computer

या शास्त्रज्ञाला स्त्री असल्यानं नोबेल पुरस्कार मिळाला नाही, पण यांच्या शोधाशिवाय अणूभट्ट्याच आज अस्तित्वात नसत्या!

न्युक्लीयर फिजन म्हणजे अणूच्या केंद्राकाचं विभाजन. या न्युक्लीयर फिजनवर आज २ अत्यंत महत्वाच्या गोष्टी आधारलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अणुबॉम्ब आणि दुसरं म्हणजे अणुशक्ती केंद्र.

...पण जवळजवळ १०० वर्षांपूर्वी वैज्ञानिक या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हते की अणूच्या केंद्रकाचे दोन भाग होऊ शकतात. हा समज दूर केला एका जर्मन महिलेनं. त्यांचं नाव होतं ‘लीझ माईटनर’. त्या एक भौतिकशास्त्रज्ञ होत्या.

११ फेब्रुवारी १९३९ रोजी लीझ माईटनर यांनी एक पत्र तयार केलं आणि हे पत्र त्याकाळच्या प्रसिद्ध ‘नेचर’ या मासिकाला पाठवलं. या पत्रात त्यांनी सविस्तरपणे अणूच्या केंद्रकाचं विभाजन कसं शक्य आहे हे समजावून सांगितलं होतं. या कामात त्यांना ओट्टो फ्रीश या त्यांच्या पुतण्याने मदत केली होती. आज ऑटो फ्रिश हे नाव भौतिकशास्त्राच्या इतिहासात मानाने घेतलं जातं.

लीझ माईटनर यांनी सादर केलेला हा शोध भौतिकशास्त्रात खळबळजनक ठरला. हा शोध नसता तर कदाचित दुसऱ्या महायुद्धाचा शेवट हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात झाला नसता. आजच्या अणुभट्ट्या अस्तित्वात नसत्या. पण त्यांचं नाव आज कुठेच घेतलं जात नाही. याची दोन करणं आहेत. पहिलं कारण त्या ज्यू होत्या आणि दुसरं कारण त्या एक ‘स्त्री’ होत्या.

आज शनिवार स्पेशल मध्ये आपण त्यांची गोष्ट वाचणार आहोत. चला तर सुरु करूया !!

लीझ माईटनर यांनी ‘लिक्विड ड्रॉप्लेट मॉडेल’च्या आधारे आपलं म्हणणं मांडलं होतं. त्यांनी केलेल्या संशोधनात असं आढळून आलं की युरेनियम अणुच्या केंद्रकावरचा प्रभार वाढवल्यास केंद्रक कमकुवत होत जाते. हा प्रभार जर आणखी वाढवला तर अणूच्या केंद्रकाचं दोन भागात विभाजन होतं. या प्रत्येक तुकड्यात प्रचंड प्रमाणात गतिज ऊर्जा असते.

त्यांच्या सहकाऱ्यांनी या शोधाला मान्यता तर दिली नाहीच उलट त्यांनी वेगळीच थियरी मांडली. त्यांच्या मताप्रमाणे अणूच्या केंद्रकावर प्रभार वाढवल्यास केंद्रकाचं विभाजन होण्याऐवजी केंद्रक एकमेकात सामावले जातात. याचा शेवट होतो ट्रान्सयुरेनियम तयार होण्यात.

याच चुकीच्या समजुतीवर प्रसिद्ध महिला शास्त्रज्ञ मारी क्युरी यांच्या कन्या आयरीन ज्युलीयट क्युरी यांचाही विश्वास होता. आयरेन ज्युलीयट यांनी केलेल्या संशोधनात ट्रान्सयुरेनियम घटक खरं तर रेडियम सारखा घटक असल्याचं आढळून आलं. लीझ माईटनरने त्यांनाही चुकीचं ठरवून दाखवून दिलं की अणूच्या केंद्रकाचं विभाजन झाल्यास तयार होणारा घटक रेडियम नसून बोरियम आहे.

एवढा महत्वाचा शोध लावूनही लीझ माईटनर यांना इतिहासातून वगळण्यात का आलं ?

