computer

या २१ संशोधकांचा मृत्यू त्यांच्याच शोधामुळं ओढवून आला..

मंडळी, आमच्यामते गरज नाही, तर आळस ही शोधाची जननी आहे. वीज आणणाऱ्या एडिसनपासून ते फोन आणणाऱ्या ग्रॅहम बेलपर्यंत आणि  टीव्ही-सेलफोन-कार शोधणाऱ्या सगळ्यांचे आपण ऋणी आहोत. इतकंच काय, टीव्हीचा रिमोट शोधून आपल्या आळसात भर टाकणाऱ्या माणसाचेही मंडळ आभारी आहे. 
आज आपण पाहणार आहोत २१  लोकांची यादी.. या यादीतल्या काहीजणांनी यशस्वी शोध लावले पण त्या शोधामुळेच त्यांचा मृत्यू झाला.. काहींनी शोध लावायचे प्रयत्न केले आणि त्यातूनही त्यांचं मरण ओढवलं.. हो, पण म्हणून कुणी काही शोध लावायचं थांबलं नाहीय..  तर पाहूयात कोण आहेत हे बहाद्दर लोक..

१. मारी क्युरी - स्वत:च शोधलेल्या आयोनायझिंग रेडिएशन्सच्या दीर्घकाळ सहवासात राहिल्यानं तिचा मृत्यू झाला.

मारी क्युरी ही नोबेल पारितोषिक मिळवणारी पहिली स्त्री, खरंतर हे इतकं महत्त्वाचं पारितोषिक दुसऱ्यांदा मिळवणारी दुसरीच व्यक्ती.  रेडियम आणि पोलोनियम या दोन मूलद्रव्यांना विलग करण्याची प्रक्रिया शोधण्याचं तिचं सह-संशोधन खूप महत्त्वाचं मानलं जातं.  मात्र  तिच्या संशोधन सामग्रीमधून उत्सर्जित झालेल्या आयोनायझिंग रेडिएशन्सच्या दीर्घकाळ सहवासात राहिल्यानं तिचा मृत्यू झाला.

कॅरेल सॉसेक- याने शोधलेल्या स्टंटमध्ये याचा मृत्यू झाला

जगप्रसिद्ध नायगारा धबधब्यात याने स्वत: डिझाईन केलेल्या बॅरेलमधून त्याला टाकण्यात आलं आणि त्यातून तो सहीसही बचावला. मग त्याने हाच धाडसी खेळ पुन्हा खेळायचं ठरवलं. ह्यूस्टन ॲस्ट्रोडोमवरून (वरून बंदिस्त असलेलं मोठं स्टेडियम) खाली पाण्याच्या टाकीत त्याला  बॅरेलमधून टाकण्यात आलं. हाही खेळ तसा यशस्वी झाला, पण बॅरेलची कडा त्या पाण्याच्या टाकीवर आपटली. सॉसेकला इस्पितळात नेण्यात आलं, पण  काही तासांतच  त्याचं निधन झालं.

जेम्स डग्लस - याचा मृत्यू "स्कॉटिश मेडन" नावाच्या त्याने शोधलेल्या शिरच्छेदाच्या यंत्राने झाला.

सहाव्या जेम्स राजाच्या काळात हा जेम्स डग्लस मॉर्टन परगण्याचा चौथा अर्ल म्हणजे मोठा सरदार होता.  खरंतर या चार सरदारांपैकी हा सर्वात जास्त यशस्वी सरदार होता. त्यानं स्कॉटलंडची राणी मेरी हिच्या काळात चाललेलं यादवी युद्ध जिंकलं होतं. त्या काळात गिलोटिन नावाचं एक यंत्र शिरच्छेद करण्यासाठी वापरलं जात असे. त्यात माणसाला आपली मान अडकवायची असते आणि वरून येणारं पातं ते मुंडकं उडवतं. पण यात बरंच रक्त वाहात असे. म्हणून या जेम्स डग्लसनं "स्कॉटिश मेडन" नावाचं एक स्वच्छ आणि सुरळीत शिरच्छेद करणारं यंत्र आणलं. इंग्लंड-स्कॉटलंडमधल्या युद्धात याला पकडण्यात आलं आणि  हेच यंत्र वापरून एडिनबर्गला त्याच्या शिरच्छेद करण्यात आला.

