f
computer

बैकाल सरोवर : जगातील सर्वात खोल आणि प्राचीन सरोवर !!

मंडळी, आज आपण एका सफरीवर निघणार आहोत. ही सफर असणार आहे जगातील सर्वात प्राचीन आणि खोल सरोवराची. या सरोवराचं नाव आहे ‘बैकाल सरोवर’. हे सरोवर रशियाच्या दक्षिण सायबेरियामध्ये असून जगातील तब्बल २० टक्के गोड्या पाण्याचा साठा याच सरोवरात आढळून येतो. ३ कोटी वर्षांपेक्षा जास्त काळापासून बैकाल सरोवर अस्तित्वात असून त्याची खोली तब्बल ५,३८७ फुट खोल आहे. बैकाल सरोवराची ही ओळख अगदी थोडी आहे राव. 

बैकाल बद्दल पूर्ण जाणून घेऊया पुढील ९ मुद्द्यांच्या आधारे.

१. बैकाल सरोवराची लांबी आहे तब्बल २३,६१५.३९ किमी. राव, यावरून तुम्हाला बैकाल किती मोठं आहे याचा अंदाज येईल.

२. जानेवारी ते मे ह्या दरम्यान बैकाल सरोवर गोठलेल्या स्थितीत असतं. बैकालवर ५ ते ६ फुट जाड बर्फाचा थर साचतो, ज्यामुळे आपण संपूर्ण सरोवर चक्क चालून पार करू शकतो.

३. सर्वात खोल असण्याबरोबरच बैकालचं त्याच्या पारदर्शक पाण्यामुळे देखील ओळखलं जातं. सरोवराच्या आत असलेले जीव आपल्याला अगदी स्पष्ट दिसू शकतात.

४. आजूबाजूला बर्फाळ टेकड्या आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्य या सरोवराच्या देखणेपणात आणखी भर पाडतात.

५. बर्फाला तडे गेल्यामुळे काय होतं ?

सरोवरावर असलेला बर्फाचा भार वाढला की बर्फाच्या थराला तडे जातात. हे तडे तब्बल १० ते ३० किलोमीटर लांब असू शकतात. तडे गेल्यामुळे पाण्यातील सजीवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यात मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात देखील सरोवराच्या आत असलेले जीव जिवंत राहतात.

६. पर्यटकांनी तिथल्या अनुभवाबद्दल सांगताना म्हटलंय की बर्फाला तडे जाण्याचा आवाज जणू वीज कडाडण्यासारखा किंवा बंदुकीतून गोळी झाडण्यसारखा असतो.

७. बैकाल करोडो वर्ष जुने असल्याने या जागी विलक्षण जैवविविधता आढळून येते. प्राण्यांच्या जवळजवळ ७०० वेगवेगळ्या प्रजाती या भागात आढळतात. शिवाय अनेक दुर्मिळ वनस्पतीचं बैकाल सरोवर घर आहे.

८. जगातील गोड्या पाण्यात राहणारा एकमेव सील प्राणी बैकाल मध्ये आढळतो.

९. ऐतिहासिक चिनी पुस्तकांमध्ये बैकालचा उल्लेख ‘उत्तरी समुद्र’ असा आढळतो.

मंडळी, निसर्गाने अनेक आश्चर्य निर्माण करून ठेवले आहेत. बैकाल हे निसर्गाच्या अद्भुत कलाकारीचा नमुना आहे.