पुण्याच्या डिएसपींनी घेतली अनोखी ट्राफिक टेस्ट...बघा भाऊ यातून काय निष्पन्न झालं?

राव, घाईघाईत ट्राफिकचे नियम तोडणारे किंवा अगदी वेगाने गाडी चालवणारे बघितले की मनात प्रश्न पडतो – “एवढी घाई करून कुठे जायचं असतं यांना ??” असाच काहीसा प्रश्न पडला पुण्याच्या डीसीपी तेजस्वी सातपुते यांना. रोज अनेकजण जाणता अजाणता ट्राफिकचे नियम तोडत असतात. काहींना तर (ट्राफिकचे) नियम तोडण्याचा असूरी आनंद होत होतो. पण हे कितपत योग्य आहे, सर्वात महत्वाचं म्हणजे एवढं करून आपण खरंच वेळेची बचत करत असतो का ?
तर, यासाठी तेजस्वी सातपुते यांनी एक लहानसा प्रयोग केला. या प्रयोगासाठी त्यांनी दोघांची निवड केली. त्या दोघांना कात्रज ते शिवाजीनगरपर्यंतचा १० किलोमीटरचा प्रवास करायचा होता. प्रयोगासाठी दोघांनाही एकाच मॉडेलच्या बाईक्स देण्यात आल्या होत्या.
पण गोष्टीत एक ट्विस्ट आहे राव. दोघांपैकी एकाला ट्राफिकचे सगळे नियम पाळायचे होते तर दुसऱ्याला जमेल तेवढे नियम तोडायचे होते. अशा प्रकारे त्यांची परीक्षा घेण्यात आली. या प्रयोगाचा जो निकाल आला तो बघून सगळेच चाट पडलेत. दोघांच्या प्रवासाला लागलेल्या वेळेत फक्त ४ मिनिटांचा फरक होता.
डीसीपी तेजस्वी सातपुते यांचं या प्रयोगासाठी कौतुक होत आहे. ट्विटरवरून तर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याची झलक बघण्यासाठी खालचे ट्विटट्स वाचा.
तर, हा फरक अर्थातच ठिकाणानुसार बदलू शकतो, पण काही मिनिटांसाठी जीवाला धोक्यात घालून वाहन चालवणं योग्य का ? हा प्रश्न तर उरतोच ना राव. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की सांगा.