सुपर ३० : कोण आहेत आनंद कुमार ज्यांच्या बायोपिकची एवढी चर्चा होत आहे !!

कालच्या शिक्षक दिनाचा मुहूर्तावर एका महत्वाच्या चित्रपटाचा पोस्टर रिलीज करण्यात आलाय. या फिल्मचं नाव आहे ‘सुपर ३०’. या सिनेमातून फार दिवसांनी ह्रितिक रोषन एका दमदार भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका आनंद कुमार यांची आहे. 

 

या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे पण अनेकांना प्रश्न पडलाय की हे आनंद कुमार आहेत तरी कोण ? आज आम्ही याच प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय. चला तर जाणून घेऊया आनंद कुमार यांच्याबद्दल...

चित्रपटाच्या नावातच त्यांचं कार्य लपलेलं आहे. “सुपर ३०”. आनंद कुमार यांनी सुपर ३० हा उपक्रम सुरु केला ज्यात दरवर्षी ३० गरीब व मागासलेल्या विद्यार्थ्यांना मोफत IIT JEE चं कोचिंग दिलं जातं. त्यांच्या ‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स’ या संस्थेच्या मार्फत ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. निवडलेल्या मुलांना IIT प्रवेश ते प्रशिक्षणापर्यंत सर्व मदत केली जाते. विशेष म्हणजे याची एक रुपयाही फी घेतली जात नाही. आज त्यांच्या तालमीत तयार झालेल्या ४५० विद्यार्थ्यांपैकी ३९६ विद्यार्थी IIT साठी पात्र ठरले आहेत.

आनंद कुमार यांच्या या उपक्रमाने त्यांचं देशभरात कौतुक तर झालंच पण त्यांच्या कार्याला राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली. 

स्रोत

आनंद कुमार यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते एक गणितज्ञ आणि शिक्षक आहेत. त्यांचे गणितातील शोधनिबंध ‘मॅथेमॅटिकल स्पेक्ट्रम’ सारख्या प्रमुख नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांचा जन्म पटना, बिहार मध्ये झाला. त्यांचे वडील पोस्टात क्लर्क होते. गरिबीमुळे त्यांना त्यांच्या वडिलांनी सरकारी विद्यालयात दाखल केलं. याच शाळेत त्यांच्यात गणिताची आवड निर्माण झाली. पुढे त्यांना आर्थिक कारणांमुळे पापड विकून घर चालवावं लागलं. याच दरम्यान आणखी पैसे कमावण्यासाठी त्यांनी मुलांना गणित शिकवायला सुरुवात केली.

हे वर्ष होतं १९९२ दरम्यानचं. रोजच्या शिकवणीतून त्यांनी ५०० रुपये प्रती महिना भाड्याने क्लास रूम घेतली. या क्लासेस मधूनच पुढे जाऊन ‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स’ उभी राहिली. या क्लासेस मध्ये सुरुवातीला ३६ आणि ३ वर्षात ५०० विद्यार्थी शिकू लागले. त्यांच्या लक्षात आलं की समाजातील हुशार विद्यार्थी फक्त पैश्यांच्या अडचणीमुळे IIT JEE मध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. २००२ साली याच जाणीवेतून सुपर ३० उपक्रम उभा राहिला. आणि त्याला यश देखील आलं.

स्रोत

२००९ साली ‘सुपर ३०’ वर डिस्कव्हरीने एक तासाची डॉक्युमेंट्री तयार केली होती. याच दरम्यान त्यांच्यावर न्यूयॉर्क टाईम्स मध्ये एक मोठी बातमी छापून आली. आनंद कुमार यांना हार्वर्ड सारख्या विद्यापीठात त्यांच्या कार्याबद्दल सांगण्यास निमंत्रित केलं गेलं. यानंतर मात्र सुपर ३० एक लहानसा उपक्रम राहिला नाही. ती एक चळवळ झाली.

मंडळी, शिक्षक दिनी ज्यांच्या समोर नतमस्तक व्हावं अशा लोकांमध्ये आनंद कुमार यांचं नाव येतं. त्यांच्या आयुष्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी २५ जानेवारी, २०१९ पर्यंत थांबावं लागेल.

स्रोत

ह्रितिकसाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी हा सिनेमा खास असणार आहे. खूप दिवसांपासून ही ओरड होती की भारतात गुन्हेगारांवर सिनेमे बनतात पण आता एका अस्सल शिक्षकाची प्रेरणादायी कथा आपल्या भेटीला येत आहे. पोस्टर बघून घ्या !!

सबस्क्राईब करा

* indicates required