ठगाची जबानी : उत्तरार्ध - प्रकरण २८

‘तुला गणेशाबद्दल काही माहिती आहे?' साहेब बहादूर यांनी विचारले.

‘होय. मला माहिती आहे. गणेशला पकडून देणारास तुम्ही बक्षिसही जाहीर केले आहे. गणेश येथून जवळच काही कोस अंतरावर आहे.'

'माझ्या शिपायांना तू वाट दाखवशील ? तू तुझे चातुर्य खर्च कर. गणेश अत्यंत सावध आहे.’

'मी हे काम पत्करतो. मी पकडला गेलो आहे हे त्याला माहीत नसेल, मी वेषांतर करतो. मी गणेशला पकडतो आणि त्याच्याबरोबर हिम्मत आहे, त्यालाही पकडून देतो!'

‘वा हे तर फार छान झाले.’

‘हिम्मतही पक्का ठग आहे. पण आता वेळ घालवायला नको. मला निवडक सैन्य द्या. त्यांचेजवळ उत्तम शस्त्रे द्या. मलाही एक शस्त्र हवे.’

‘छे, तुला शस्त्र मिळणार नाही. तू त्याच्या उपयोग या आमच्या शिपायांविरुद्धच करशील, काय नेम तुझा?'

'माझ्यावर विश्वास ठेवा. मी तसा विश्वासू वागेन. पण माझ्याबद्दल संशय घ्याल तर मीही तसाच वागेन.'

'ठीक आहे. एकदा तरी तुझ्या नेकीचा अनुभव घेतो.'

"अच्छा, माझी प्रतिज्ञा ऐका. गणेशाला पकडून दिल्याशिवाय मी अन्न- पाण्याला स्पर्शही करणार नाही.’

मी निघालो. सहा शिपाई उंच धिप्पाड उत्तम घोडे, उत्तम शस्त्रे असलेले असे निघालो. मी शिपायांचे इंग्रजी नंबराचे बिल्ले काढून टाकले, माझ्या पायाला दोरी बांधली होती ती सोडली. परंतु एक लोखंडी कडे होते ते साहेबांनी कापू दिलं नाही. ते घसरणार नाही किंवा आवाज करणार नाही असं मी ते बांधून टाकले.

शहर सोडून मोकळया मैदानात आलो.

‘कुठे आहे गणेश?'

‘तो समोरच्या गावात एका पाटलाकडे राहातो. तो हिंदू गोसाव्याच्या वेषात आहे.'

‘अरेच्या, मी त्याला पाहिला आहे तर! उंच आहे. थोडा चकणा आहे काय?'

‘होय. त्याच्या शोधात तुम्ही इतके दिवस होता.’

‘आपण त्याला आज पकडणार. पण सावध राहिले पाहिजे.’

‘मी पुढे जातो-'

‘आम्हाला तुमच्याबरोबर राहायला सांगितले आहे. तुम्ही आम्हाला फसवाल किंवा स्वतः पळून जाल.'

‘आता काही तसं होणार नाही. त्याने माझ्या आईचा खून केला आहे व त्याला पकडून मरणाची सजा मिळाली पाहिजे यासाठी मो प्रतिज्ञाबद्ध आहे.’

आम्ही मध्यरात्री त्या खेडेगावात पोहोचलो. सगळीकडे शांतता व अंधार होता. मी म्हटले तुम्ही इथे थांबा. पंधरावीस मिनिटात मी दोघांना घेऊन येतो. त्या शिपायांनी मला जाऊ द्यायला पुन्हा खळखळ केली.

‘मूर्ख आहात. माझ्यावर विश्वास ठेवत नाही?’

‘नाही.’

शेवटी कशीबशी त्यांची समजूत घातली. मी गणेशला घेऊन येतो. हिम्मतही बरोबर असेल, दोघांची हालचाल जरा देखील संशयास्पद वाटली तर बेशक शस्त्र चालवा. गणेश चांगला तरवार बहादूर आहे. येथे थांबा. मी काही मिनिटांत येतो.

मी पुढे गेलो. पाटलाच्या घरापाशी जाऊन त्याच्या नावाने हाक मारली.

‘जसवंत, ओ जसवंत, उठा. बाहेर या. तुमच्या ओळखीचा कुणी दारी आला आहे.'

पाटलाने आतून ओ दिली. दाराची कडी, बोल्ट काढलेले आवाज आले. तो चादर गुंडाळून बाहेर आला.

'कोण आहे?'

‘मी तुझा मित्र अमीर अली. गणेश कुठे आहे?'

‘तो झोपला आहे. कशाला हवा गणेश?'

'बरं, हिंमत कुठाय?'

'तोही झोपलाय, पण तुम्ही इकडे कुठे अपरात्री? तुम्ही कलकत्त्याला गेलात असं कळल होतं’

'तो बेत मी रद्द केला. तुम्ही आत जाऊन गणेशला उठवून बाहेर आणा. माझं महत्त्वाचं काम आहे. त्याला सांगा मी आलोय.'

पाटील आत गेला. मी तेवढयात काही अंतरावर असलेल्या शिपायांना 'सर्व ठीक'ची खूण केली.

पाटीलबुवांनी गणेशाला झोपेतून जागे केले. आणि अर्धवट जागेपणीच त्याला बाहेर आणला.

'अरे अमीर अली, तू इकडे? आणि मध्यरात्री? काय विशेष काम काढलं' गणेशने विचारले.

