computer

ब्लॅक फ्रायडे : १२ मार्च १९९३ रोजी नेमकं काय घडलं होतं ?...जाणून घ्या महत्वाचे ८ मुद्दे !!

१२ मार्च १९९३ हा दिवस नेहमीच्या दिवसा सारखाच एक साधारण दिवस होता. मुंबईत लोक आपापल्या कामात व्यस्त होते. त्या दिवसानंतर मुंबई पूर्णपणे बदलणार आहे याची कोणाला शंकाही आली नव्हती. या शांत दिवसाला ग्रहण लागलं ते दुपारी १.३० वाजता. मुंबईतल्या शेअर मार्केटच्या इमारतीच्या तळमजल्यावर पहिला बॉम्बस्फोट झाला. यानंतर तब्बल १२ बॉम्बस्फोटांनी मुंबई सुन्न झाली. तो शुक्रवारचा दिवस असल्याने त्याला आजही ‘ब्लॅक फ्रायडे’ म्हणून ओळखलं जातं.

काल या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाली. आज आपण पाहूयात त्या दिवशी नेमकं काय घडलेलं ? या घटनेमागे कोण होतं ? आणि हा मृत्युकांड टाळता आला असता का !!

१. स्फोटांची मालिका

१.३० वाजता शेअर मार्केट इमारतीच्या तळमजल्यावर पहिला बॉम्बस्फोट झाला. त्यानंतर दुपारी २.१५ वाजता नरसी नाथा स्ट्रीट येथे दुसरा स्फोट घडला. यानंतर आणखी १० ठिकाणी स्फोट होऊन हे सत्र तब्बल २ तास १० मिनिटांनी संपलं. यातील शेवटचा बॉम्बस्फोट दुपारी ३.४० वाजता हॉटेल एअरपोर्ट सेंटर येथे झाला.

२. मृतांची संख्या

या बॉम्बस्फोटात तब्बल  २५७ लोक मृत्युमुखी पडले तर ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. यात सर्वात जास्त मृतांची संख्या वरळीतल्या सेंच्युरी बाझार (११३ ठार) येथे होती. यानंतरचा आकडा लागतो तो मुंबई शेअर बाजारचा. तिथे तब्बल ८४ लोक ठार झाले होते.

३. स्फोटांमागची करणं काय होती ?

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर जातीय असंतोष वाढू लागला. या घटनेला उत्तर म्हणून मुंबईच्या स्फोटांच्या मालिकेकडे पाहिलं जातं. टायगर मेमनने जातीय दंगलीतल्या १९ युवकांना निवडून त्यांना तथाकथित धर्माभिमानासाठी बॉम्बस्फोटाच्या योजनेत सामील करून घेतलं. यानंतर त्यांच्या ट्रेनिंगसाठी त्यांची रवानगी पाकिस्तानात केली. हिंदुच्या कृत्याला मुसलमानांच उत्तर म्हणून हा स्फोट शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी करण्याचं ठरलं होतं. पण ती योजना बारगळली. या स्फोटा दरम्यान स्फोटके, हातबॉम्ब आणि AK-56 पाठवून मोठ्याप्रमाणात अफ्राताफ्री आणि दंगल उडवून देण्याचीही योजना होती.

४. स्फोटाच्या मागचे सूत्रधार कोण ?

दाऊद इब्राहीम आणि टायगर मेमन या दोघांकडे या मागचे मुख्य आरोपी म्हणून बघितलं जातं. या दोघांव्यतिरिक्त दाऊदचा भाऊ अनिस इब्राहीम, अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहेर मर्चंट, रियाज सिद्दिकी, करीमुल्ला खान, अब्दुल कय्युम, याकुब मेमन आणि संजय दत्त अशी गुन्हेगारांची मोठी फळी होती. यांना पाकिस्तानच्या ‘आयएसआय’ची देखील मोठी मदत झाल्याचं आता उघड झालं आहे.

वेळी दाऊद दुबईत बसून सर्व सूत्र हलवत होता. स्फोटानंतर भारताने दुबईकडे दाऊदला ताब्यात देण्यासंबंधी दबाव आणल्यानंतर दाऊद कराचीला पळून गेला. असं म्हणतात की दाऊदचं बस्तान कराची मध्ये बसवायला आयएसआयनेच मदत केली होती.  

