computer

पॅरालिम्पिकच्या पदकांचे भारतीय दावेदार कोण आहेत? ही यादी पाहा!!

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने घवघवीत यश मिळवले आहे. आता भारतीयांच्या नजरा टोक्यो याच ठिकाणी होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेकडे लागल्या आहेत. रियो येथील स्पर्धेत भारताने त्यावेळी २ सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक प्राप्त केले होते. यावेळी अधिक खेळाडू सहभागी होत असल्याने पदकांच्या आशा पण अधिक आहेत. यावेळी काही महत्वाचे पदकांचे दावेदार कोण आहेत हे जाणून घेऊया.
 

देवेंद्र झांझरीया हे नाव सर्वात मोठे आहे. कारण त्यांनी आधी दोन वेळा सुवर्णपदक मिळवले आहे. तेही नीरज चोप्राप्रमाणे भालाफेक याच खेळात आहेत. २००४ आणि २०१६ मध्ये त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले आहे. ४० वर्षीय देवेंद्र यंदा पुन्हा एकदा सुवर्णवेध घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. देवेंद्र लहान असताना त्यांचे कोपर ११ हजार व्होल्टच्या केबलला लागल्याने त्यांना दिव्यांगत्व आले होते. पण यावर मात करत त्यांनी एक यशस्वी खेळाडू म्हणून कारकीर्द केली आहे. पॅरालिम्पिकच्या पात्रता फेरीत त्यांनी स्वतःचा ६५.७१ मीटर भालाफेकीचा विक्रम मोडला असल्याने यंदा पण ते सुवर्ण आणतील असे वाटत आहे.

F-64 गटात दोन मोठे पदकाचे दावेदार आहेत. संदीप चौधरी आणि सुमित अंतील हे दोन्ही हरियाणाचे पठ्ठये नुकत्याच झालेल्या वर्ल्ड पॅरा अथलेट चॅम्पियनशिपमध्ये अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकून आले आहेत. उंचउडीतील चॅम्पियन मरियप्पन थंगवेलू यंदा सुवर्णपदक जिंकून सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण आणणारे खेळाडू ठरतात का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गेल्यावेळी रियो पॅरालिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते. गेला काही काळ त्यांना दुखणे सतावत असल्याने वर्ल्ड पॅरा अथलेट चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. याच खेळात रिओमध्ये कांस्य मिळवलेले वरून सिंग भाटी आणि एशियन पॅरा गेम्समध्ये डबल पदक मिळवलेले शरद कुमार भिडणार असल्याने ते पण पदकाचे मोठे दावेदार आहेत. 

बॅटमिंटन खेळात प्रमोद सिंग हे सिंगलमध्ये आणि पलक कोहली यांच्या सोबत मिक्स डबल्समध्ये नशीब अजमावणार आहेत. पॅरा वर्ल्ड अथलेट चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी डबल सुवर्णपदक मिळवत स्वतःला आधीच सिद्ध केले आहे. त्यांच्या बरोबरीने कृष्णा नागर आणि तरुण ढिल्लो हे पण भिडणार आहेत. त्याचबरोबरीने महिला डबलमध्ये पलक कोहलीबरोबर पारुल परमार यापण खेळणार आहेत.

पुरुषांच्या १० मीटर पिस्टल खेळात १९ वर्षीय मनीष नरवाल या खेळाडूकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पहिल्यांदा ऑलीम्पिकमध्ये सहभागी होत असणारा मनीष याआधी दोनवेळा जागतिक स्पर्धांमध्ये रौप्यपदक जिंकून आला आहे. २०१८ साली आशिया पॅरा गेम्समध्ये भारतासाठी सुवर्ण जिंकणारा तो एकटा होता. त्याच्यासोबत सिंघराज आणि हे पण या खेळात भिडणार आहेत तर महिला गटातून अवनी लखेरा या जागतिक क्रमवारीत ५ व्या असलेल्या खेळाडू खेळणार आहेत. 

यावेळी ऑलिम्पिकप्रमाणे मागील विक्रम मोडत पदकांच्या संख्येत भरभरून वाढ होईल अशा अपेक्षा व्यक्त करत भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देऊया...

सबस्क्राईब करा

* indicates required