  !

मुंबईत हिर्‍यांचा ९०% अधिक व्यापार एका विशिष्ट गुजराती वर्गाकडे आहे ज्यांना "पालणपूरी जैन"  म्हणून ओळखले जाते.  हा एक बंदीस्त असा गुजराती समाज आहे. यांचे सर्व सामाजिक आणि आर्थीक व्यवहार आपापसातच चालतात. या समाजाचे लोक पिढ्यानपिढ्या हिरे घासण्याचे आणि पैलू पाडण्याचे काम करायचे. १९७० च्या नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर यांच्या कामाची मागणी वाढली आणि यांच्या कुटुंबांनी अँटवर्प येथे स्थलांतर करायला सुरुवात केली. सुरुवातीला हिर्‍यांचे अ‍ॅसॉर्ट्मेंट आणि पॉलीशींग करताकरता त्यांनी अँटवर्पची बाजारपेठच ताब्यात घेतली. त्यानंतर अँटवर्प मधून कच्चे हिरे भारतात पाठवायचे आणि भारतात अ‍ॅसॉर्ट्मेंट -कटींग आणि पॉलीशींग करून हिरे पुन्हा अँटवर्पला पाठवायचे असा व्यापार सुरु झाला. या व्यवहारत त्यांना एक्स्पोर्ट क्रेडीट मिळायचे आणि आयकरातून १००% सूटही मिळायची. साहजीकच ८०च्या दशकात आधीच सधन असलेला हा समाज अति श्रीमंत झाला.

कट्टर जैन धर्मीय असल्याने या समाजाला पैशाच्या सोबत येणार्‍या चंगीभंगीपणाचा किंवा व्यसनांचा वाराही लागला नाही आणि यांची पत बॅकांमध्ये वाढतच गेली. विश्वसनीयता म्हणजे पालणपूरी जैन असे समिकरण बँकींग विश्वात तयार झाले . या समाजाला कर्ज देण्याची स्पर्धा बँकांमध्ये सुरु झाली. सुरुवातीला ग्रिंडलेज -एबीएन अ‍ॅम्रो या बँकाच्या मध्यस्थीने सर्व व्यवहार चालायचे पण या व्यवहारातला नफा डोळ्यात आल्यावर आपल्या राष्ट्रीयकृत बँकांनी विदेशात शाखा उघडून यांना इंटर्नॅशनल लेटर ऑफ क्रेडीट द्यायला सुरुवात केली.थोडक्यात सांगायचे झाले तर अब्जावधी रुपयांचा व्यवहार स्वतःचा एकही रुपया न गुंतवता केवळ विश्वसनीयता या एका चलनावर करून हा समाज अति अति अति श्रीमंत झाला. सोबत या समाजाला एक नवीन व्यसन लागले ते म्हणजे आपली श्रीमंती मिरवण्याचे आणि श्रीमंती मिरवून स्वतःची पत वाढवण्याचे. उदाहरणार्थ, ब्रेबॉन स्टेडीयमवरती लग्न समारंभ आणि नवरदेवाचे हेलिकॉप्टरने आगमन असे प्रकार यांच्या समाजात सुरु झाले. निरव मोदी या समाजापैकीच एक !

 

आता बघूया हा घोटाळा कसा झाला असेल !

स्रोत

आपण आधी वाचलंच असेल की बँका अतिशय स्पर्धात्मक व्याजाच्या दराने लेटर ऑफ क्रेडीट या हिरे व्यापाऱ्यांना देतात. लेटर ऑफ क्रेडीट (एलसी) देण्यासाठी बँकांना एकही रुपयाचा खर्च येत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकेची पत हे एकच चलन या ठिकाणी वापरले जाते. अश्या एलसी ला वेळच्यावेळी निवृत्त करणे ही एकच जबाबदारी हिरे व्यापाऱ्यांवरती असते. बँकिंग क्षेत्रामध्ये लेटर ऑफ क्रेडीट सोबत लेटर ऑफ कम्फर्ट- लेटर ऑफ अंडरटेकिंग असे अनेक प्रकार आहेत. फरक इतकाच की एलसी डिस्कउंट करता येते (निगोशिएबल इंस्ट्रूमेंट) आणि त्याचे रुपांतर पैश्यात करता येते. धूर्त व्यापारी दर तीन महिन्यांनी पूर्ण होणाऱ्या नवीन नवीन एलसी काढून दिलेल्या कर्जाची पूर्ती करत राहतात. बँकांचे पैशे गुंतलेले नसल्यामुळे बँका पण अश्या गैरव्यवहाराकडे कानाडोळा करतात. निरव मोदींच्या कंपनीने एलसी ऐवजी खोट्या (?) लेटर ऑफ अंडरटेकिंगचा वापर करून अधिकाधिक पैसे जमा केले.

निरव मोदी कसे फसले असावेत.

उपलब्ध माहिती प्रमाणे निरव मोदी कसे फसले असतील याचा आपण अंदाज करू शकतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हिऱ्यांचा (म्हणजेच डॉलरचा) भाव सतत वाढतच राहील. या अनुमानाने २०११ पासून निरव मोदींनी बँकांकडून पैसे उधार घ्यायला सुरुवात केली असावी. २०११ ते १५ दरम्यान हा तर्क खरा ठरून निरव मोदींनी भरपूर फायदा करून घेतला असावा. रघुराम राजन यांच्या कारकिर्दीत डॉलरचा भाव अचानक कमी झाला आणि दिल्या घेतल्या पैश्यांमध्ये मोठी तफावत निर्माण झाली असावी. हे पैसे चुकते करण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने पैश्याची उचल झाली असावी. या पाच वर्षाच्या दरम्यान निरव मोदींच वाढते प्रस्थ त्यांच्या समाजातील कोणाच्या तरी डोळ्यात खुपले असावे आणि चौकशीची चक्रे सुरु झाली असावीत.

सुरुवात  आफ्रिकेच्या बँकेतून केलेल्या उचलीच्या चौकशी सोबत सुरु झाली आणि सीबीआय च्या लक्षात आले  की आफ्रिकेतला व्यवहार ही तर वाघाची शेपूट आहे. उरला सुरला मोठा वाघ पंजाब नॅश्नल बँकच्या भारतातल्या शाखेत आहे.

आता पुढे काय ?

स्रोत

बँकेचे अधिकारी आणि ग्राहक (निरव मोदी) यांनी संगनमत करून हे व्यवहार केले असे आता तरी नजरेत येत आहे. जर खोटी लेटर ऑफ अंडरटेकिंग उघडकीस आली नसती तर आणखी काही वर्षे हा घोटाळा असाच चालू राहिला असता आणि संपलाही असता.

नुकसान कोणाचे ?

अर्थात पहिले नुकसान बँकेचे. पैश्याचे झालेले नुकसान भविष्यकाळात भरून येईल पण आंतरराष्ट्रीय स्थरावर सरकारी बँकांची पत बरेच वर्ष ढासळेल हे सर्वात मोठे नुकसान आहे. कदाचित सरकारी बँकांच्या एलसी कडे या नंतर संशयानेच बघितले जाईल. नुकसान केवळ बँकांचे नाही तर संपूर्ण देशाचे होईल. अश्या किती सरकारी बँका बुडीत खात्यात जाणार आहेत याचा अंदाज कोणीही करू शकत नाही. गेल्या काही वर्षात कमावलेली आंतरराष्ट्रीय पत ढासळायला सुरुवात झाली आहे असे म्हणायला काही हरकत नाही.

या प्रकरणाची अधिक माहिती बोभाटावर तुम्हाला वेळोवेळी मिळेलच.

सबस्क्राईब करा

* indicates required