इंग्लंडकडून भारताला स्वातंत्र्य दिनाची खास भेट !! ५७ वर्षांपूर्वी चोरीस गेलेली मूर्ती परत पाठवली

मंडळी, इंग्लंडने ७२ व्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ५७ वर्षांपूर्वी चोरलेली मूर्ती भारताला परत केली आहे. ही मूर्ती १२ व्या शतकातील बुद्ध मूर्ती असून ती नालंदा येथून चोरण्यात आली होती. मूर्ती कोणी चोरली हे तर समजू शकलेलं नाही, पण लंडनच्या लिलावात ती आढळून आल्यानंतर ती भारताला परत देण्यात आली आहे. चला याविषयी अधिक जाणून घेऊया....

स्रोत

त्याचं झालं असं, ऑगस्ट १९६० साली भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या म्युझियम मधून १४ मूर्त्यांची चोरी झाली होती. त्यानंतर या मूर्त्यांचा कधीच शोध लागला नाही. ५७ वर्षांनी १४ पैकी एक मूर्ती लंडनच्या लिलावात आढळून आली. लिंडा अल्बर्टसन आणि भारताचे विजय कुमार यांचं कौतुक केलं पाहिजे,  कारण त्यांनीच या मूर्तीची बरोबर ओळख पटवून ती नालंदाची असल्याचं पक्कं केलं. 

लिंडा अल्बर्टसन या कलेच्या चोरी विरोधात कार्यरत असणाऱ्या ‘एआरसीए’ संस्थेशी निगडीत आहेत, तर विजय कुमार हे इंडिया प्राईड प्रोजेक्टचे अधिकारी आहेत. दोघांनी मूर्तीच्या मालकाशी आणि डीलरशी संपर्क साधून त्यांना ही माहिती दिली. आणि हो, सर्वात महत्वाचं म्हणजे मूर्ती चोरीची असल्याने दोघांची चौकशीही करण्यात आली. पण खरंतर ही मूर्ती ५७ वर्ष अनेकजणांकडून या लिलावापर्यंत पोहोचली होती. 

मालक आणि डीलरला याची माहिती मिळताच त्यांनी सुद्धा सहकार्य केलं. अशा पद्धतीने अखेरीस ही मूर्ती भारताकडे परतली आहे. स्वातंत्र्य दिनाचं निमित्त साधून ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात स्कॉटलंड यार्डतर्फे मूर्तीला भारतीय राजदूतांकडे सोपवण्यात आलं. दोन देशांच्या अधिकाऱ्यांनी एकत्र मिळून काम करण्याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

मूर्तीविषयी थोडक्यात...

स्रोत

ही बुद्ध मूर्ती ब्राँझची आहे आणि तिच्यावर चांदीचा मुलामा चढवण्यात आला आहे. असं म्हणतात की ती १२ व्या शतकातली आहे. या मूर्तीचा शोध लागल्यानंतर ती नालंदा येथील पुरातत्व खात्याच्या संग्रहालयात ठेवण्यात आली होती. तिथून अज्ञात व्यक्तीने ती चोरली. पण तिचा प्रवास लंडनपर्यंत कसा झाला हे अद्याप गुपित आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required