computer

माणूस सोडून हे आहेत जगातले १० हुशार प्राणी !!

राव, माणूस असा एकच प्राणी आहे जो ‘माणूस हा जगातला सर्वात हुशार प्राणी आहे’ असं म्हणतो. बाकी सगळे प्राणी गपगुमानं आपलं काम करतात.  ना स्वतःला हुशार म्हणवतात आणि ना स्वतःला ढ!! गाढव हा मूर्ख प्राणी आहे हा सुद्धा माणसानेच लावलेला जावईशोध. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत की माणसाशिवाय हुशार असलेले असे कोणकोणते  प्राणी आहेत....

चला तर मग,  एक चक्कर मारून येऊ...

१०. ऑक्टोपस !

ऑक्टोपसच्या मेंदूत तब्बल १३० न्यूरॉन्स असतात. ज्याच्या मेंदूत जितके जास्त न्यूरॉन्स, तितका मेंदू अधिक तल्लख असतो. मंडळी विशेष म्हणजे ऑक्टोपसचा प्रत्येक हात हा वेगळा विचार करणारा असतो, म्हणजे त्याला स्वतःचा मेंदू  असतो. तुम्ही त्याचा पाय कापला तरी तो पुन्हा उगवण्याची क्षमता त्याच्यात असते.

९. डुक्कर !

डुक्कर चिखलात लोळतं म्हणून आपल्याला ते घाणेरडं वाटू शकतं.  पण डुक्कर हा अत्यंत हुशार, स्वच्छ आणि स्मार्ट पाळीव प्राणी असल्याचं म्हटलं जातं. खरंतर डुकरांच्या शरीरावर घामाच्या ग्रंथी नसतात त्यामुळे त्याला शरीराचं तापमान राखण्यासाठी त्यांना चिखलात लोळावं लागतं.

८. उंदीर !

एका संशोधनानुसार उंदीर हे अत्यंत हुशार असतात. माणसांसारखं दंग मस्ती करणं हे उंदरांमध्ये चालतं असं शास्त्रज्ञ सांगतात. उंदरांची शरीर रचना मानवी शरीरासारखी असते. त्याचबरोबर विचार करण्याची बुद्धिमत्ता देखील असते.

७. कावळा !

कावळ्याचा मेंदू हा मानवी अंगठ्याएवढा असतो. म्हणजेच त्यांच्या शरीराच्या आकाराच्या बराच मोठा. कावळ्यांमध्ये माणसाच्या चेहऱ्याला लक्षात ठेवण्याची क्षमता असते. कावळा हा तल्लख बुद्धीचा पक्षी म्हणून ओळखला जातो. आठवतो ना रांजणात खडे टाकून पाणी पिणारा चतुर कावळा?

६. मुंगी !

मुंगीची शारीरिक क्षमता आणि तिच्या अंगी असलेली चिकाटी तिला खास बनवते. कितीही उंचावरून पडली तरी इजा न होणे ही मुंगीची दुसरी खासियत. जर एखादी मुंगी मेली तर तिच्या शरीरातून एक प्रकारचा गंध निघतो. या गंधामुळंच इतर मुंग्यांना तिच्या मृत्यूची वार्ता मिळते.

 

आणखी वाचा :

मुंगीबद्दलच्या या १२ गोष्टी माहिती आहेत का...?

५. कुत्रा !

कुत्रा हुशार असतो हे काही वेगळं सांगायला नको. कुत्रा हा स्मार्ट म्हणून ओळखला जातो, म्हणूनच सुरेक्षेसाठी त्याचा उपयोग आजही केला जात आहे. आपल्या मालकासोबत असलेली इमानदारी ही क्वचित दुसऱ्या कोणत्याही प्राण्यात आढळून येईल.

४. हत्ती !

हत्तीचा एक गुणधर्म म्हणजे तो एकच असा प्राणी आहे की ज्याच्या अंगी विनोदबुद्धी असते. हा अवाढव्य प्राणी शंभराहूनही अधिक आवाज लक्षात ठेवू शकतो. मानवी भावभावना याच्याही ठायी असतात मंडळी.

३. डॉल्फिन

डॉल्फिन मासे हे जगात तिसर्‍या क्रमांकाचे हुशार प्राणी म्हणून ओळखले जातात. आजूबाजूच्या वातावरणातून ते हुशारीने बर्‍याच गोष्टी शिकू शकतात. एका अभ्यासानुसार डॉल्फिन जेव्हा झोपतात तेव्हा ते अर्ध्या मेंदूने झोपतात.  त्यामुळं संकटाच्या वेळी त्यांना सतर्क राहण्यास मदत होते.

२. मधमाशी !

मुंगीपेक्षा थोडीशी मोठी असलेली मधमाशी गट बनवून काम करते. एकटी दुकटी मधमाशी तेवढी हुशार नसते.  पण या सगळ्या एकत्र आल्या म्हणजे काय चलाखीने काम करतात ते विचारू नका. एका अभ्यासानुसार मधमाश्यांनाची अशी एक खास भाषा सुद्धा असते आणि विशेष म्हणजे एखादा मुद्दा आवडला नाही तर तो मुद्दा पटवून देण्यासाठी त्या डान्सही करतात.

१. चिम्पान्झी !

हा प्राणी तर आपलाच भाऊ ना राव !! आपला डीएनए चिम्पान्झीबरोबर ९९ टक्के जुळतो बरं का !! माणसांच्या अत्यंत जवळचा हा प्राणी. वेगवेगळ्या वातावरणानुसार तो स्वतःला बदलू शकतो आणि त्यांच्यात भाषा सुद्धा असते. नारळासारखं कठीण कवच असलेले फळ कसे खायचे हे चिम्पान्झीला बरोबर ठाऊक असतं आणि त्यानुसार तो आपला मेंदू वापरतो.

सबस्क्राईब करा

* indicates required