खरपूस तळलेले पाणी? इंटरनेटवर ट्रेंड होणारा हा नवीन विचित्र पदार्थ पाह्यला का?
गेले पूर्ण वर्षभर सगळेजण घरात बसून होते. कोणाला भेटायची किंवा कुठेही जायची सोय नव्हती. अशा वेळी सगळ्यांनी काय केले असेल? वर्क फ्रॉम होम चालू असतानाच अनेक प्रयोग करण्यात आले. यातले जास्तीत जास्त प्रयोग स्वयंपाकघरात झाले. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नवनवीन पदार्थ बनवणे, त्याचे फोटो सोशल मिडीयावर शेयर करणे आणि खाणे. हा सर्वात मोठा ट्रेंड चालू होता. त्यातला कुकर केक आणि डाल्गोना कॉफीचा ट्रेंड कोण विसरू शकेल? घरोघरी हे पदार्थ बनवले गेले आणि सोशल मिडीयावर त्याचीच चर्चा होती.
हे झाले सहज सोपे पदार्थ! पण काहींना विचित्र पदार्थ एकत्र करून नवा पदार्थ बनवायची खूप हौस असते. म्हणजे च्यवनप्राश आईस्क्रीम, न्युटेला बिर्याणी हे विचित्र कॉम्बो फूड ही खूप व्हायरल झाले. असाच एक फूड ट्रेंड सध्या खूप चालतोय. तो म्हणजे तळलेले पाणी. होय! बरोबर वाचलेत, Deep-Fry Water.
अनेक युट्यूबर्स हे पाण्याचे पदार्थ बनवून फॉलोअर्स वाढवत आहेत. याची सुरुवात २०१६ साली सॅन-फ्रान्सिस्को Stupid Sh** नावाच्या कार्यक्रमात जोनाथन मार्कस याने केली. त्याने पीठ, पॅनको क्रंब्स आणि अंडी यांचे आवरण करून पाणी शेंगतेलात तळलेले होते. तेव्हा सगळयांना धक्का बसला होता. नंतर २०२० मध्ये यूट्यूबर्सचे पेव वाढत होते. फूड चॅनेलला जगभरात फॉलोअर्स मिळतात त्यामुळे नवनवीन काही शोधायचा प्रयत्न हे फूड ब्लॉगर्स करत होते. केमिकल इंजिनिअर जेम्स ऑरगिल याने त्याच्या चॅनेलवर ही रेसिपी दाखवली आणि ती तुफान गाजली. त्याच्या चॅनेलचे नाव आहे the action Lab. जानेवारीत त्याने तळलेल्या पाण्याची रेसिपी पोस्ट केली व ती ट्रेंड झाली.
जेम्स सोडीयम अल्जीनेटचा वापर करतो. हे पाण्यात विरघळते. कॅल्शियम क्लोराईडमध्ये असलेल्या केमिकल घटकांमुळे पाणी घट्ट होण्यास मदत होते. नंतर दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात कॅल्शियम क्लोराईड टाकून, सोबत सोडीयम अल्जीनेट मिश्रित पाणी घातले जाते. हे एकत्र झाले की पाणी घट्ट गोळ्यासारखे होते आणि ते गोळे हाताने काढून अंडी, ब्रेड क्रंब्स आणि पीठात मिसळले जातात आणि नंतर तेलात तळले जातात. अश्या पद्धतीने जेम्स तळलेले पाणी तयार करतो. त्याचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ ९ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.
तळलेल्या पाण्याची रेसिपी अजून एका युट्युबरला स्टार बनवून गेली आहे. तो केवळ १८ वर्षाचा असून त्याचे नाव ईटन बर्नाथ आहे. याचे तर ४ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. पण याची रेसिपी वेगळी आहे. हा पाण्याला थंड करून त्याचे गोळे करतो. पाण्यात तो आगर मिसळतो. हा एक वनस्पती पासून बनवलेला जिलेटीन सारखा पदार्थ आहे. आगर पाण्यात घालून बरोबर एक मिनिटं उकळायचे आणि मग ते आईस ट्रे मध्ये घालून फ्रिजर मध्ये ठेवायचे. त्याचा बर्फ झाल्यावर काढून तो लगेच अंडी, ब्रेड क्रंब्स आणि पीठात घोळून तळून घ्यायचे. भजी सारखा दिसणारा हा अजब पदार्थ तयार!
जेव्हा बर्नाथला याची चव विचारली तेव्हा त्याने अक्षरशः तोंड वाकडे केले. हे एका जिलेटीन सारखे लागले असं तो म्हणाला. चव अजिबात चांगली नाही, पण काहीतरी वेगळे करावे म्हणून हे प्रयोग करायचे आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे. हा ट्रेंड युट्युबवर सर्रास चालतो. आता अनेक चॅनेल्सवर ही रेसिपी दिसते.
परंतु असं काही करायला गेलात तर सगळ्यात महत्वाची सूचना सांगायला कोणी विसरत नाही. ती म्हणजे, हा पदार्थ घरी बनवायला जाऊ नका. कारण तळलेल्या पदार्थात पाण्याचा एक थेंब ही पडला तर काय होते पाहिले असेल. तेल तडतडते. जास्त पाणी पडल्यास तेलाचा भडका उडू शकतो आणि अपघातही होऊ शकतो. हा एक प्रयोग म्हणूनच पहा.
यावर अनेक वेगवेगळ्या कमेंट आल्या, "हा पदार्थ खातात की पितात?", "ज्यांना डाएट करायचे आहे त्यांनी या व्हेगन भजी नक्की खा". काहींना गंमत वाटली तर, "काहींनी हे फुकटचे उद्योग कशाला करायचे?" असेही सल्ले दिलेत.
अश्या काही हटके गोष्टी करायचा ट्रेंड कोणाचे नुकसान करू नये म्हणजे झालं. तुम्ही खाल का तळलेल्या पाण्याची भजी?
लेखिका: शीतल दरंदळे
अशा विचित्र पदार्थांची यादी पाहण्यासाठी हा लेख नक्की वाचा:
नवीन डिश बनवण्याच्या नादात हे काय होऊन बसलं ?...फसलेल्या प्रयोगाचे १० नमुने पाहा !!