लीझ माईटनरचा सगळा शोध खरा असल्याचं तिच्या सहाय्यक ऑटो हान यांनी सिद्ध केलं. पण तो पर्यंत हिटलरने ज्यूंना मारण्याचं सत्र सुरु केलं होतं. ह्यामुळे त्यांना स्वीडन मध्ये आश्रय घ्यावा लागला. त्यांचं ज्यू असणं आणि स्त्री असणं हे त्यांच्या शोधात अडथळा निर्माण करणारं ठरलं, पण संशोधनासाठी दोन्ही पैकी काहीही सोडणं त्यांना शक्यच नव्हतं.

लीझ माईटनर आणि ऑटो हान हे दोघेही एकत्र काम करत होते. नाझी जर्मनीने युद्ध पुकारल्यानंतर लीझ यांना जर्मनी सोडावं लागलं. त्या स्वीडनची राजधानी स्टॉकहोमला निघून गेली. तिथून त्यांनी पत्राद्वारे ऑटो हान आणि आणखी एका सहकाऱ्याशी संपर्क ठेवला. बोरियमवर झालेलं संशोधन अशा पद्धतीने करण्यात आलं.

(लीझ माईटनर आणि ऑटो हान)

हा सर्व शोध जेव्हा प्रकाशित करण्याची वेळ आली तेव्हा ऑटो हान यांना हे कळून चुकलं होतं की सध्याच्या वातावरणात जर एका ज्यू महिले सोबत त्यांचं नाव लागलं तर जर्मनीतलं त्यांचं करियर धोक्यात येईल. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी लीझ यांचं नाव वगळून हा शोध प्रकाशित केला. त्यांनी असाही दावा केला की हा शोध त्यांनी एकट्याने लावला आहे. लीझ माईटनर यांच्याबद्दल विचारल्यावर ‘लीझ माईटनर यांनी या संशोधनात अगदी क्षुल्लक भूमिका बजावली होती’ असं सांगून त्यांनी सगळे प्रश्न निकालात काढले.

काहीही झालं तरी हा शोध लीझ माईटनर यांचा होता. ऑटो हान यांना हा शोध मांडताच आला नाही. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमध्ये त्यांना हे दाखवता आलं नाही की युरेनियमचं बोरियम मध्ये कसं रुपांतर होतं. काही आठवड्यांनी लीझ माईटनर यांनी पत्र प्रसिद्ध करून ऑटो हान यांची थियरी समजावून सांगितली.

एवढं करूनही लीझ माईटनर यांची कोणी दाखल घेतली नाही. न्युक्लीयर फिजनसाठी १९४४ चा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार ऑटो हान यांना देण्यात आला. गंमत म्हणजे ऑटो हान यांच्या संशोधन दस्तऐवजात कुठेही ‘फिजन’ हा शब्दही नव्हता. लीझ माईटनर हीच या शब्दाची आणि शोधाची जन्मदात्री होती.

१९४४ चा नोबेल पुरस्कार सोहळा या कारणाने वादाचा विषय बनला होता. नोबेल कमिटीवर लैंगिक असमानतेचा ठपका ठेवण्यात आला. अनेकांनी नोबेल कमिटीवर आरोप केले. पण लीझ माईटनर यांना शेवटी सगळे विसरले हेच खरं. नोबेल कमिटीने कधीच आपली चूक कबूल केली नाही.

१९४५ साली महायुद्ध संपल्यानंतरही लीझ माईटनर या स्वीडन मध्येच राहिल्या. त्यांनी स्वीडनचं नागरिकत्व स्वीकारलं. काही वर्षांनी त्यांनी गेलं सगळं विसरून ऑटो हान यांच्याशी संपर्क साधला आणि पुन्हा एकदा त्यांच्याशी मैत्री प्रस्थापित केली.

१९६६ साली अमेरिकन उर्जा खात्याने त्यांना एन्रिको फर्मी हा मनाचा पुरस्कार देऊ केला. या पुरस्काराच्या निमित्ताने त्या पुन्हा एकदा प्रकाशात आल्या. पुढे २ वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. योगायोग म्हणजे ऑटो हान यांनाही त्याच वर्षी मृत्यू आला. दोघेही ८९ वर्षांचे होते.

मंडळी, लीझ माईटनर यांनी शोधून काढलेल्या न्युक्लीयर फिजनने जगाचा इतिहास बदलला, पण त्यांनाच त्यांच्या हयातीत त्यांच्या कामाला शोभेल अशी कीर्ती मिळाली नाही हे दुर्दैव आहे. लीझ माईटनर यांना बोभाटाचा सलाम !!

सबस्क्राईब करा

* indicates required