computer

पन्नास वर्षे टिकणाऱ्या आणि मुरेल तितका रुचकर होणाऱ्या तिबेटमधल्या प्युएर टी बद्दल कधी ऐकलंय?

पूर्वी घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत कसे केले जायचे माहिती आहे? गूळपाणी देऊन! गूळ उसापासून तयार केलेला असल्यामुळे उच्च तापमानाला उसातल्या सुक्रोजचे विघटन होऊन ग्लुकोज व फ्रुक्टोज या शर्करा तयार होतात. त्यामुळे गुळातून त्वरित तरतरी मिळते. आज ही तरतरी देण्याचे काम चहा करतो.

चहा हा आपल्या संस्कृतीचा इतका अविभाज्य घटक बनलेला आहे की घरी आलेल्या कुणालाही पहिल्यांदा साहजिकच चहा विचारला जातो. चहा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती जगभरात आढळून येतात. खुद्द चहाचेदेखील अनेक प्रकार आहेत. ग्रीन टी, ब्लॅक टी, आपल्याकडे बनतो तसा दूध आणि साखर घालून केलेला चहा, व्हाईट टी, पाकिस्तान-अफगाणिस्तानात बनणारा पिंक टी, चीनमधला ऊलाँग टी हे सगळे चहाचेच प्रकार.

असाच एक चहा तिबेटमध्ये मिळतो. याला प्युएर टी असे म्हणतात. हा चहा औषधी आहे आणि तो अगदी पन्नास वर्षेसुद्धा टिकतो. हा चहा तयार करताना चहाची पाने दोन वेळा आंबवली जातात. या प्रकारचा चहा चीनच्या युनान प्रांतात पारंपरिक पद्धतीने बनवला जातो. या प्रदेशात वाढणार्‍या वाइल्ड ओल्ड ट्री नावाच्या झाडाच्या पानांपासून तो तयार करतात. हा चहा सुट्ट्या चहापत्तीच्या किंवा वड्यांच्या स्वरूपात बाजारात विकला जातो. इतर आंबवलेल्या पदार्थांप्रमाणे प्युएर टी शरीराला अनेक पोषकद्रव्ये पुरवतो. या चहामुळे वजन नियंत्रित राहते, पचन मार्गातील उपयुक्त जिवाणूंचे पोषण होते, कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते, कर्करोगाच्या पेशींची वाढ खुंटते, यकृताचे आरोग्य सुधारते असे अनेक समज आहेत. मात्र यावर अजूनही संशोधन सुरू आहे. चहाच्या वड्यांपासून चहा तयार करताना वडी भांड्यात ठेवून त्यावर उकळते पाणी ओततात. नंतर हे पाणी काढून टाकले जाते. हीच क्रिया परत एकदा केली जाते. अशाप्रकारे वडी किंवा चहापत्ती व्यवस्थित धुतली गेल्यानंतर उत्तम स्वादाचा चहा तयार होतो. नंतर या भांड्यात उकळते पाणी टाकून दोन मिनिटे चहा त्यात मुरवला जातो.
 

प्युएर चहा टिकाऊ असतो. पन्नास वर्षे किंवा त्यापेक्षाही जास्त कालावधीसाठी तो उत्तम स्थितीत राहतो. उलट याच्या काही प्रकारांमध्ये चहा जसजसा जुना होतो तसतसा त्याचा दर्जा सुधारत जातो. हा चहा औषधी म्हणून लोकप्रिय होण्यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. या चहाची पत्ती तयार करताना जी आंबवण्याची क्रिया होते त्यामध्ये जीवाणूंचा सहभाग असतो. हे जीवाणू लोव्हास्टेटिन नावाचे रसायन तयार करतात. लोव्हास्टेटिन कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी वापरले जाते. शिवाय या चहात इतर चहा प्रकारांच्या तुलनेत कमी प्रमाणात कॅफिन असतात, अँटिऑक्सिडंट्स मात्र भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे हा चहा आरोग्यदायी मानला जातो.
 

