काय म्हणता, अमेरिकेला जायचं असेल तर फेसबुक-ट्विटर अकाऊन्टची माहिती द्यावी लागेल ??

मंडळी, अमेरिकेला जायच्या बेतात असाल तर थोडं थांबा. आधी तुमच्या सोशल मिडिया अकाऊंट्सची माहिती काढा. अहो, आता अमेरिकेचा व्हिसा पाहिजे असेल तर तुमच्या सोशल मिडिया अकाऊन्टची माहिती द्यावी लागणार आहे. नवीन नियम लागू झालाय राव. चला तर संपूर्ण माहिती घेऊया.
मंडळी, आश्चर्याचा धक्का बसला ना ? व्हिसासाठी आजवर कोणत्याही देशाने सोशल मिडिया अकाऊन्टची माहिती मागितली नव्हती. पण ट्रम्पतात्यांच्या राज्यात हे घडलं आहे. अमेरिकेत पाऊल ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सोशल मिडिया अकाऊन्टची माहिती, ५ वर्षांचे ई-मेल अॅड्रेस आणि फोन नंबर्स सादर करावे लागणार आहेत.
काल परवापर्यंत ज्या देशात अतिरेक्यांचा तळ आहे, अशा देशांच्या बाबतीतच हा नियम लावला जायचा, पण आता तो प्रत्येक देशातल्या नागरिकांवर लावण्यात आला आहे. या नियमाबाबत गेल्या वर्षापासून चर्चा चालू होती. एका मानवाधिकार संस्थेने या नियमाचा काही उपयोग होणार नाही असं म्हटलं होतं. कारण सोप्पंय राव. हा नियम समजल्यावर प्रत्येक व्यक्ती आपलं सोशल मिडिया अकाऊंट साफसूफ करून ठेवेल. जेणेकरून कोणालाही कसली शंका येणार नाही. प्रत्येक नियमात लोक पळवाट शोधतातच.
मंडळी, खोटं बोलणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. व्हिसा तर मिळणार नाहीच, पण इतर चौकशीतून जावं लागेल.
आधीच म्हटल्याप्रमाणे हा नियम ट्रम्पतात्यांच्या राज्यात लावण्यात आलाय. त्याला कारणही तसंच आहे. २०१६ साली जेव्हा ट्रम्प निवडणुकीला उभे होते, तेव्हा त्यांच्या निवडणूक प्रचाराचा मुख्य मुद्दा हा बाहेरून येणाऱ्यांवर कडक निर्बंध लावणे हाच होता. निवडणूक आल्यावर त्यांनी त्याप्रमाणे पावलं उचलली आहेत.
तर मंडळी, अमेरिकेला जाताना सोशल मिडिया अकाऊन्ट तपासून घ्या आणि तशी माहिती सादर करा.