computer

आता खऱ्या कार्डऐवजी वापरा व्हर्च्युअल डेबिट कार्ड!! जाणून घ्या याचे ५ फायदे!!

डिजिटल पेमेंट्स वाढले आणि साहजिकच गेल्या काही वर्षांत ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाणही वाढले. याला सामोरे जाण्यासाठी बँकांनी अनेक उपाययोजना केल्या आहेत. यापैकी एक म्हणजे व्हर्च्युअल डेबिट कार्ड. हे सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करण्यात मदत करते. वास्तविक जेव्हा तुम्ही कोणतीही वस्तू ऑनलाइन खरेदी करता तेव्हा तुम्हाला तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा तपशीलही द्यावा लागतो. हा तपशील शेअर न करता तुम्हाला ऑनलाइन खरेदी करायची असेल, तर तुम्ही व्हर्च्युअल डेबिट कार्डची मदत घेऊ शकता. चला, त्याच्याशी संबंधित आणखी काही गोष्टी येथे जाणून घेऊया 

व्हर्च्युअल डेबिट कार्ड हे साध्या डेबिट कार्डसारखेच असते, पण हे प्रत्यक्ष हातात येत नाही. ऑनलाईन कार्ड म्हणा. आपल्या बँकेच्या ॲपवर ते उपलब्ध असते. बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेचा वापर करून याचा उपयोग करता येतो. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. .

प्रत्येक व्हर्च्युअल कार्डचा स्वतःचा १६ अंकी व्हर्च्युअल कार्ड क्रमांक, CVV क्रमांक आणि वैधता तपशील असतो. इतर कोणत्याही क्रेडिट कार्डाप्रमाणे ते ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाऊ शकते. पण डेबिट कार्डप्रमाणे ते एटीएम मशीनमध्ये वापरता येत नाही. हे कार्ड ऑनलाईन खरेदीसाठी वापरले जाऊ शकते. व्हर्च्युअल डेबिट कार्ड सुरक्षित ऑनलाइन व्यवहार करण्यात मदत करते. प्रत्यक्ष कार्ड न हाताळता हे वापरता आल्यामुळे याचे फायदेही बरेच मिळतात.

व्हर्च्युअल डेबिट कार्डचे फायदे खालीलप्रमाणे आहेत.

हे जास्त सुरक्षित आहेत, कारण याची चोरी होऊ शकत नाही. ते कुठे हरवले किंवा पडले असे होत नाही. हे कार्ड क्लोनिंगपासून सुरक्षित आहे. याची कॉपी करता येत नाही. व्हर्च्युअल डेबिट कार्ड असुरक्षित वेबसाइटच्या संपर्कात आल्यास किंवा कार्डचे तपशील हॅकर्सद्वारे ट्रॅक केल्यास ते ब्लॉक केले जाते असे सांगितले जात आहे.

व्हर्च्युअल कार्ड त्वरित सक्रिय केले जाऊ शकते. म्हणजे डेबिट कार्ड सुरू करायला एटीएम, कॉल, एसएमएस करावा लागतो तसे न करता व्हर्च्युअल कार्ड आधीपासूनच सक्रिय केले जाते. तुम्हाला ते सक्रिय करण्याची गरज नाही. त्यामुळे ऑनलाइन सेवांसाठी ते त्वरित वापरता येते.कोटक महिंन्द्र बँकेसारख्या काही बँका एक दिवस 'व्हॅलीड' असलेले कार्ड पण देतात. दिवस संपला की कार्ड आपोआप रद्द होते. 

ते त्वरित ब्लॉक केले जाऊ शकते. यासाठी कुठलही कॉल सेंटर नंबरवर संपर्क करावा लागत नाही. समजा कार्डच्या गैरवापराचा संशय आला, तर कार्ड ब्लॉक करण्यासाठी फक्त मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये लॉग इन करून आणि ब्लॉक पर्यायावर टॅप करून ते ब्लॉक करू शकतो.

व्हर्च्युअल डेबिट कार्डांमुळे एखाद्याला खाद्यपदार्थ, शॉपिंग, रेस्टॉरंट्स इत्यादींवर ऑनलाइन लाभ घेण्यासाठी अनेक ऑफर मिळू शकतात. व्हर्च्युअल डेबिट कार्डवरून बोनस पॉइंट्स देखील मिळू शकतात आणि संबंधित बँकेच्या मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे ऑनलाइन रिडीम केले जाऊ शकतात.

तुम्ही व्हर्च्युअल डेबिट कार्डवर किती खर्च करायचा याची मर्यादा सेट करू शकता. समजा पालकांना त्यांच्या मुलांसाठी व्यवहार मर्यादा सेट करायची आहे त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. हे कार्ड कुठेही नेणे सोपे आहे कारण ते मोबाईल ऍप्लिकेशनमध्येच असते. त्यामुळे गहाळ होत नाही.काही बँका कार्डाच्या खर्चावर मर्यादा आपण टाकू शकतो तरकाही बँका या मर्यादा स्वतःच निश्चित करून कार्ड देतात.

बोभाटा तुम्हाला नेहमी नवनवीन बँकिंग सेवांची माहिती देत असते. तुम्हाला ही माहिती आवडल्यास जरूर कमेंट करून सांगा.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required