ट्रेड ड्रेस नेमकं आहे काय? कॉपीराइटचा या ड्रेसशी काय संबंध आहे ?
काय मंडळी, तुम्ही sansung कंपनीचा फोन पाहिला आहे काय? बरं, nokai कंपनीचा तरी पाहिला असेल? किंवा soni? कधी coka kola कोल्ड्रिंक पिलंय? बरं, bysleri मिनरल वॉटर तरी घेतलं असेल…
अरेच्चा! बोभाटावाले स्पेलिंग चुकवू लागले असं वाटतंय का तुम्हाला? तर तसं नव्हे. जेव्हा एखादी कंपनी किंवा तिचे प्रॉडक्टस लोकप्रिय होतात तेव्हा त्या प्रॉडक्टसचे डुप्लिकेट सुद्धा मार्केट मध्ये येतात. मूळ कंपनीच्या लोकप्रियतेचा फायदा घेणे आणि आपले कमअस्सल दर्जाचे प्रोडक्ट ग्राहकांच्या माथी मारणे हा एकच उद्देश या डुप्लिकेट वाल्यांचा असतो. वरती उल्लेख केलेल्या नावाच्या कंपन्या खरोखर अस्तित्वात होत्या.
जास्त नाही, अगदी काही वर्षांपूर्वी जेव्हा मोबाईलचे पेव फुटले होते तेव्हा अनेक दिग्गज मोबाईल कंपन्या मार्केटमध्ये प्रस्थापित झाल्या. त्यात प्रामुख्याने नोकिया, सॅमसंग, सोनी आदी मोठ्या कंपन्या आघाडीवर होत्या. त्याच वेळी त्यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या sansung, nokai वगैरे चायनीज कंपन्यासुद्धा मार्केटमध्ये आल्या. अर्थात, यांचा दर्जा मूळ कंपनीच्या कितीतरी पटीने खालचा होता. परंतु जवळपास सारख्या असणाऱ्या नावामुळे, सारख्याच डिझाईन आणि लोगोमुळे या चायनीज फोन्सचीसुद्धा तडाखेबंद विक्री झाली. कोकच्या बाटली सारख्या दिसणाऱ्या बाटल्या तयार करून लोकल शीतपेये तुफान विकली गेली.
मंडळी, ट्रेडमार्क किंवा कॉपीराईट हे शब्द आपण नेहमी ऐकतो आणि वाचतो. या दोन्ही बाबींविषयी आपल्याला बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. पण एखाद्या प्रॉडक्टची डिझाईन, त्याचे दृश्य स्वरूप जसेच्या तसे कॉपी करून ग्राहकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार जेव्हा घडतो तेव्हा मात्र आपल्याला ट्रेड ड्रेस (Trade dress) कायद्याचा आधार घ्यावा लागतो. हे ट्रेड ड्रेस नेमकं आहे काय? या कायद्याचा भंग केला तर काय होते? चला तर नुकत्याच घडलेल्या एका घटनेवर नजर टाकून आपण हे समजून घेऊ.
फेरेरो स्पा ही चॉकलेट बनवणारी जगातली एक दादा कंपनी. या कंपनीचे फेरेरो रॉशर (Ferrero Rocher) हे प्रीमियम कॅटेगरी चॉकलेट सुप्रसिद्ध आहे. या चॉकलेटची चवच नव्हे, तर आकर्षक बाह्यरुपसुद्धा लोकप्रिय आहे. याचे एकमेवाद्वितीय पॅकेजिंग हा चॉकलेटचा एक युएसपी म्हणून ओळखला जातो. आता एवढं भारी चॉकलेट म्हटल्यावर साहजिकच याचे डुप्लिकेटसुद्धा मार्केटमध्ये येणारच. पण फेरेरो ही काय साधी सुधी कंपनी नाही मंडळी. त्यांनी आपले डिझाईन आधीच ट्रेड ड्रेस कायद्याखाली नोंदवले असल्याने त्याची नक्कल करणाऱ्या कंपनीला चांगलीच अद्दल घडवली गेली. कशी ते आपण पाहणारच आहोत पण तत्पूर्वी ट्रेड ड्रेस म्हणजे काय यावर एक नजर टाकूया…
ट्रेड ड्रेस म्हणजे काय?
