computer

झायडस कंपनीचे लहान मुलांना न रडवणारे 'नीडल-फ्री व्हॅक्सीन' लवकरच येणार

२०१९च्या शेवटीशेवटी कोरोनाने आपल्या आयुष्यात प्रवेश केला आणि पुढच्या एकाच वर्षात कोरोनाने आपल्या आयुष्याचे गणितच बदलवून टाकले. गेली दोन वर्षे संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या या कोरोना रोगावर लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे आणि अनेक ठिकाणी त्याला यशही मिळाले आहे. अनेक देशांनी वेगाने लसीकरण सुरु केले आहे. यात मागे राहिलेत ती लहान मुले. आतापर्यंत १२-१८ वयोगटातील मुलांना लागू पडेल अशी लस बनवली गेली नव्हती. त्यातच तिसऱ्या लाटेत या वयोगटातील मुलांना संक्रमण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे अनेकांना या तिसऱ्या लाटेच्या अंदाजानेच चिंतेत टाकले होते. पण आता आनंदाची बाब म्हणजे १२-१८ वयोगटातील मुलांसाठी प्रभावी ठरेल अशी लस बनवण्यात यश आले आहे. अभिमानाची बाब म्हणजे लहान मुलांसाठी बनवलेली झायडस कॅडिला कोव्हीड-१९ व्हॅक्सीन ही लस भारतीय बनवटीची असणार आहे. निश्चितच ही एक मोठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

तिसऱ्या लाटेची तीव्रता रोखली जावी म्हणून भारतातही लसीकरणाने गती घेतली आहे. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासूनच लसीकरणाला चांगला प्रतिसाद मळत आहे. सर्वात आधी ४५ वर्षांवरील प्रौढ आणि त्यांनतर १८ वर्षांवरील तरुणांसाठीही लस उपलब्ध झाली. मात्र लहान मुलांचे काय असा प्रश्न होता. किती दिवस ही मुले घरातच कोंडून राहणार? त्यांची शाळा, खेळ, मित्रमैत्रिणींची धमाल हे सगळं नैसर्गिक जगणंच जणू हरवून गेलं आहे. मुलांच्या भवितव्याची चिंता करावी की त्यांच्या आरोग्याची या दुधारी चिंतेत पालक वर्ग भरडला जात आहे. शाळा सुरु झाल्या तरी मुलांच्या जीवाचा धोका टळला असता का? नाही. जोपर्यंत लस मिळत नाही तोपर्यंत तरी काही खरं नाही असंच सगळं चित्र होतं. आता लहान मुलांसाठी झायकोव्हडी (ZyCoV-D), झायडस कॅडिला कोव्हीड-१९ व्हॅक्सीनने आता मुलांच्या आरोग्याच्या बाबतीतही दिलासा दिला आहे. १२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी उपलब्ध असलेली ही भारतातील एकमेव लस आहे.
 

लस म्हटले की लहान मुले किती घाबरतात ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. कडू औषध आणि टोचणारी सुई तर मोठ्यांनाही नको असते. मग मुलांना तरी या गोष्टी कशा हव्याशा वाटतील? मुलांची ही मानसिकता ओळखून झायडसने मुलांसाठी नीडल-फ्री व्हॅक्सीन आणली आहे.
 

झायडस कॅडिला ही भारतातील एक मोठी फार्मा कंपनी आहे. अहमदाबाद मधील या कंपनीनेही मिशन कोव्हीड सुरक्षा अंतर्गत सहभाग घेतला होता. २० ऑगस्ट रोजी डीसीजीआयने झायडसच्या लसीला मान्यता दिली. डीसीजीआयची मान्यता असलेली भारतातील ही सहावी लस असणार आहे. यापूर्वी कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सीन, स्फुटनिकV, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना डीसीजीआयची मान्यता मिळाली होती.

या लसीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही जगातील पहिली अशी लस आहे जी प्लाज्मिड डीएनए लस आहे. प्लाज्मिड डीएनए प्रकारच्या लसी या विषाणूच्या बदलत जाणाऱ्या प्ररुपाशीही लढण्यास सज्ज होतात. त्यामुळे कोरोना व्हायरसचे कितीही म्युटेशन्स झाले तरी या लसीचा प्रभाव कमी होणार नाही. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या ट्रायल फेजचे परिणाम यापूर्वीच इक्लिनिकल मेडिसिन जर्नल ऑफ लान्सेटमधून प्रकाशित झाले आहेत.
 

या लसीचे तीन डोस असणार आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोस असणार आहे तर त्यानंतर २८ दिवसांनी तिसरा डोस असणार आहे. तशीच नीडल-फ्री लस असणार आहे. ही लस टोचण्यासाठी नेहमीप्रमाणे सुई न वापरता फार्माजेट सिस्टीमचा वापर केला जाणार आहे. ज्यामुळे लस घेण्यास मुले का-कू करणार नाहीत. फार्माजेट पद्धतीने दिली जाणारी लस कधी टोचली हेही कळत नाही. त्यामुळे मुलांमधील सुई टोचली जाण्याची भीतीही अपोआप कमी होईल. शिवाय लस दिलेल्या ठिकाणी सूज येणे, दुखणे, गाठ होणे असाही प्रकार होणार नाही.

या लसीचे आणखी एक वैशिष्ट्य हे की, ही लस २-८ डिग्री सेल्सियस तापमानाला साठवली जाऊ शकते. त्याहून अधिक म्हणजे २५ डिग्री सेल्सियस एवढे तापमानही या लसीला मानवते. ही लस येत्या दीड ते दोन महिन्यात सर्वांसाठी उपलब्ध होईल. याच्या किमती किती असतील याबद्दल सध्या तरी कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण ही लस सर्वांसाठी उपलब्ध होण्याआधी झायडस कंपनीच्या साईटवरून याबद्दलचा खुलासा केला जाईल.

या लसीमुळे लहान मुलांमधील कोरोना संक्रमण आणि त्याची तीव्रता रोखण्यास मदत होईल. यामुळे मुलांचे आयुष्य तरी लवकर पूर्वपदावर येईल अशी आशा करण्यास हरकत नाही.

सबस्क्राईब करा

* indicates required