computer

रशियातल्या आंदोलनात लोक निळ्या चड्ड्या आणि टॉयलेट ब्रश का घेऊन आले? ही आहेत कारणे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा विरोधक अलेक्सी नवेलनीला सप्टेंबर, २०२० साली ‘नोव्हीचो’ या अत्यंत विषारी रसायनाने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अलेक्सी नवेलनी हा पुतीन आणि रशियन व्यवस्थेतील भ्रष्टाचार विरोधी चेहरा मानला जातो.  म्हणून या घटनेची दाखल संपूर्ण जगभर घेतली गेली होती. असं म्हणतात की या मागे खुद्द पुतीन यांचा हात होता. खरं काय ते कोणालाही सांगता यायचं नाही.

(अलेक्सी नवेलनी) स्रोत

अलेक्सी नवेलनीने उभारलेला सरकार विरोधी लढा आता वाढताना दिसतोय. जर्मनीत उपचार घेतल्यानंतर अलेक्सी नवेलनीला रशियात अटक करण्यात आली आणि त्याला तुरुंगात डांबण्यात आलं. त्याची सुटका व्हावी म्हणून त्याच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरलेत. तसं पाहायला गेलं तर अशी आंदोलनं जगभर होतच असतात, मग आम्ही या आंदोलनाचीच बातमी का देत आहोत. तर या आंदोलनामध्ये दिसणारी एक विचित्र बाब म्हणजे आंदोलकांच्या हातात चड्डी, टॉयलेट साफ करण्याचा ब्रश दिसतोय. हा काय प्रकार आहे नक्की?

आंदोलनात लोक झेंडे, फलक घेऊन जातात पण चक्क चड्डी काय करतेय? त्याचं कारण समजून घ्यायला २०२० सालच्या सप्टेंबर महिन्यात जावं लागेल. अलेक्सी नवेलनी म्हणतो की त्याला Federal Security Service च्या गुप्तहेराने विष दिलं. हे विष त्याच्या शरीरात टोचण्यासाठी ते अलेक्सीच्या निळ्या रंगाच्या चड्डीच्या अस्तरात ठेवण्यात आलं होतं.

ही माहिती बाहेर पडल्यानंतर अलेक्सीच्या समर्थकांनी निळ्या चड्डीला आंदोलनात सामील करून घेतलं. एवढंच नाही तर निळ्या चड्डीतले फोटोही काढले.

आता वळूया त्या टॉयलेट ब्रश कडे.

पुतीन यांनी गडगंज पैसा जमा करून ठेवला आहे अशी बातमी नियमितपणे पसरत असते. नुकतंच पुतीन यांच्या एका बंगल्याबद्दलही चर्चा सुरु होती. अलेक्सी नवेलनीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी त्याला काळ्या समुद्रानजीकच्या एका आलिशान बंगल्यात ठेवण्यात आलं होतं. हा बंगला पुतीन यांच्या मालकीचा होता. या संपूर्ण मालमत्तेची किंमत साधारणपणे १३४ कोटी डॉलर्स एवढी होती. अलेक्सी सांगतो की तिथे स्केटिंगसाठी आईस रिंक पासून ते कॅसिनो पर्यंत सगळं काही होतं. या गोष्टी किती महागड्या होत्या याची कल्पना अलेक्सीला तिथल्या बाथरूममध्ये आली. तिथल्या टॉयलेट साफ करण्यासाठी ठेवलेल्या ब्रशवर ७०० युरो किंमत छापलेली होती. ७०० युरो म्हणजे भारतीय रुपयाप्रमाणे जवळजवळ ६१,००० रुपये.

आंदोलकांनी ही गोष्टही लक्षात ठेवून आंदोलनात टॉयलेट ब्रश नाचवले. आंदोलनाच्या फोटोंमध्ये लोकांच्या हातात टॉयलेट ब्रश स्पष्ट दिसतात.

अशा वेगळ्या प्रकारे आंदोलन करण्याची ही इतिहासातली पहिलीच वेळ नाही. Miss America 1969 स्पर्धेच्या वेळी स्त्रीवाद्यांनी स्त्रियांशी जोडलेली उत्पादने जाळली होती. यात ब्रा पासून ते मेकअपच्या सामानापर्यंत सगळ्यांचा समावेश होता.

अलेक्सी नवेलनी आणि त्याला देण्यात आलेल्या नोव्हीचोक विषाबद्दल संपूर्ण माहिती घेण्यासाठी  खालील लेख नक्की वाचा.

थेट पुतीनला दहशत देणारा विरोधक अलेक्सी नवेलनी आणि त्याला मारण्यासाठी वापरलेल्या नोव्हीचोक विषाची गोष्ट!!

 

आजचा हा लेख कसा वाटला, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

सबस्क्राईब करा

* indicates required