बहुतेक वेळा चहाचे पिक घेणारे शेतकरी वाळलेली चहापत्ती थेट विक्रेत्यांना विकतात, परंतु प्युएर चहाच्या बाबतीत यात अजून एक मधली पायरी आहे. त्यामध्ये शेतकरी वाळवलेली सुट्टी चहापत्ती- जिला माओचा असे म्हणतात- चहाच्या पानांवर प्रक्रिया करणार्‍या लोकांना विकतात. हे लोक विविध ठिकाणांहून आलेली चहाची पत्ती एकत्र मिसळून तिला उष्णता देतात आणि त्यानंतर तिच्यावर उच्च दाबाखाली प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेनंतर चहाच्या विविध आकारांच्या वड्या तयार करतात. या वड्या बाजारात विकल्या जातात. ही परंपरा मिंग राजघराण्याच्या कार्यकाळापासून अस्तित्वात आहे. यामुळे त्या काळी हा चहा दूर अंतरापर्यंत वाहून नेणे शक्य होत असे. आज मात्र चहा जास्त मुरण्यासाठी म्हणजे त्याच्या एजिंगसाठी ही पद्धत वापरली जाते. या वडीमध्ये जसजसा काळ जातो तसतसे सतत बदल होत जातात. त्यामुळे या वडीपासून आज केलेला चहा त्याच वडीपासून अजून सहा महिन्यांनी बनवल्यास चवीला वेगळा लागतो. काही प्रकारचा प्युएर चहा ताजा असतानाच चवीला चांगला लागतो. त्यामध्ये किंचित कडसरपणा आणि उन्हात वाळवल्यामुळे निर्माण होणारा तीक्ष्ण स्वाद यांचा मिलाफ असतो. तर इतर काही प्रकारांमध्ये चहा जितका जुना होईल तितका त्याचा स्वाद उत्तमोत्तम होत जातो.

प्युएर चहाच्या स्वादांमध्ये वैविध्य असले तरीही साधारणतः त्याचे तीन प्रकार पडतात-

यंग रॉ
हा साधारण ग्रीन टी प्रमाणे दिसणारा प्रकार आहे. हा तुलनेने कोवळा आणि ताजा असतो. त्यामुळे त्याला फुलासारखा मंद गोडसर असा स्वाद असतो.

एजेड रॉ
प्युएर चहा पारंपरिक पद्धतीने कसा मुरवावा, म्हणजेच त्याचे एजिंग कसे करावे यासाठी त्याच्यावर कोणत्या प्रक्रिया कराव्यात हे शिकवणारे अनेक अभ्यासक्रम आहेत. पण या सगळ्या पद्धतींमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे या प्रक्रियांमध्ये वापरली जाणारी नियंत्रित उष्णता आणि आर्द्रता. एजेड रॉ या प्रकारच्या चहाचा स्वाद काहीसा कडक असतो आणि तो घशाच्या खालच्या भागात जास्त जाणवतो. याला काहीसा लाकडी, काहीसा मातकट असा स्वाद आहे आणि याच्या विशिष्ट स्वादापेक्षा जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे या चहामध्ये डेव्हलप झालेली विशिष्ट चव.
 

राईप
हा चहा स्वाद संपूर्णपणे खोलवर मुरलेला आणि कडक असा असून तो मॅच्युअर व्हायला अनेक दशके लागतात.
 

खरे चहाप्रेमी रसिक यांतला फरक बरोबर ओळखतात आणि आपल्या पसंतीनुसार चहाची खरेदी करतात.

चहा हे केवळ उत्तेजक पेय नाही, त्याच्याशी संस्कृती जोडली गेली आहे. दिवसभराच्या घराच्या किंवा ऑफिसच्या कामातून एक छोटा ब्रेक घ्यायला ते एक छान निमित्त आहे, गप्पांमधून कुठल्याही गोष्टीचे शेअरिंग करायचे असल्यास ते हक्काचे 'तोंडीलावणे' आहे. जोडीला तो असा हेल्दी असेल तर विचारूच नका! तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टी वगैरे चहाप्रकारांचे प्रेमी असाल तर एकदा हा प्रकारही ट्राय करून पाहायला हरकत नाही. तुमचे काय मत आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required