गँग्स ऑफ पालणपूर : निरव मोदीचा ११,४०० कोटींचा घोटाळा - भाग २

हजारो करोडो रुपयांची उलाढाल वर्षानुवर्षे खोट्या कागदपत्रांवरती हजारो करोडो रुपयांची उलाढाल वर्षानुवर्षे खोट्या कागदपत्रांवर्ती चालत राहते आणि अचानक एक दिवस हा फुगा फुटतो. तो पर्यंत आरोपी देशाबाहेर सुखरूप (!) पोहोचलेले असतात. हा केवळ योगायोग नसतो. ज्याला क्राईमच्या भाषेत ‘कनायवन्स’ म्हणतात. आतल्या माणसांची मदत असल्या शिवाय या पातळीवरचे गुन्हे घडवून आणणे शक्यच नसते.

निरव मोदींच्या प्रकरणात बँकेच्या अधिकाऱ्यांची हात मिळवणी कशी होती हे लवकरच सगळ्यांना कळेल. खटला दाखल होईल. आरोपी निरव मोदी, निशाल मोदी, मेहुल चोकसी, अमी मोदी, हे भारतात येतील ही शक्यता फारच कमी आहे. याचं कारण असं आहे की अमी मोदी अमेरिकन नागरिक आहे. निशाल मोदी बेल्जियम नागरिक आहे. उपलब्ध माहिती नुसार मेहुल चोकसी इंग्लंड मध्ये आहे तर निरव मोदी स्वित्झर्लंड ला आहे. या देशांसोबत भारताचे गुन्हेगारांबद्दलचे जे करार आहेत त्या प्रमाणे निर्णय घेतले जातील.

स्रोत

हे जेव्हा घडेल तेव्हा घडेल, पण तुमच्या आमच्या सारख्यांना अश्या प्रकरणांची कुणकुण पण लागत नाही. कारण, हिऱ्यांचा व्यापार, व्यापाऱ्यांची आर्थिक ताकद आणि एकूण सर्व व्यवहार एखाद्या गुप्त धार्मिक पंथासारखे चालत असतात. एकेकाळी तर हे व्यापारी सांकेतिक भाषा वापरायचे जी इतरांना समजणारच नाही. आता इंटरनेटच्या जमान्यात सांकेतिक भाषेची आवश्यकता उरली नाही. पण आम्ही तुम्हाला या गुप्त सांकेतिक भाषेची झलक दाखवू शकतो.

एक = कणी
दोन = मेली
तीन = एकवई
चार = एरण
पाच= मूळ
सहा = बेड
सात = समार
आठ = थाल
नऊ =बन
दहा = दाही
पंचवीस = सळीसूत किंवा पान
पन्नास = मूळदाही
पंचावन्न = मूळमूळ
सत्तर =समार दाही
पंचाहत्तर = तीन पान
शंभर = कणी सो
हजार = बडा घर

स्रोत

हिऱ्यांची खरेदी विक्री केवळ विश्वासावर चालते. कोणत्याही प्रकारची कागदोपत्री नोंद नसते. इतर व्यापाराप्रमाणे या हिरे व्यापारात पण दलाल असतात. दलालांना हिरे एका कागदी पुरचुंडीत बांधून दिले जातात. ज्याला ‘पडीगु’ असे म्हणतात. ही पडीगु किंवा पुरचुंडी “जांगड” म्हणजेच “ऑन-सेल” करारावर दिली जाते. आता आपल्याला असं वाटेल की दलाल पडीगु घेऊन पळून गेला तर ?...तर, असे होत नाही.  कारण, सर्व साधारणपणे दलाल सुद्धा पालणपुरी जैनच असतो. या जांगड पद्धतीचा फायदा घेऊन कंपनीची उलाढाल अनेक प्रमाणात कागदोपत्री वाढवली जाते. शेअर बाजारात ज्या प्रमाणे शेअर्सचे सर्क्युलर ट्रेडिंग करतात. याला हिरे बाजारात “पडीगू फेरवानू” म्हणतात. या पद्धतीने हिऱ्यांचे सर्क्युलर ट्रेडिंग करून उलाढाल अनेक पटीने वाढली असे बँकेला दाखवले जाते. या भरोश्यावर बँक अधिक पत पुरवठा करते. अधिक पत पुरवठा झाला की त्यातून पैसे बाहेर काढायला सुरुवात होते. एक क्षण असा येतो की काही कारणांमुळे हे सर्क्युलर ट्रेडिंग अचानक थांबते. व्यापारी हात वर करून मोकळे होतात. हे व्यवहार वर्षानुवर्ष याच पद्धतीने हिरे बाजारात चालले आहेत. पण निरव मोदीने या खोट्या व्यवहाराची हद्दच केली.

१९९१-९२ साली हर्षद मेहताने जसा बँकांना गंडा घातला तसाच दरोडा दिवसाढवळ्या निरव मोदीने घातला. निरव मोदी आणि मंडळी यांची सामाजिक प्रतिष्ठा इतकी उच्चतम असते की संशय असला तरी आरोप करणे फार कठीण असते. उदाहरणार्थ, निरव मोदी यांचे बंधू निशाल मोदी यांचा विवाह धीरूभाई अंबानी यांच्या नातीशी (इशिता साळगावकर) झालेलं आहे. असे घट्ट नातेसंबंध असल्यावर संशयाचा वारा देखील त्यांच्या वाटेला जात नाही.

निशाल मोदी आणि इशिता साळगावकर (स्रोत)

 

पुढे काय होईल ?

या सगळ्या बातम्या वाचनात येतातंच असं नाही.पण जेव्हा येतात तेव्हा एकच प्रश्न मनात येतो. हे असं होतंच कसं ? संगणकीकृत शाखा आहेत, अंतर्गत लेखापरीक्षा आहेत, अनेक वर्षं काम करणारी माणसं आहेत, मग हे होतं तरी कसं? पोलीसांचं म्हणणं ठाम असतं आतून मदत असल्याशिवाय हे गुन्हे होत नाहीत. व्यवस्थीत पगार, सुरक्षीत नोकरी, पेन्शन, असल्यावर कोण बरं हा धोका पत्करेल ? पण,गुन्हे घडतात हे तर खरंच आहे. वरवर पाहता बँकेच्या कामाची विण घट्ट दिसते पण काम करणारी माणसंच आहेत. व्याज, कर्ज, लोभ, व्यसनं, मानसिक दुबळेपणा, अगतीकता, लाचारी, आळस, बेफिकीरी, इथे पण आहेच.

शेवटी खटला उभा राहील, साक्षी पुरावे सदर केले जातील, तारखा पडत राहतील, तपास अधिकारी निवृत्त होतील, न्यायाधीशांचा बदल्या होत राहतील, साक्षीदार उलटतील, आरोपींना जामिन मिळतील आणि कदाचित दहा-बारा वर्षाच्या विलंबाने पहिला निकाल येईल. त्यानंतर आरोपी अपिलात जातील आणि न्याय प्रलंबित राहील.

तो पर्यंत निरव मोदी निवांतपणे आपले नातवंड खेळवत घरी बसलेले असतील. शेवटी बाल्झॅक म्हणाला तेच खरं आहे, “Behind Every Great Fortune There Is a Crime.”

सबस्क्राईब करा

* indicates required