मराठी पाऊल पडू दे पुढे - भाग दोन - ‌‌‍इंडस्ट्रीयल सरप्लस !!!

मराठी पाऊल पडू दे पुढे - भाग एक - ‌‌‍पडतर मालाचा व्यापार !!!

 

सरप्लस ट्रेडींगच्या या दुसर्‍या भागात इंडस्ट्रीअल सरप्लस या व्यवसायाविषयी आपण वाचणार आहोत. पण त्या आधी आधीच्या भागात जी चर्चा आपण केली त्याबाबत वाचकांनी काही शंका विचारल्या होत्या त्याचे निराकरण करू या.

 

शंका क्रमांक १ - एक्सपोर्ट सरप्लस विकण्यास भारतात बंदी आहे काय?

उत्तर : एक्सपोर्ट करण्यात काही कर सवलती असतात. त्या सवलती घेऊन पुन्हा तो सरप्लस भारतात विकणे योग्य नाही.  पण त्या करसवलतीचा फायदा किंमतीत न घेता, योग्य प्रकारे कर भरून बिलिंग केलेस, तर विकण्यास काही हरकत नाही. याबाबत योग्य कर सल्लागाराचा सल्ला ज्याचा त्याने घ्यावयाचा आहे. 'बोभाटा' तर्फे मिळणारा सल्ला यासाठी गृहित धरू नये.

 

शंका क्रमांक २ : कंपनीतर्फे ब्रँडॅड सरप्लस विकण्यात काही कराराचा भंग होतो का ?

उत्तर : हे प्रत्येक कंपनीवर अवलंबून आहे. काही कंपन्या लेबल कापून सरप्लस  विकण्याची परवानगी देतात. काही कंपन्यांचा सरप्लस इंपोर्टद्वारा येतो. त्या बद्दल अधिक माहिती इंपोर्टरकडे मिळू शकते. बर्‍याच वेळा इंपोर्ट "रॅग्ज" (Rags) म्हणजे चिंधी म्हणून आणला जातो म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे.

 

शंका क्रमांक ३ : भारतीय कंपन्यांची धोरणे काय आहेत ?

उत्तर : प्रत्येक कंपनीची धोरणे वेगवेगळी असतात. बऱ्याच कंपन्या नवीन डिझाईन्स बाजारात आणण्यापूर्वीच सरप्लस स्टॉक विकून टाकणे पसंत करतात.

 

आता आपण वळूया इंडस्ट्रियल सरप्लसकडे.

इंडस्ट्रियल सरप्लस म्हणजे काय?

१. प्रत्येक कंपनी आपल्या गरजेनुसार आगाऊ कच्चामाल खरेदी करून ठेवत असते. परंतु काही कारणाने धोरणबदल झाल्यास हाच कच्चामाल नॉन-मुव्हिंग मटेरियल या सदरात जातो. एखादी कंपनी विशिष्ट मानांकन असलेले लोखंड/स्टील वापरते. उदाहरणार्थ, EN-8 या सिरीजचे लोखंड वापरते. उत्पादनात सुधारणा करण्यासाठी EN-8 ऐवजी EN-10 वापरण्याचे ठरले, तर आधी जमा केलेला कच्चामाल नॉन-मुव्हिंग मटेरियल या सदरात जातो. एका कंपनीचे नॉन-मुव्हिंग मटेरियल हे दुसऱ्या कंपनीचे मुव्हिंग मटेरियल असते. अशा प्रकारे इंडस्ट्रियल सरप्लस विक्रीस उपलब्ध होतो.

२. काहीवेळा गिऱ्हाईकाने माल वेळेवर सोडवून न नेल्यास वेयरहाउसिंग कंपन्या माल विकून टाकतात.

३. जनरल इन्शुरन्स कंपन्या आणि बँका काहीवेळा तारण ठेवलेल्या मालाची विक्री करतात.

४. Ship De-Rail झाल्यास शिपिंग कंपन्या माल विक्रीस आणतात.

या सर्व प्रकारात टॅक्सेशन किंवा इंव्हॉइसिंग योग्य प्रकारे झाले पाहिजे

 

प्रश्न : हा व्यवसाय कोण करू शकेल?

उत्तर : हा व्यवसाय करण्यासाठी थोडेसे टेक्निकल बॅकग्राउंड असणे आवश्यक आहे. शैक्षणिक अर्हता नसली तरी अनुभव गाठीशी असणे गरजेचे आहे.

