computer

कोलकाताचे पांढरेशुभ्र व्हिक्टोरिया मेमोरिअल काळ्या रंगाने का रंगवले गेले होते?

व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल ही कोलकाता शहरामधील एक सर्वात प्रसिद्ध वास्तू आहे. संपूर्ण संगमरवरी दगडाने बांधले गेलेले हे स्मारक भारतातील जगप्रसिद्ध मुघल स्मारक ताज महालसारखे दिसते. ब्रिटिश राजवटीदरम्यान ही संगमरवरी इमारत व्हिक्टोरिया राणी हिच्या स्मरणाप्रिथ्यर्थ बांधली गेली होती. वास्तूशास्त्रातील सर्वोत्तम उदाहरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलने नुकतीच शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. दरवर्षी अनेक पर्यटक या वास्तूला भेट देतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की ही ऐतिहासिक पांढरीशुभ्र वास्तू एकदा काळ्या रंगात रंगवली गेली होती?

ह्या स्मारकाची कल्पना राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर सर्वप्रथम लॉर्ड कर्झनने इ.स. १९०१ मध्ये मांडली. इ.स. १९०६ मध्ये झालेल्या पायाभरणीनंतर हे स्मारक इ.स. १९२१ मध्ये पूर्ण झाले. हे १९२१ पासून अस्तित्वात आहे. दुसर्‍या महायुद्धात भारताने तसा प्रत्यक्ष युद्धात भाग घेतला नव्हता. पण तरीही कलकत्ता (आताचा कोलकाता) हा एक महत्त्वाचा ब्रिटिश वस्ती आणि अमेरिकन तळ होता. वर्ष १९४२-४३ मध्ये जपानी लष्कराच्या हवाई दलाने कलकत्त्यावर हल्ला केला. यानंतर डिसेंबर १९४२ मध्ये कलकत्त्यावर पहिल्यांदा बॉम्बस्फोट झाला. या बॉम्बस्फोटांमुळे सर्वात जास्त नुकसान खिदिरपूर बंदराचे झाले. ते बंदर त्यावेळी ब्रिटिश मित्र राष्ट्रांना माल पुरवठा करणारे महत्वाचे शिपयार्ड होते.

जपानी सैनिकांनी तेव्हा अनेक हवाई हल्ले केले. हे हल्ले बहुतांशवेळा रात्री केले गेले. कारण ब्रिटिश संरक्षण यंत्रणा दिवसा उजेडात अधिक शक्तिशाली होती. पुढचे काही आठवडे रात्रीच्या वेळी कलकत्ता युद्धभूमीत बदलले होते. रोज रात्री जपानी सैन्य रात्री बॉम्बवर्षाव करत असे. इंग्रज सैन्य त्याला सामोरे जाण्याचा मार्ग शोधत होते. तेव्हा त्यांना एक युक्ती सुचली. त्यांनी रात्री ब्लॅकआउट करायचे ठरवले. सूर्यास्तानंतर कलकत्त्याचे सर्व रस्ते, घरे, दुकाने काळी केली गेली. या चालीमुळे जपानी सैन्याला आपले निशाणा साधण्यात अडचण येऊ लागली. ही युक्ती यशस्वी ठरली. कलकत्त्याचे सर्व रहिवासी रात्रीच्या वेळी त्यांच्या खिडक्या, कारचे हेडलाइट्स काळ्या रंगात रंगवत होते. पथदिवे काळ्या कापडाने झाकलेले होते. प्रतिष्ठित हावडा पुलाचे उद्घाटनही त्या काळात गुपचूप करण्यात आले होते.

पण व्हिक्टोरिया मेमोरियल हॉल कसे लपवायचे. इतक्या मोठ्या चमचमत्या पांढऱ्या वास्तूचे काय करायचे. हे मोठे आव्हान होते. ही संगमरवरी वास्तू तब्बल १८४ फूट आहे.मग ब्रिटीश सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यांनी बांबूचे मचान आणि माती आणि शेण यांचे मिश्रण टाकून ही वास्तू काळ्या रंगात लपवून टाकली.

ब्रिटिश सरकारला ही युक्ती जपानी लोकांपर्यंत पोचू द्यायची नव्हती म्हणून त्यांनी त्या ऐतिहासिक वास्तूच्या आसपास कोणत्याही प्रकारचे छायाचित्रण करण्यास सक्त मनाई केली. हा फोटो मात्र समोर आला. असे मानले जाते की खालील छायाचित्र यूएस आर्मी फोटोग्राफर फ्रँक बाँड आणि फ्रँक कागल यांनी १९४३च्या उत्तरार्धात घेतले होते.

म्हणतात ना, युद्धे फक्त शक्तीने नाही तर युक्तीनेही खेळली जातात. अश्याच अनेक युक्त्या वापरून भारतानेही ब्रिटिश सरकारला हादरून टाकले होते. आणि या घटनेच्या चारच वर्षानंतर ब्रिटिश भारत सोडून कायमचे निघून गेले.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required