मॅक्स वॅलिअर - या ऑस्ट्रियन रॉकेट इंजिनिअरचा मृत्यू त्याच्या कार्यशाळेत दारूनं भरलेलं रॉकेट फुटल्यानं झाला.

मॅक्स वॅलिअर हा जर्मन रॉकेटिंरींग सोसायटीचा सदस्य होता. त्यानं १९२० साली वाहनांना अधिक  वेग मिळण्यासाठी लिक्विड म्हणजेच द्रव भरलेलं रॉकेट वापरण्याचा प्रयोग केला होता. हा त्याचा प्रयोग तुफान यशस्वी झाला होता. १९३०च्या मे महिन्यात त्याचं स्वत:चं प्रायोगिक रॉकेट प्रयोगशाळेत फुटलं आणि तिथं त्याचा तत्काळ मृत्यू झाला.

लि सी - याचा त्यानेच त्याच्या राज्यात लागू केलेल्या पाच शिक्षेच्या प्रकारांनी मृत्यू झाला

प्राचीन काळात चीनमध्ये माणसाने काही अपराध केले की त्याला अत्यंत वेदनादायी शिक्षा द्यायची पद्धत होती. या मुख्यत: पाच शिक्षा असत.  काळाप्रमाणे यांचं रूपही बदलत गेलं. तर म्हणजे ३०० गुन्हे केल्यास पुरूषाचं लिंग कापलं जाई, ५०० गुन्ह्यांपायी एक किंवा दोन्ही पाय कापले जात. १००० गुन्ह्यांसाठी भूल न देता नाक कापणं आणि चेहऱ्यावर गोंदवणं अशी शिक्षा होती. सर्वात भयंकर शिक्षा म्हणजे उकळत्या पाण्यात टाकणे किंवा डोकं आणि चारही हातपाय रथांना बांधून ते ओढून शरीरातून निखळवून टाकणं असे. लि सी याचा मृत्यू त्याने शोधलेल्या याच पाच शिक्षेच्या प्रकारांनी झाला.

जिम फिक्स - अमेरिकेच्या फिटनेस क्रांतीच्या पित्याचा मृत्यू धावताना झाला

१९७७मध्ये जिम फिक्सने  धावण्याच्या व्यायामावरती खूप पुस्तकं लिहिली. फिक्समुळेच धावण्याच्या व्यायामाला प्रसिद्धी मिळाली. तो ५२ वर्षांचा असताना धावत असतानाच त्याला हार्ट ॲटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

थॉमस मिगले ज्युनिअर(Thomas Midgley, Jr.) - पोलिओमध्ये मदतीसाठी त्याने बनवलेल्या यंत्रामुळे त्याचा मृत्यू झाला

हा मनुष्य अमेरिकेन केमिस्ट अणि इंजिनिअर होता. वयाच्या ५१व्या वर्षी त्याला पोलिओ झाल्याचं निष्पन्न झालं. मग त्यानं अंथरूणातून उठण्यासाठी मदत म्हणून दोर आणि पुली वापरून एक यंत्र बनवलं. एकेदिवशी त्यात अडकून गळफास लागून त्याचा मृत्यू झाला.

थॉमस अँड्र्यूज- टायटॅनिक डिझाईन केलेल्या नौदल आर्किटेक्टचा टायटॅनिकसोबतच मृत्यू झाला

थॉमस अँड्र्यूज हा एक आयरिश बिझनेसमन आणि आर. एम. एस. टायटॅनिकचा नौदल आर्किटेक्टही होता. त्याला हिमनगांपासून जहाजाला असलेला धोका ठाऊक होता आणि त्यासाठी त्यानं  जहाजावर पुरेशा लाईफबोटी ठेवण्याची सूचनाही केली होती. पैसे वाचवण्यासाठी त्याची सूचना धुडकावून लावण्यात आली. जहाज बुडताना त्यानं बऱ्याच लोकांना लाईफबोटींवर चढण्यासाठी मदत केली. त्याला शेवटचं जहाजावरच्या एका रूममध्ये पाहिलं गेलं होतं. त्याचा मृतदेह मात्र कधीच हाती लागला नाही.

अलेक्झांडर बोग्दानोव - या ब्लड ट्रान्सफ्युजनच्या संशोधकाचा मृत्यू स्वत:वर मलेरिया आणि टीबीच्या रक्ताचा प्रयोग करण्याने झाला.

