computer

रशियातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या या बाईंमुळे जागतिक महिला दिन साजरा होतो.. वाचा त्यांचं कार्य काय आहे..

थेरेसा सर्बर माल्कल!  
हे नाव तुम्ही पूर्वी कधी ऐकलं आहे का? नाही? आज आपण जो जागतिक महिला दिन साजरा करत आहोत त्याचा आणि या नावाचा घनिष्ठ संबंध आहे. कसा तो आम्ही सांगतो... 
मंडळी, एखादा दिवस साजरा करण्यामागे नेमके काय कारण आहे, त्याचा इतिहास काय आहे, हा पायंडा कुणी पाडला हे जाणून घेणे महत्वाचे असते. जर ही माहिती तुम्हाला असेल तर तो दिवस साजरा करण्याचा आनंद द्विगुणित होतो. आता आजच्या जागतिक महिला दिनाचेच उदाहरण घ्या ना..  सर्वांना माहीत आहे की आज महिला दिन आहे, पण याची सुरुवात थेरेसा सर्बर माल्कल या महिलेने केली हे कुणालाच माहीत नाही. दुर्दैवाने थेरेसा आज विस्मृतीत गेल्या आहेत. चला तर मग आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण त्यांची ओळख करून घेऊया… 

थेरेसा यांचा जन्म १ मे १८७४ ला  रशियातल्या बार नावाच्या शहरात एका ज्यू परिवारात झाला. जन्मापासूनच ज्यू विरोधी वातावरणात वाढलेल्या थेरेसा यांना आणि त्यांच्या परिवाराला रशियाच्या त्झार राजवटीत प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यामुळं अनेक कुटुंबे तिथून स्थलांतर करून अमेरिकेत गेली. त्यात थेरेसा यांचेही कुटुंब होते.  १८९१ साली अमेरिकेत  दाखल झाल्यावर थेरेसा यांनी इतर ज्यू लोकांप्रमाणे चरितार्थासाठी मिळेल ते काम  केले. प्रथम एका बेकरीमध्ये, नंतर एका कपड्यांच्या कारखान्यात त्यांना काम मिळाले. त्यांचा मूळ स्वभाव चळवळ्या आणि बंडखोर असल्याने त्यांचे लक्ष कामगार स्त्रियांच्या प्रश्नांकडे वेधले गेले. थेरेसा फक्त प्रश्न बघून गप्प बसणाऱ्या महिला नव्हत्या… त्या प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करू लागल्या आणि त्यातूनच कामगार स्त्रियांच्या संघटनेची निर्मिती त्यांनी केली.  या स्त्री संघटनेतून स्थलांतरित कामगार स्त्रियांचा आवाज उठवण्याचे काम त्या करू लागल्या.

लवकरच त्यांच्या असे लक्षात आले की, फक्त संघटना चालवून भागणार नाही. महिलांना पुरुषांच्या समान हक्क हवे असतील तर राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नाही हे त्यांनी ओळखले. आता त्यांनी कामगार स्त्रियांच्या प्रश्नांसोबतच एकंदरीत स्त्री-पुरुष समानतेवरही लक्ष केंद्रित केले. सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात शिरकाव करून घेतला. त्यावेळी सोशालिस्ट पार्टी ही  एकमेव अशी पार्टी होती ज्यात महिलांना प्रवेश मिळत असे. आम्ही स्त्री-पुरुष भेदभाव करत नाही असा त्यांचं ब्रीदवाक्य होतं. यामुळेच थेरेसा सोशालिस्ट पार्टीकडे आकर्षित झाल्या होत्या. परंतु दुर्दैवाने लवकरच त्यांना सत्य समजले की पार्टीचा नारा फक्त दिखाऊ स्वरूपाचा होता. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत महिलांना नगण्य स्थान मिळत असे. थेरेसा यांनी यामुळे निराश न होता असे ठरवले की, पार्टी न सोडता आपली समांतर विचारधारा चालवून आपले ध्येय साध्य करायला हवे. त्यांनी सोशालिस्ट महिलांची एक वेगळी चळवळ सुरू केली आणि महिलांसाठी राजकारणात एक वेगळे स्वतंत्र व्यासपीठ असायला हवे असे जोरदार मत मांडले. 

शेवटी सोशालिस्ट पार्टीने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच महिलांसाठी वेगळे डिपार्टमेंट बनवण्यात आले. त्याच्या अध्यक्षपदी थेरेसा विराजमान झाल्या. मंडळी, त्या काळी ही गोष्ट अजिबात सोपी नव्हती! एक तर महिला, त्यात अमेरिकेबाहेरील स्थलांतरित कामगार… ही एका नव्या पर्वाची सुरुवात होती! 

या पदावर बसून थेरेसा यांनी महिलांच्या हक्कासाठी लढा दिला. त्यातलाच एक हक्क म्हणजे  महिलांना मतदानाचा अधिकार! तोपर्यंत अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. तो मिळायलाच हवा हा मुद्दा थेरेसा यांनी सर्वांसमोर मांडला आणि बरेच प्रयत्न करून त्यासाठी समर्थन मिळवले. या सोबतच महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी यशस्वीपणे हाताळले. महिलांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण केली. 

थेरेसा यांनी जगाचे लक्ष महिलांच्या समस्यांकडे वेधले जावे म्हणून एक कल्पना मांडली. वर्षातला एक दिवस ‘महिला दिन’ म्हणून साजरा व्हावा हीच ती कल्पना…  सोशालिस्ट पार्टीने त्यांना या बाबतीत साथ दिली आणि अमेरिकेत पहिला ‘राष्ट्रीय महिला दिन’ १९०९ साली २८ फेब्रुवारी रोजी साजरा झाला. ही कल्पना नंतर युरोपियन देशांमध्ये सुद्धा पसरली आणि नंतर जगभरात लोकप्रिय झाली. आज सर्वानुमते जगभरात एकाच दिवशी म्हणजे ८ मार्च रोजी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होतोय या मागे मूळ कारण थेरेसा सर्बर माल्कल या आहेत. 

थेरेसा माल्कल यांचे १७ नोव्हेंबर १९४९ मध्ये निधन झाले. एक स्थलांतर होऊन अमेरिकेत आलेली मुलगी ते अमेरिकेच्या राजकारणातील बलशाली महिला असा त्यांचा थक्क करणारा प्रवास होता. त्यांचे निधन झाल्यावर हळू हळू लोक त्यांना विसरले. आज आपण महिला दिन साजरा करतो पण थेरेसा यांचा उल्लेख कुठेही होत नाही हे दुर्दैवी सत्य आहे मंडळी. 
जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि थेरेसा माल्कल यांना बोभाटाचा सलाम!

 

 

लेखक : अनुप कुलकर्णी

 

सबस्क्राईब करा

* indicates required