 

प्रश्न : भांडवल किती लागते?

उत्तर : या व्यवसायात सरप्लस विकत घेऊन तो काही काळाने विकणे फायद्याचे असते. पण यासाठी वेयरहाउस किंवा गोदामाची आवश्यकता असते. त्याखेरीज भांडवलही काही काळ गुंतून राहते. दुसरा मार्ग म्हणजे विकणाऱ्या कंपनीस बयाणा (अॅडव्हान्स) देऊन माल अडकवून ठेवणे आणि गरजू कंपनीस विकणाऱ्या कंपनीतून थेट पोहोच देणे.

 

प्रश्न : हा व्यवसाय कुठे करता येईल?

उत्तर : MIDC क्षेत्राच्या आसपास हा व्यवसाय सहज करता येतो. सध्याच्या MSME [Ministry of Micro, Small & Medium Enterprises]  धोरणात बऱ्याच नवीन कंपन्या येत आहेत.

 

प्रश्न : या क्षेत्रात संधी कश्या शोधाव्यात ?

उत्तर : कंपनीचे परचेस मॅनेजर आणि वेअरहाउस मॅनेजर ही संधी देऊ शकतात. काही कंपन्या सरप्लस किंवा नॉन-मुव्हिंग स्टॉकसाठी Auction कंपन्यांचा वापर करतात. काही नामांकित Auction कंपन्यांची नावे खाली देत आहोत.

Gandhi Auctioneers Pvt. Ltd.

Ashvin & Co.

Neelami Auctioneer Private Ltd

 

प्रश्न : या क्षेत्रात आणखी काही संधी उपलब्ध आहेत का?

उत्तर : हा व्यवसाय सुरु केल्यानंतर बऱ्याच कंपन्या नवीन कच्चा माल आणून देण्याच्याही संधी देतात.

 

प्रश्न : कोणत्या प्रकाराचा सरप्लस विकत घ्यावा?

उत्तर : ‘जेनेरिक स्वरूपाचा’ कच्चामाल ताबडतोब विकला जातो. उदाहरणार्थ, बेयरिंग्स, केबल, अँगल, चॅनल्स. अश्या स्वरूपाचा नॉन-मुव्हिंग स्टॉक ताबडतोब घेऊन विकण्यास हरकत नाही. काही वेळा चांगला इम्पोर्ट सरप्लस पण मिळतो, ज्यामध्ये नफ्याचं प्रमाण जास्त मिळू शकते.

 

प्रश्न : नफ्याचे प्रमाण किती असते ?

उत्तर : या व्यवसायात नफ्याचे प्रमाण व्हॉल्यूम (उलाढालीवर) अवलंबून असते. साधारणपणे ५% ते २०% मार्जीन सहज मिळते. दिसायला हे प्रमाण कमी दिसत असले तरी व्हॉल्यूमचा विचार केला तर फायदा मोठा असतो.

 

प्रश्न : सध्या बाजारात एखादी संधी उपलब्ध असल्याचे उदाहरण आहे का?

उत्तर : बोभाटाच्या माहिती प्रमाणे सध्या इंडोनेशिया/ऑस्ट्रेलिया मधून आलेला दगडी कोळसा अतिरिक्त स्टॉक असल्यामुळे मुबलक प्रमाणात मिळतो आहे. ज्यांचा संपर्क औद्योगिक (MIDC) क्षेत्रात असेल. त्यांना हा कच्चा माल घेऊन विकणे सहज शक्य होईल.

 

काही महत्वाच्या सूचना ?

१. इंडस्ट्रीयल सरप्लस आणि स्क्रॅप या दोन्ही क्षेत्रात बरेचसे साम्य आहे. परंतु स्क्रॅप ट्रेडिंग हा पूर्णतः वेगळा विषय आहे. (त्या क्षेत्रातही मराठी टक्का नगण्य आहे.)

२. इंडस्ट्रीयल सरप्लस या क्षेत्रात एका वर्षात फार तर पंधरा वीस सौदे होतात परंतु हे पुरेसे फायदे मिळवून देतात.

 

(वाचकांच्या मार्गदर्शनासाठी हा लेख बोभाटातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे परंतु बोभाटाचा आणि या व्यवसायाचा कोणताही आर्थिक / व्यावहारिक संबंध नाही.)

सबस्क्राईब करा

* indicates required