computer

मोबाईल, लॅपटॉप चार्जिंगला लावून विसरण्याची सवय असेल तर या महत्त्वाच्या गोष्टी नक्की वाचा !!

सध्या डेस्कटॉप तसा एकदम आऊटडेटेड झालाय. कारण हातात आहे एकदा चार्ज करून कित्येक तास वापरता येणारा लॅपटॉप आणि मोबाईल. पण आपण करतो काय, रात्री झोपताना या दोन्ही गोष्टी चार्जिंगला लावतो आणि मस्त झोपून टाकतो. 

अशीच एक घटना नुकतीच घडलीय. उत्तर प्रदेशातल्या नोएडातला एक सॉफ्टवेअर इंजिनिअर राहुल कुमार लॅपटॉप रात्री चार्जिंगला लावून झोपला. रात्री लॅपटॉपने पेट घेतला आणि त्या आगीत त्याचा फ्लॅट जवळजवळ जळून खाक झाला. असं म्हणतात की त्याची बायको फ्लॅट बाहेरून बंद करून बाहेर गेली होती.  राहुलकुमार बाथरूमच्या खिडकीतून कसाबसा बाहेर पडला आणि वाचला. तो रूममध्ये झोपला होता, म्हणून वाचला. त्याला झोपेत धूर जाणवला आणि लक्षात आले की काहीतरी झाले आहे. पण तोवर घरभर आग लागलेली होती. लॅपटॉप पूर्णपणे जळाला होता. त्याने गॅलरीत जाऊन लोकांना मदतीसाठी बोलावले, लोकांनी फायरब्रिगेड बोलावले आणि आग आटोक्यात आली. गंमत म्हणजे त्याचा लॅपटॉप स्लीप मोडमध्ये होता असं राहुलकुमारचं म्हणणं आहे.

ही एकच अशी घटना नाहीय. गेल्या महिन्यात ओडिशातला एका माणूस मोबाईल रात्रभर उशाशी चार्जिंगला लावून झोपला होता. अतितापल्याने कदाचित बॅटरीचा स्फोट होऊन आग लागली आणि त्यात त्या माणसाचा मृत्यू झाला. 

मंडळी, अधूनमधून अशा घटना घडत असतात. गॅजेट बंद असले तरी त्यात असलेली बॅटरी चालू असते. त्यामुळे जास्त वेळ चार्जिंग सुरू असल्यास त्याला आग लागण्याचा धोका असतो. पूर्वीच्या मोबाईलमधल्या बॅटरी काढता यायच्या,आताशा तसं करता येत नाही. त्यामुळं बॅटरी खराब झालीय का, फुगलीय का अशा गोष्टी आपल्या लक्षात येत नाहीत. यासाठी खबरदारी म्हणून रात्रभर किंवा दुपारी झोपताना मोबाईल-लॅपटॉप चार्जिंगलालावून ठेऊ नका. गॅजेट एका रूममध्ये चार्जिंगला ठेवून दुसरीकडे बसू नका. शक्यतो तुमच्या डोळ्यांसमोर चार्जिंग होईल असे पाहा. 

इतके करूनही चुकून अशी आग लागलीच तर आग वाढू नये यासाठी आधी घरातले सगळे स्वीच बंद करून द्यावे. मुख्य MCB बंद केल्यास एकदम उत्तम. वीज लवकर आग पकडते. तसेच वीजेमुळे लागलेल्या आगीवर पाणी ओतू नये. वाळू किंवा कमी आग असेल तर कपड्याने आग विझवावी. आग लागल्यावर धूर नाकातोंडात जाऊन गुदमरण्याचा धोका असतो. म्हणून तोंडाला ओलारुमाल बांधून घ्यावा. 

थोडी जागरूकता बाळगल्यास अशा दुर्घटना नक्कीच टाळता येतील.

सबस्क्राईब करा

* indicates required