अलेक्झांडर बोग्दानोव  हे रशियन डॉक्टर आणि तत्त्ववेत्ते होते.  ब्लड ट्रान्सफ्युजनचा प्रयोग करणाऱ्या पहिल्या काही लोकांपैकी ते मानले जातात. पण त्यांचे बहुतांश प्रयोग चिरतारूण्य मिळवणं आणि पुन्हा तरूण होणं याभोवतीच फिरत होते. पण तरीही त्यांनी लावलेले काही शोध हे वैद्यकशास्त्रात खूप महत्त्वाचे मानले जातात. त्यांच्या एका विद्यार्थ्याला मलेरिया आणि टीबी हे दोन्ही रोग झाले होते, त्याचं रक्त घेतल्यानं त्यांनाही हे रोग झाले आणि त्यातच त्यांचं मरण ओढवलं.

मायकेल डाक्र - त्याने शोधलेल्या उडणाऱ्या टॅक्सीतून कोसळून याचा मृत्यू झाला.

या मायकेल डाक्रने AVCEN  जेटपॉडचा शोध लावला. लोक हिला उडणारी टॅक्सीही म्हणायचे. ही टॅक्सी उडू शकायची आणि थोड्या अंतरावर जाऊन लँड होऊ शकायची. २००९च्या ऑगस्टमध्ये डाक्र त्याच्या एका यंत्राचं टेस्टिंग करत होता, पण ती टॅक्सी कोसळली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

होरास लॉसन हन्ले - याने बनवलेल्या लढाऊ पाणबुडीतच याचा मृत्यू झाला.

हन्ले हा एक नौदल इंजिनिअर होता आणि त्याने पहिल्यावहिल्या लढाऊ पाणबुडीचा शोध लावला होता. या पाणबुडीला सीएसएस हन्ले म्हणून ओळखलं जातं. १८६३मध्ये तो एका पाणबुडीचं टेस्टिंग करायला गेला.  ती पाणबुडी दुर्दैवाने पाण्याच्या पृष्ठभागावर येऊ शकली नाही आणि इतर सात लोकांसोबत हन्लेचाही बुडून मृत्यू झाला.

विल्यम बुलॉक - याने शोधलेल्या प्रिटिंग प्रेसमध्येच त्याचा पाय अडकला आणि गँगरीनने मृत्यू झाला

बुलॉकच्या नावे वेब रोटरी प्रिंटिंग प्रेसचा शोध लावण्याचा मान जातो. एकदा फिलाल्डेफियामध्ये हे यंत्र बसवत असताना त्याचा पायच त्या मशीनमध्ये अडकला. जखमी पायाला पुढे गँगरीन झालं आणि पाय कापताना त्याचा मृत्यू झाला.

सिल्व्हेस्टर रोपर - याने शोधलेल्या वाफेवर चालणाऱ्या सायकलचा ॲक्सिडेंट होऊन याचं मरण ओढवलं

रोपरने वाफेवर चालणाऱ्या सायकलीचा शोध लावला होता. ही स्वयंचलित सायकल पहिल्या काही स्वयंचलित यंत्रांपैकी एक मानली जाते. एकदा लोकांना या सायकलीची ट्रायल दाखवताना तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हाच हार्ट ॲटॅक येऊन त्याचा मृत्यू झाला.

ओटो लिलिएन्थल - याने हँडग्लायडरचा शोध लावला, पण तेच कोसळून याचा मृत्यू झाला

ओटोला ग्लायडर किंग म्हणून ओळखलं जातं.  १८९६मध्ये त्याचं ग्लायडर फ्लाईटच्या दरम्यान मध्येच थांबलं आणि ५० फुटांवरून कोसळलं. अपघातानंतर ३६ तासांनी त्याचा मृत्यू झाला.

फ्रान्सिस रेशेल ( François Reichelt ) याने स्वत: शोध लावलेल्या पॅराशूटमधून आयफेल टॉवरवरून उडी घेतली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

फ्रान्सिस रेशेल हा उडणारा शिंपी (Flying Tailor) म्हणून ओळखला जात असे. त्याने अंगात घालता येण्यासारखं पॅराशूट बनवलं होतं. ते घालून त्यानं आयफेल टॉवरवरून उडी घेतली आणि १८७फूट खाली कोसळल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला.

फ्रान्सिस एडगर स्टॅनली - या स्टॅनली स्टीमरच्या सहसंशोधकाचा येणारी वाहतूक चुकवताना त्याच स्टीमरमध्ये मृत्यू झाला.