५. संजय दत्तचा या स्फोटाशी संबंध

दाऊदच्या दुबईतल्या बंगल्याचं नाव ‘व्हाईट हाऊस’ होतं. या घरी संजय दत्तने केलेल्या फोन कॉलच्या रेकॉर्डींग्स पोलिसांच्या हाती लागल्या. अनिस इब्राहीम (दाऊदचा भाऊ) आणि संजय दत्त याच्या मध्ये जी बोलणी झाली त्यावरून महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. या शिवाय अबू सालेम हा संजय दत्तच्या घरी ये जा करायचा हे अबू सालेमने स्वतः काबुल केलं आहे. अबू सालेम बरोबर रियाज सिद्दिकी सुद्धा संजय दत्त ला भेटला होता. असं म्हणतात की या भेटींच्या दरम्यानच संजय दत्तला AK-56 देण्यात आली होती.

६. पोलिसांनी तपास कसा लावला ?

स्फोटानंतर तपासादरम्यान माहीम येथे पोलिसांना एक ‘मारुती वॅन’ आणि स्कूटर सापडली. या दोन्ही वाहनांमध्ये स्फोटके भरलेली होती. पण त्यांचा स्फोट झाला नव्हता. ही ‘मारुती वॅन’ माहीमच्या रुबिना मेमन या महिलेच्या नावावर होती. रुबिना मेमनच्या शोधात पोलीस जेव्हा तिच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की ती २ दिवसांपूर्वीच भारत सोडून निघून गेली आहे. तिच्याच घरात त्या स्कूटरची चावी देखील सापडली. पुढे आणखी शोध घेतल्यावर हा शोध टायगर मेमन पर्यंत जाऊन पोहोचला आणि त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की टायगर संपूर्ण कुटुंबासोबत भारत सोडून पळाला आहे.

७. गुल मोहम्मदची जबानी मुंबईला वाचवू शकली असती का ?

गुल मोहम्मद हा मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारा तरुण होता. बाबरी मशीद पाडल्यानंतर तोही जातीय दंगलीत सामील झाला. टायगर मेमनने दंगलीतल्या ज्या १९ युवकांना निवडलं त्यातला गुल मोहम्मद एक होता. गुल मोहम्मद १९ फेब्रुवारी १९९३ रोजी पाकिस्तानात ट्रेनिंग घ्यायला गेला आणि तो ४ मार्च रोजी भारतात परतला. तो भारतात आल्यानंतर त्याच्या भावाने त्याला पोलिसांना शरण जाण्याविषयी त्याचं मन वळवलं. भावाचं ऐकून तो पोलिसांना सामील झाला. ती तारीख होती ९ मार्च १९९३ म्हणजे बॉम्बस्फोटाच्या ठीक ३ दिवसांपूर्वी. त्याने पोलिसांना त्याचं दंगलीत सामील असण्यापासून ते पाकिस्तानातील ट्रेनिंग आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉम्बस्फोटा विषयी अत्यंत महत्वाची माहिती पुरवली. यात त्याने स्फोट होणारी ठिकाणांची माहिती देखील सांगितली होती. पण पोलिसांनी या जबानीला निव्वळ एक ‘थाप’ म्हणून दुर्लक्षित केलं. पुढच्याच ३ दिवसांनी जो हत्याकांड घडला त्याने ही थाप नव्हती हे सिद्ध झालं.

८. २०१७ मधील न्याय

२०१७ साली विशेष कोर्टाने दिलेल्या न्यायदानात ६ जणांना दोषी ठरवण्यात आलं. यात मुस्तफा डोसाला टाडा कायद्याप्रमाणे दोषी ठरवलं गेलं. हत्यार पोहोचवणे तसेच पाकिस्तानात ट्रेनिंग देण्यासारख्या आरोपाखाली तो दोषी ठरला. अबू सालेमवरही हत्यार पोहोचावल्याचा आरोप लावला गेला. कय्युम शेखने प्रत्यक्ष संजय दत्तला हत्यार दिल्याबद्दल त्याच्यावर आरोप सिद्ध झाले. अश्याच प्रकारे ताहीर मर्चंट, रियाज सिद्दिकी, फिरोज खान आणि करीमुल्ला शेख यांना दोषी ठरवण्यात आलं.

 

भारतीय इतिहासातील हा सर्वात विनाशकारी बॉम्बस्फोट होता. आज २५ वर्षानंतरही त्या घटनेकडे बघताना अनेक प्रश्न पडतात आणि मन सुन्न होतं.

सबस्क्राईब करा

* indicates required