'या पायऱ्या तर उतरा. आनंदाची बातमी आहे. गणेश सोपा उतरून खाली आला. आम्ही आलिंगनपूर्वक भेटलो. मी एक बनिज हेरला आहे. आपण दोघं त्याला गाठू. खूप लूट आहे.'

‘कुठे?

'त्या पलीकडच्या चिंचबनात.'

‘तुझ्याबरोबर कुणी माणसं आहेत काय?' गणेशला शंका आली.

‘आहेत दोघे चौघे. आपल्यापैकीच आहेत. पण हिम्मत कुठे आहे ? त्यालाही बरोबर घे.'

‘घेतो. तो आत घोरत आहे. त्याला उठवतो. जोडे घालतो व तलवार घेऊन निघतो. तुझे चौघे व माझे पाच जवान आहेत! ठीक?' आपण लूट वाटून घेऊ.

‘चल लवकर.' वेळ घालवायचा नाही.

'ठगीची जागा ठरलीय? ती विहीर बरी आहे. पण तुझे दोस्त, जवान ठग कुठे आहेत.'

'ते काय येताहेत.'

ते आले. त्यांनी हिम्मत व गणेशाला घेरले व त्याच्यावर तुटून पडले. गणेशाला कमरेचा खंजीरही वापरण्याची उसंत मिळाली नाही. दोघे क्षणात गिरफ्दार झाले.

'त्यांचे हातपाय बांधा.' मी हुकूम दिला.

'त्याच्या तोंडातही बोळा कोंबा. तो ओरडून आसपासच्या ठगांची मदत मागेल.'

याप्रमाणे दोघांना पकडले. सकाळपर्यंत त्यांना कोठडीत कोंडले. सकाळी मीच त्याला प्रथम भेटायला गेलो. 'त्याच्या तोंडातला बोळा काढा. बोलू द्या त्याला.'

'शेवटी तू सूड घेतलास. तू विश्वासघाताने मला पकडून दिलेस. तुला माझ्या शिव्या व भवानी देवीचे शाप भोवतील. तुझ अन्न तुला विषासारखे वाटेल. तुझ्या पायात तोंडात किडे पडतील!'

'छान. तू गणेशासारखा बोललास खरा. मी माझा सूड घेतला आहे. माझ्या आईचा तू वध केलास. त्याचा हिशेब आता पुरा होईल.'

'मी त्याचवेळी तुला, अशक्त पोराला मारायला पाहिजे होते. पण इस्माईलवर मी दया केली.'

'ठीक आहे. आता तुला फाशी देताना मी पाहीन तेव्हा मला खरं समाधान होईल.’

'शांत राहा. अमीर, कशाला शब्दावरून शब्द वाढवता? त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा कोर्ट देईल.' अधिकारी म्हणाले.

आम्ही सागराला पोहोचलो. गणेशला जेव्हा कळले की मीच माफीचा साक्षीदार होऊन विश्वासघात करून त्याला पकडून दिले, तेव्हा तो अधिकच चिडला. ठगीच्या धंद्यावरचा मी काळिमा आहे विश्वासघातकी पशू आहे. वगैरे शिव्यांची त्याने पुन्हा फैर झाडली.

गणेशाची रीतसर चौकशी झाली. प्रामुख्याने त्याच्या विरूद्ध माझीच साक्ष झाली. इतर पुरावे ही सादर झाले. त्याला फाशीची सजा झाली. त्याला फाशी देण्यापूर्वी मला त्याला भेटायला मिळावे असा माझा अर्ज होता. माझी इच्छा होती, मरतानाही तू माझ्या आईचा खून केलास त्याचा हा सूड, हे शब्द त्याला ऐकवावे. पण माझा अर्ज फेटाळण्यात आला.

त्यानंतर हिम्मत व इतर वीसएक ठग मी पकडून दिले व फासावर चढवले. पण ते ठग शूर. ते स्वतः फासाच्या फळीवर चढले. त्यांनी त्या मांगाचा स्पर्श होऊ दिला नाही. स्वत:च्या गळ्याला त्यांनी स्वतःच दोरी बांधली व पायाखालची फळी स्वतःच लोटली. मी गणेशला फाशी जाताना पाहिले. मला समाधान वाटले!

माझी आत्मकथा संपली. आता सारे जीवन बेचव व नीरस कंटाळवाणे झाले आहे. त्यानंतर आणखीही काही ठग मी पकडून दिले. पण आता माझ्याजवळ केवळ या बऱ्यावाईट आठवणी उरल्या आहेत.

मी का जगतो आहे? का अनेक संकटातून वाचलो? हा प्रश्न मी मला अनेक वेळा विचारतो. त्याचे उत्तर माझ्याजवळ नाही. आता माझ्या जीवनात सुख नाही, दुःखही नाही. काळजी नाही, आशा नाही, पश्चाताप नाही! काही काही नाही!! अल्लाची इच्छा आहे तोपर्यंत मला जगलं पाहिजे!

माझी जीवनगाथा कधी कधी कंटाळवाणी होत होती परंतु मी काही लपवलं नाही. एका खऱ्या ठगाची एक सत्याधिष्ठित कहाणी आहे ही. अमीर अलीचं आयुष्य, त्याची बरी-वाईट कृत्ये, त्याची धाडसे जगाला कळतील.

मी कसा वागलो व तसाच का वागलो हे फक्त त्या अल्लाला ठाऊक?

सबस्क्राईब करा

* indicates required