ड्रेस नावातूनच बाह्यरुप असा अर्थ स्पष्ट होतो. फक्त इथे ड्रेस कुठल्या व्यक्तीचा नसून वस्तूचा असतो. म्हणजेच त्या वस्तूचा आकार, त्याची लांबी रुंदी उंची म्हणजेच एकूण माप, त्यावरचा आकृतिबंध (pattern), त्या वस्तूवर असणारी डिझाईन, रंग, ग्राफिक्स इत्यादी गोष्टी एकत्र मिळून वस्तूचे बाह्यरुप तयार होते. त्या वस्तूला विशिष्ट ओळख मिळते आणि या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम लोकांचा मनावर ठसल्याने ते त्या वस्तूला ओळखू लागतात. उदाहरणार्थ, समोर असलेली चार चाकी नॅनो आहे होंडा सिटी हे आपण नाव न वाचता ओळखू शकतो ना? कारण आपल्या मनात त्या चारचाकीचे बाह्यरूप ठसलेले असते.
तर या ट्रेड ड्रेसची नोंदणी त्या प्रॉडक्टची मालक असणारी कंपनी करते. त्यामागे आपल्या स्पर्धकाने त्याची कॉपी करू नये हा उद्देश असतो. खऱ्या प्रॉडक्टचा आभास निर्माण करून खोटे प्रॉडक्ट विकले गेले तर त्याचा परिणाम खऱ्या प्रॉडक्टवर होतो यासाठी नोंदणी करणे आवश्यक ठरते. जर या ट्रेड ड्रेसचे कुणी उल्लंघन केले तर मूळ कंपनी त्या उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर दावा दाखल करू शकते.
ट्रेड ड्रेसमध्ये अगदी कोणत्याही बाह्यरूपाची नोंदणी करता येते. उदाहरणार्थ, बाटलीचे डिझाईन, शोरूमचे डिझाईन, कारच्या समोरच्या ग्रीलचे डिझाईन, इत्यादी.
मंडळी, हा एवढा महत्वाचा विषय पाश्चात्य देशात अगदी गांभीर्याने घेतला जातो. या साठी वेगळे कायदेसुद्धा बनवले जातात. अगदी अलीकडे भारत सुद्धा जागतिक प्रवाहात येत असल्याने भारताने 2003 पासून ट्रेड ड्रेस उल्लंघन या बाबीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
विषय निघालाच आहे तर आता एक छोटे उदाहरण पाहूया आणि नंतर आपला मूळ विषय फेरेरो रॉशरकडे वळूया. सन २००७ मध्ये कॅडबरी इंडिया लिमिटेड या कंपनीने नीरज फूड प्रॉडक्टस या कंपनीवर दावा दाखल केला होता. कॅडबरीच्या जेम्स या गोळ्यांना कोण ओळखत नाही मंडळी? तर या जेम्स गोळ्यांसोबत साधर्म्य असणाऱ्या जेम्स बॉंड नावाच्या गोळ्या नीरज फूड्सने मार्केटमध्ये आणल्या होत्या. गोळ्या तर सारख्या होत्याच, शिवाय पॅकेजिंगसुद्धा अगदी कॅडबरी सारखेच होते. कॅडबरीच्या जेम्स गोळ्यांच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन आपले प्रॉडक्ट खपवण्याचा हा सरळ सरळ अनैतिक मार्ग होता. दिल्ली उच्च न्यायालयाने याची दखल घेऊन कॅडबरीच्या बाजूने निकाल दिला व डुप्लिकेट जेम्सची विक्री रोखली गेली.
फेरेरो रॉशर ट्रेड ड्रेस केस
फेरेरो स्पा ही सुप्रसिद्ध इटालियन कन्फेक्शनरी कंपनी. जगातील सर्वात बेस्ट कंपन्यांपैकी एक अशी फोर्ब्स मॅगझीनच्या सर्व्हेमध्ये तिची सन २०१७ मध्ये नोंद झालेली आहे. फेरेरोचे प्रॉडक्टस भारतात खूप पूर्वीपासून विकले जात असले तरी फेरेरोने २००८ पासून 'फेरेरो रॉशर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' या नावाने अधिकृत व्यापार सुरू केला. अल्पावधीतच श्रीमंत भारतीय नागरिकांमध्ये हे प्रीमियम चॉकलेट लोकप्रिय झाले. कोणत्याही मोठ्या कंपनीप्रमाणे फेरेरोसुद्धा ट्रेड मार्क आणि ट्रेड ड्रेस बाबत जागरूक कंपनी असल्याने तिने आपली सर्व बौद्धिक संपदा (Intellectual property) म्हणजे सर्व डिझाइन्स, लोगो वगैरेची नोंदणी करून घेतली.
