computer

गुगल मॅप्समुळे कोचीच्या किनाऱ्याजवळ नवे बेट कसे सापडले? हे बेट तिथे आले कुठून?

गुगल मॅप्सवरवर आपण रस्ते, हॉटेल्स, बिल्डिंग, रेल्वेमार्ग अश्या अनेक गोष्टी पाहू शकतो आणि शोधू शकतो. पण गुगल मॅपच्या एका सॅटलाईट फोटोमुळे चक्क समुद्राखालील एका बेटाचा शोध लागलाय. हे बेट असे अचानक कसे तयार झाले? यावर तज्ञांचा अभ्यास चालू आहे. या बेटाचा फोटो सगळीकडे व्हायरल होतोय. पाण्याखाली गेलेले हे बेट कधी तयार झाले असावे यावर खूप चर्चा होतेय.

केरळमधील कोचीच्या पश्चिम समुद्र किनाऱ्याच्याजवळ हे बेट दिसत आहे. या बेटाचा आकार एखाद्या काजूसारखा आहे. बेट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जे दिसतं तसा या बेटाबाबत नाही. हे बेट पूर्णपणे पाण्यात बुडालेले आहे. आकाराबद्दल बोलायचे बेटाचा आकार पश्चिम कोचीच्या क्षेत्रफळाच्या अर्ध्या भागाइतका मोठे आहे. चेल्लनम कारशिका टूरिझम डेव्हलपमेंट सोसायटीने केरळ यूनिवर्सिटी ऑफ फिशरीज अँड ओशनस्टडीजच्या (KUFOS) अधिकाऱ्यांना पत्र लिहून याची  माहिती दिली. आणि पुढे चौकशी करण्यास सांगितले आहे. अ‍ॅकेएक्स जुलप्पन यांच्या म्हणण्यानुसार या बेटाची लांबी ८ किमी आणि रुंदी ३.५ किमी आहे.

हे रहस्यमय बेट कसे बनले याचा शोध घेतला जात आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही पाण्याची संरचना आहे, त्यामुळे असा आकार दिसत आहे. KUFOSचे कुलगुरू के. रिजी जॉन यांच्या म्हणण्यानुसार हे बेट इतर बेटांसारखेच आहे, त्याचा आकार देखील असाच आहे. हे बेट वाळू किंवा चिकणमातीपासून बनले असावे. पण तपासणी झाल्याशिवाय नक्की सांगू शकत नाही.

कोचीन बंदरात खोदकाम चालू असताना कदाचित त्यामुळे हे बेट तयार झाले असावे. किंवा समुद्रातील लाटांमुळे असा आकार तयार झाला असावा. तिथले काही अधिकारी म्हणतात की, हा आकार गेले चार वर्षांपासून दिसत आहे. याखेरीज महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेटाचा आकार अजिबात वाढलेला नाही. सध्यातरी प्रत्येकजण अनेक वेगवेगळी माहिती सांगत आहे. 

समुद्राच्या पाण्याखाली हे रहस्यमय बेट दिसल्यापासून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आता तज्ञ आणि अधिकारी यावर संशोधन करत आहेत. या रहस्याचा उलगडा होण्याची उत्सुकता असली तरी, सध्यातरी वाट पाहावी लागेल.

लेखिका: शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required