फ्रान्सिस एडगर स्टॅनली आणि त्याचा जुळा भाऊ मिळून स्टॅनली मोटर कॅरिज कंपनी चालवत. यातूनच या दोघांनी  स्वयंचलित अशा स्टॅनली स्टीमरचा शोध लावला. एकदा आपले हे वाहन चालवताना येणारी वाहतूक चुकवण्याच्या नादात फ्रान्सिस लाकडांमध्ये जाऊन कोसळला पण त्यातच त्याचा मृत्यू झाला.

जॉन फ्रान्कोस पिलात्र द रोझेर (Jean-Francoise Pilatre de Rozier) हॉट एअर बलूनच्या या संशोधकाचा बलून इंग्लिश खाडीवरून जाताना कोसळून मृत्यू झाला.

जॉन फ्रान्कोस पिलात्र द रोझेर हा रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र शिकवणारा एक फ्रेंच शिक्षक होता. याला विमानोड्डाणाचाही प्रवर्तक मानलं जातं. यानं १७८३मध्येच त्यानं बलूनमधून उड्डाण केलं होतं. एका उड्डाणादरम्यान इंग्लिश खाडीवरून जाताना यांचा बलून कोसळला आणि त्यात त्याचा आणि पिअर रोमन या मनुष्याचा मृत्यू झाला.  या अपघताला पहिल्या काही  विमान अपघातांपैकी मानलं जातं.

लुईस स्लॉटिन - एका संशोधनादरम्यान प्लुटोनियमच्या किरणोत्सर्गामुळे याचा मृत्यू झाला

स्लॉटिन  हा अमेरिकन अणूशास्त्रज्ञ होता. याने अमेरिकेच्या यशस्वी अणूचाचणी केलेल्या आणि ॲटमबाँब निर्माण करणाऱ्या मॅनहॅटन प्रोजेक्टमध्येही काम केलं होतं. दुसरं महायुद्ध संपल्यानंतरही या लुईसने आपले प्रयोग चालूच ठेवले.  प्रयोगादरम्यान एकदा प्लुटोनिअमचं जबरदस्त किरणोत्सर्जन झालं. त्याला लगेच आपली चूक कळाली  आणि त्यानं आपलं शरीर किरणोत्सर्जनापासून वाचवणाऱ्या कापडाने झाकून घेतलं आणि सोबतचे इतर लोक प्रयोगशाळेच्या बाहेर पळून गेले. या घटनेनंतर दोन आठवड्यानंतर ३० मे १९४६ रोजी त्याचा मृत्यू झाला.

वलेरियन ॲबकोव्हस्की - यांनी बनवलेल्या ट्रेन-प्लेनचा रूळावरून घसरून झालेल्या अपघातात यांचा मृत्यू झाला

वलेरियन ॲबकोव्हस्की , नावावरूनच कळतं आहे की हा रशियन मनुष्य असावा. याने अतिवेगवान ट्रेन प्लेनचा शोध लावला होता. यासाठी त्यांनी रेल्वेलाच विमानाचं इंजिन लावलं होतं. सोबत विमानाचे पंखेही लावले होते. या वाहनाचा उपयोग रशियन अधिकाऱ्यांना मॉस्कोहून ने-आण करण्यासाठी उपयोग केला जाणार होता. जाताना तर ते सगळे नीट गेले,  पण परतीच्या प्रवासात ही अतिवेगवान विमानरेल्वे रूळावरून घसरली आणि अवघ्या २६व्या वर्षी वलेरियन ॲबकोव्हस्कीचा मृत्यू झाला.

अबू नासर इस्माईल इब्न हम्मद अल् जव्हारी - हाताला बांधलेल्या लाकडी पंखांच्या साह्याने उडण्यासाठी याने एका मशिदीवरून उडी घेतली.

उडण्याचं आकर्षण माणसाला खूप आधीपासून आहे. हा अबू नासर इस्माईल इब्न हम्मद अल् जव्हारी अकराव्या शतकातला इराकमधला संशोधक होता आणि यालाही उडण्याचं जबरदस्त आकर्षण होतं. त्याने लाखडाच्या पंखांना पिसं लावली आणि तिथल्या इमामावर छाप पाडण्यासाठी मशिदीवरून उडी घेतली. पुढे काय झालं असेल हे सांगायची गरज आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required