मराठी पाऊल पडू दे पुढे - ‌‌‍शिप ब्रेकींग - भाग एक!!!

मराठी पाऊल पडू दे पुढे या मालिकेतील आजचा लेख शिपब्रेकींग किंवा जहाज  तोडणी या विषयावर आहे. शिप ब्रेकींग हा व्यवसाय वर्गीकरण करायचे झाल्यास ' भंगारची खरेदी-विक्री ' या सदरात मोडतो. असे असूनही हा व्यवसाय प्रचलित भंगार व्यवसायापेक्षा वेगळा आणि समृध्द आहे.

हा विषय येथे घेण्यामागे एक विशेष हेतू असा आहे की काही हजार कोटींची उलाढाल असलेल्या या क्षेत्रात मराठी टक्का जवळजवळ शून्य आहे. मुंबई आणि गुजरात येथे चालणार्‍या या व्यवसायाची ओळख स्थानिक लोकांना पण नाही हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. 

चला तर, आपण मूळ विषयाकडे वळू या !!

हा व्यवसाय वेगळा इतर भंगार व्यवसायापेक्षा वेगळा कसा आहे ? 

सर्व साधारणपणे भंगाराची निर्मिती एखाद्या उत्पादन प्रक्रियेचा शेवटचा भाग असतो. पण शिपब्रेकींगमध्ये भंगाराची निर्मिती हीच मुख्य उत्पादन प्रक्रिया असते .  या प्रक्रियेत जी जहाजे वाहतूक करण्यास निकामी झाली आहेत, ती जहाजे कापली जातात आणि भंगार तयार होते.

जहाज कापणे म्हणजे काय ?

जहाजाचे तुकडे करणे, किंवा आपण जसा बर्थडे केक कापतो, अगदी हुबेहूब या पध्दतीने जहाज कापले जाते.

मुंबईत हा व्यवसाय कुठे चालतो ?

Map of Reay Rd, Railway Colony, Mazgaon, Mumbai, Maharashtra 400010

रे रोड स्टेशनच्या जवळ ब्रिटानिया कंपनी आहे. या ब्रिटानिया नाक्यापासून पुढे कोळसा बंदर, रेती बंदर, लकडा बंदर, पावडर बंदर असे वेगवेगळे भाग आहे्त. या संपूर्ण प्रभागाला दारूखाना म्हटले जाते.

हा व्यवसाय करण्यासाठी काही लायसन्स किंवा इतर सरकारी परवाने लागतात का? शिक्षणाची पातळी काय असावी?

नाही. व्यापार करण्यासाठी कोणतेही विशेष परवानग्या लागत नाहीत. काही अपवाद आहेत त्याची माहिती या लेखात पुढे मिळेलच! शिक्षणाचे म्हणाल तर हा व्यवसाय प्रामुख्याने अशिक्षीत बहुल आहे. व्यापार करण्याची अंगभूत कौशल्ये पुरेशी आहेत.तांत्रिक विषयाचे ज्ञान असल्यास फारच उत्तम. पण प्रमाणपत्राची काहीही आवश्यकता नाही.

या व्यवसायात भांडवल किती लागते?

निश्चित असे काही आकडे नाहीत. सुरुवातीला अगदी पन्नास हजाराचे भांडवलसुद्धा पुरेसे आहे. या व्यवसायात काही भाग बिनभांडवली पण करता येतो. त्याची माहिती पुढे येणारच आहे .शारीरीक मेहनत  हे भांडवल मुख्यतःलागते.

मुंबईपासून दूर असलेल्या लोकांना हा व्यवसाय करणे शक्य आहे का?

ह्या व्यवसायाचे केंद्र जरी मुंबईत असले तरी या उत्पादनाचे ग्राहक मुंबई बाहेरच जास्त आहेत. उदाहरणार्थ, नशिक, जालना, औरंगाबाद येथे असणारे लोखंडी सळ्यांचे कारखाने जहाजाच्या स्टील प्लेट वापरतात. त्यामुळे ग्रामीण आणि ग्रामीण-निम शहरी भागात ज्यांचा चांगला संपर्क आहे त्यांना फायदा जास्त आहे.

जहाज तोडणीतून भंगार म्हणजे नक्की काय मिळते ?

Related imageस्रोत

एखाद्या जहाजाची तुलना आपण तरंगणार्‍या शहरासोबत करू शकतो. लोखंड, तांबे , पितळ, लाकूड, तेल, काच , रबर, कागद , प्लास्टीक असे ढोबळमानाने सांगता येते. पण या प्रत्येकात अनेक उपविभाग आहेत. फक्त लोखंडाचा विचार करायचा झाला तर त्यात प्लेट- पाईप-चेन-व्हाल्व-रोप- पत्रा- बिड- मेल्टींग स्क्रॅप (१-२) इतके प्रकार आहेत. दारुखान्यात हजारो माणसांना रोज संधी देणारा हा व्यवसाय आहे.

आणखी काही माहिती देऊ शकाल का ?

होय. नक्कीच. 'बोभाटा' च्या माध्यमातून या विषयाची संपूर्ण माहिती वाचकांना मिळणार आहे. इतकेच नव्हे तर या व्यवसायात असणार्‍या काही लोकांशी थेट संपर्क करून मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. 'बोभाटा' चा आणि या व्यवसायाचा कोणाताही आर्थिक किंवा इतर व्यवहार किंवा हितसंबंध नाहीत हे येथे नमूद करणे आवश्यक आहे. 

 

 

आणखी वाचा :

मराठी पाऊल पडू दे पुढे - भाग एक - ‌‌‍पडतर मालाचा व्यापार !!!
मराठी पाऊल पडू दे पुढे - भाग दोन - ‌‌‍इंडस्ट्रीयल सरप्लस !!!

 

सबस्क्राईब करा

* indicates required