प्रिन्सीची कथा...एका राजपुत्राची शोकांतिका!!!

प्रिन्सीची कथा. हा एका गुलाबी हिर्‍याचा इतिहास आणि एका गोंडस राजकुमाराची शोकांतिका आहे.

या कथेची सुरुवात १९४३ साली मद्रासच्या रेसकोर्सवर झाली. रेसकोर्सवर बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड आणि सीतादेवी यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात -लग्नाच्या आणाभाका -शपथा सगळं काही क्रमवार झालं . लाजे-शरमकुलकी मर्यादा वगैरे गुंडाळून ठेवत दोघांनी लग्न करायचं ठरवलं. असं म्हणायचं कारण असं की प्रतापराव विवाहीत होते. चार अपत्यांचे वडील होते आणि संस्थानाच्या नियमाप्रमाणे दुसरा विवाह करण्याची अनुमती त्यांना नव्हती. सीतादेवी विवाहीत होत्या आणि त्यांचा जमीनदार पती घटस्फोट देण्याची शक्यता नव्हती.

ज्या नियतीने या दोघांना प्रेमात पाडलं त्याच नियतीने पुढचा मार्ग सितादेवींना दाखवला. सीतादेवींनी धर्म बदलला. त्या मुस्लीम झाल्या. घटस्फोट आपोआप झाला. घटस्फोटानंतर त्यांनी पुन्हा एकदा हिंदू धर्म स्वीकारला आणि प्रतापरावांशी लग्न केले.

Image result for princie sitadevi

सीता देवी ! स्रोत

महाराजांच्या धाडसी लग्नाची खबर युरोपात अनेक वृत्तपत्रांची मथळ्याची खबर झाली. काहींनी सीतादेवींना ‘वॅलीस सिंपसन ऑफ द इस्ट’ हे टोपणनाव पण दिले. या विवाहाेनिमीत्त महाराजांनी सीतादेवींना एक हिर्‍याचा हार भेट दिला.  हा हार पूर्वी तिसर्‍या नेपोलीयनने सम्राज्ञी युजीनला दिला होता.

भारतात ब्रिटीशांनी महाराजांना कायदेशीर कचाट्यात धरण्याचा प्रयत्न केला. महाराजही तेव्ह्ढेच खमके (की निगरगट्ट?). त्यांनी युक्तिवाद केला की ते बडोद्याच्या द्विभार्या प्रतिबंधक कायद्याच्या कक्षेच्या बाहेर आहेत. तो कायदा फक्त प्रजेसाठी आहे. राजासाठी नाही. ब्रिटीशांनी कायदे तज्ञांचा सल्ला घेतला. त्यांनी महाराजांच्या बाजूने निर्वाळा दिला. ब्रिटीशांनी बरीच धूसपूस-त्रागा करून पाहीला. अखेर ब्रिटीशांनी हार मानली पण सीतादेवींना महाराणीचा किताब देण्यास नकार दिला. माझ्या राणीला किताब देणारे ब्रिटिश कोण? असा पवित्रा घेत महाराजांनी सीतादेवींना महाराणी जाहीर केले.

काही वर्षातच सीतादेवींनी पहिल्या आणि एकुलत्या एक बाळाला जन्म दिला. त्याचं खरं नाव सयाजीराव, पण टोपणनाव प्रिन्सी! हा काळ साधारण दुसर्‍या महायुध्दाच्या अखेरीचा होता. युध्द संपले आणि स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले . चतुर आणि चाणाक्ष सीतादेवींनी भारत सोडून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मोनॅको नावाच्या एका छोट्याशा, पण युरोपातल्या अतिश्रीमंतांच्या देशात घर घेतले. हळूहळू बडोदा संस्थानाचा खजिना मोनॅकोत पोहचला आणि या कथेला एक नविन कलाटणी मिळाली. महाराज आणि सीतादेवींमध्ये वितुष्ट आले आणि घटस्फोट झाला.

