Z+, Z, Y आणि X सिक्युरिटी म्हणजे काय ? जाणून घ्या भारतातल्या 'सिक्युरिटी लेव्हल्स' विषयी !!

भारतात काही विशिष्ट व्यक्तींना पोलीस किंवा स्थानिक प्रशासनातर्फे सुरक्षा प्रदान केली जाते. या महत्त्वाच्या किंवा अति महत्वाच्या व्यक्तींच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे. संभाव्य धोक्याची पातळी किती आहे यावरून कोणत्या दर्जाची सुरक्षा द्यायची हे ठरवले जाते. आपल्या भारतामध्ये व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या सुरक्षेला चार भागात विभागले गेले आहे. तुम्ही बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रात हे शब्द नक्कीच ऐकले, वाचले असतील. उच्चतेनुसार उतरत्या क्रमवारीने पुढील प्रमाणे ‘सिक्युरिटी लेव्हल्स’ आहेत. - Z+, Z, Y आणि X.
मंडळी, सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या आपल्यासारख्या लोकांच्या जीवाला धोका तसा कमीच असतो. असला तरी आपल्याला सरकारी सुरक्षा मिळणे दुर्लभच आहे. परंतु राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार, न्यायाधीश, बिझनेसमन, क्रिकेटर्स, फिल्म स्टार्स, समाज मान्यता पावलेले साधू संत यांच्या सारख्या व्यक्तींना सुरक्षा ही लागतेच! काही वेळा एखाद्या घटनेत महत्वाचे स्थान बजावणाऱ्या सामान्य व्यक्तीना सुद्धा सुरक्षा प्रदान करता येते.
समजा, कुणाला धमकी मिळाली तर ती व्यक्ती आपले निवासस्थान ज्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येते त्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन सुरक्षेची मागणी करू शकते. ही केस गुन्हे अन्वेषण विभागाकडे जाते. त्या व्यक्तीला खरोखर धमकी मिळाली आहे का याची शहानिशा करून नंतर पुढील गृहखात्याकडून सुरक्षा देण्यासंदर्भी मान्यता घेतली जाते.
आता आपण पाहूया चार सिक्युरिटी लेव्हल मध्ये काय फरक असतो.
1. Z+ प्रकारची सुरक्षा
झेड प्लस ही भारतातील सर्वात उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था आहे. यामध्ये एका व्यक्तीच्या सुरक्षेसाठी तब्बल 55 कर्मचारी एका वेळी कार्यरत असतात. त्यात दहापेक्षा जास्त NSG (नॅशनल सिक्युरिटी गार्ड) आणि इतर पोलीस समाविष्ट आहेत. यातील प्रत्येक कमांडो हा मार्शल आर्ट्स मध्ये निपुण असतो व विनाशस्त्र आमने सामने मुकाबला करण्यासाठी तयार केलेला असतो. झेड प्लस सिक्युरिटी ही NSG द्वारे दिली जाते. या सिक्युरिटी मध्ये नवीन जमान्याच्या MP5 गन्स आणि आधुनिक गॅजेट्स वापरली जातात. भारतातील केवळ 12 ते 17 अति अति महत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा दिली गेली आहे. ज्यात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि इतर काही व्यक्ती समाविष्ट आहेत.
2. Z प्रकारची सुरक्षा
झेड सुरक्षा ही दुसऱ्या क्रमांकाची सुरक्षा श्रेणी मानली जाते. झेड सिक्युरिटी मध्ये एकूण 22 कर्मचारी कार्यरत असतात. त्यात 4 ते 5 NSG कमांडो आणि बाकी पोलीस दलातील व्यक्ती असतात. झेड सिक्युरिटी दिल्ली पोलीस अथवा CRPF द्वारे पुरवली जाते. यात एक संरक्षक कारचा देखील समावेश असतो. ही सुरक्षा घेणाऱ्या व्यक्तींमध्ये योगा गुरू रामदेव आणि सिने अभिनेता आमिर खान अशा व्यक्ती सामील आहेत.
3. Y प्रकारची सुरक्षा
ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. वाय दर्जाच्या सिक्युरिटी मध्ये एकूण 11 कर्मचारी असतात ज्यात 1 किंवा 2 कमांडो आणि बाकी पोलीस ऑफिसर्स कर्तव्य बजावत असतात. यामध्ये 2 PSO (Personal Security Officer) सुद्धा असतात. भारतामध्ये बऱ्याच महत्वाच्या व्यक्तींना ही सुरक्षा प्रदान केली गेली आहे.
4. X प्रकारची सुरक्षा
एक्स सिक्युरिटी ही चौथ्या क्रमांकाची सुरक्षा व्यवस्था आहे. यामध्ये 2 कर्मचाऱ्यांचे संरक्षण मिळते. यात कमांडो सामील नसतात तर 2 पोलीस ऑफिसर्स संरक्षणासाठी तैनात असतात. सोबतच 1 पर्सनल सिक्युरिटी ऑफिसर सुद्धा या सुरक्षा श्रेणीत असतो. भारतात अनेक व्यक्तींना एक्स दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे.
मंडळी यासोबत आणखी एका प्रकारची सुरक्षा व्यवस्था भारतात आहे. त्याला म्हणतात SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप). ही व्यवस्था फक्त भारताच्या पंतप्रधानांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात आली होती. नंतर काही विशिष्ट कारणांमुळे कायदेशीर बाबींची पूर्तता करून ही सुरक्षा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आली आहे.
जाता जाता :
India booming VVIP numbers 579092, china’s 435, and USA 252 ही पोस्ट सध्या WA वर फिरते आहे, तुम्ही जर ही पोस्ट वाचली असेल तर विसरून जा कारण ही पोस्ट तद्दन खोटी आहे ।. खरा आकडा 450 च्या आसपास आहे. तुम्ही जर गृहमंत्र्यालयाच्या संस्थळावर गेलात तर याविषयी माहिती मिळेल.
तर मंडळी कशी वाटली ही माहिती? आम्हाला कमेंट्स मधून अवश्य कळवा...
आणखी वाचा :
भारतासाठी ‘राफेल’ महत्वाचं का आहे ? जाणून घ्या राफेल विमानाची १० प्रमुख वैशिष्ट्ये !!
सर्जिकल स्ट्राईकमध्ये वापरलेल्या शस्त्रांची घेऊया दसऱ्याच्या निमित्ताने खास माहिती !!!
भारताकडे आहेत या 8 कमांडो फोर्स : नाव ऐकूनच शत्रूला फुटतो घाम!