एके दिवशी फेरेरोला असं लक्षात आलं की आपल्या चॉकलेटप्रमाणे दिसणाऱ्या चॉकलेटची मार्केटमध्ये विक्री होते आहे. त्यांनी ताबडतोब कोर्टात धाव घेतली आणि रुची इंटरनॅशनल या कंपनीवर ट्रेड ड्रेस उल्लंघन प्रकरणी दावा ठोकला. मंडळी, या केसचे वेगळेपण हेच आहे की ट्रेडमार्क उल्लंघन या कलमाखाली दावा न करता ट्रेड ड्रेस उल्लंघन या कलमाखाली ही केस चालली. शिवाय कोर्टाने सर्व पुरावे बघता या केसचा निर्णय फेरेरोच्या बाजूने एकतर्फी दिला.
केसमधील पहिली प्रतिवादी कंपनी रुची इंटरनॅशनल ही चॉकलेट बाहेरील देशातून आयात करून 'गोल्डन पॅशन' या नावाखाली भारतात विक्री करणारी कंपनी. या गोल्डन पॅशन चॉकलेटचे बाह्यरुप फिर्यादी कंपनी फेरेरो रॉशरसोबत अगदी तंतोतंत जुळत होते. दुसरी प्रतिवादी कंपनी चॉकलेट्स चीनमधून आयात करून भारतात विकत असे. जेव्हा ही केस स्वतंत्र होती, तेव्हा प्रथम प्रतिवादीने फिर्यादीसोबत तडजोड केली आणि हे प्रकरण मिटवून घेतले. दिल्ली हायकोर्टाने दुसऱ्या प्रतिवादीच्या विरोधात खटला चालवला आणि विरोधात निकाल दिला.
मंडळी, या केस मध्ये कोणते मुद्दे फिर्यादी कंपनीने उपस्थित केले ते पाहूया. सर्वप्रथम दोन्ही चॉकलेटचे डिझाईन, आवरण, रंग आणि लेबल हे अगदी सारखे आहेत या मुद्द्यावरून फेरेरोने रुची इंटरनॅशनलला कोर्टात खेचले. त्यानंतर असा युक्तिवाद केला की, अनधिकृतरित्या समान ट्रेडमार्क किंवा ट्रेड ड्रेसचा वापर कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. यामुळे प्रतिवादीची उत्पादने फिर्यादीशी संबंधित आहेत असा ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. या कृत्यामुळे फेरेरोने मिळवलेल्या प्रतिष्ठेवर वाईट परिणाम होऊ शकतो आणि कंपनीचे नुकसान होऊ शकते.
कोर्टाने पुरावे तपासून फेरेरो रॉशरच्या बाजूने एकतर्फी निकाल आणि असे नमूद केले की फेरेरोच्या ट्रेड ड्रेसची नक्कल करणे गैर आहे. शिवाय प्रतिवादी कंपनीच्या फिर्यादी कंपनीशी साधर्म्य असणाऱ्या सर्व प्रॉडक्टसच्या कोणत्याही प्रकारच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी मनाई करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता कोर्टाने प्रतिवादी कंपनीने फेरेरोला नुकसानभरपाई म्हणून दहा लाख द्यावेत आणि दावा दाखल झालेल्या दिवसापासून नुकसानभरपाई देईपर्यंत १०% वार्षिक व्याजाप्रमाणे रक्कम द्यावी असेही फर्मान काढले.
मंडळी, आता आपल्याला कल्पना आली असेल की कॉपीराईट, ट्रेडमार्क याप्रमाणे ट्रेड ड्रेस सुद्धा एखाद्या कंपनी किंवा प्रॉडक्टसाठी किती महत्वाचे असू शकते. आजच्या मार्केटिंगच्या युगात आपली बौद्धिक संपदा सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. यामुळे आपली प्रतिष्ठा टिकून राहतेच, शिवाय त्याचा गैरवापर करणाऱ्यांवर आळा बसतो. दुसरा मुद्दा म्हणजे एखादी वस्तू स्वस्त मिळते आहे म्हणून ती विकत घेणे हे मूळ वस्तू उत्पादक कंपनीवर अन्याय करण्यासारखे आहे. बाजारात मिळणाऱ्या सेकंड कॉपी, थर्ड कॉपी वगैरे वस्तू घेणे टाळा.
आपण विकत घेत असणारी वस्तू ओरिजनल कंपनीची आहे का याची खात्री करून घ्या आणि हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये आवर्जून कळवा.