प्रिन्सीला सोबत घेऊन महाराणी सीतादेवी पॅरीसमध्ये स्थायिक झाल्या. पॅरिसच्या अतिउच्चभ्रू समाजाच्या वर्तुळात एका नविन आयुष्याची सुरुवात झाली. हातात रत्नजडीत सिगरेट होल्डर धरणारी स्त्री म्हणून त्यांना पॅरिस ओळखायला लागले.  पॅरिसच्या रंगीत सायंकालीन मेजवान्यांना महाराणीसोबत युवराज प्रिन्सी पण जाऊ लागला. जेमतेम दहा बारा वर्षाचा युवराज त्याच्याकडे बघणाराला मंत्रमुग्ध करेल असा होता.

अशाच एका संध्याकाळी ’वॅन क्लीफ अँड कार्पे” या जगप्रसिध्द पेढीवर एका गुलाबी हिर्‍याच्या प्रदर्शनासाठी खास निमंत्रित म्हणून सीतादेवी आणि राजकुमार प्रिन्सी गेले होते. प्रिन्सी त्या दिवशी इतका देखणा दिसत होता की त्या नविन गुलाबी हिर्‍याचे नावदेखील प्रिन्सी ठेवले गेले.

34.65-carat, cushion-cut, fancy intense pink Princie Diamond

प्रिन्सी हिरा !  स्रोत

वॅन क्लीफ अँड कार्पेलनी हा गुलाबी हिरा सोथेबीजच्या एका लिलावात एक लाख अठ्ठावीस हजार डॉलर किंमत मोजून घेतला. त्यापूर्वी ह्या हिर्‍याची मालकी हैद्राबादच्या निजामाकडे होती. आठव्या निजामाने (उस्मान अली खान) आर्थिक अडचणीला तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात हा हिरा विकला असावा असे मानले जाते. ह्या हिर्‍याची खासियत अशी की, हा गुलाबी झाक असलेला हिरा संपूर्ण शुध्द हिरा आहे. गुलाबी रंग कार्बन ह्या मूलद्रव्यात भेसळ झाल्यामुळे आला नसून अंतर्गत स्फटीकीय संरचनेच्या काही फरकामुळे आला आहे. वजनाने साधारण साडेचौतीस कॅरेटचा हा हिरा कुशन कट आहे. मुळात गुलाबी रंगाचा हिरा दहा हजार हिर्‍यापाठी एखादा मिळतो. त्यातून प्रिन्सीसारखा भेसळवीरहीत गुलाबी हिरा लाखातच एखादा असतो. पण प्रिन्सीच्या वजनाचा आणि घाटाचा दुसरा हिरा मिळणं जवळजवळ अशक्य आहे.

Image result for princie sitadevi

सीता देवी आणि राजकुमार सयाजीराव गायकवाड (प्रिन्सी)  स्रोत

वॅन क्लीफ अँड कार्पेलनी हा हिरा एका पेंडंटमध्ये बसवून त्याच्या चौफेर अनेक ब्रिलीयंट हिरे जडवले.  नंतर प्रिन्सी कुठल्यातरी अज्ञात श्रीमंताच्या घरी गेला. आता त्याचा पत्ता कुणालाच माहीती नाही !!!

सीतादेवींचा प्रिन्सी मात्र अतिरीक्त लाडाने वाया गेला. एकेकाळचा मोहक राजकुमार अंमली पदार्थ आणि लैंगिक स्वैराचाराच्या नादाने वाहवत गेला. सीतादेवीं त्याला काबूत ठेवू शकल्या नाहीत. आणि वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रिन्सीने फ्रान्समध्ये स्वतःचा गळा घोटून जीव दिला. या दु:खाने वेड्यापिशा झालेल्या सीतादेवीं कोमात गेल्या आणि वर्षभरात त्यांचेही निधन झाले.

तो राजकुमार आणि तो हिरा आता फक्त इतिहासातील एक उदास करणारी नोंद आहे.

 

सबस्क्राईब करा

* indicates required