computer

नीता अंबानी यांचे 'Her Circle' काय आहे ? हा उपक्रम खरोखर तो महिलांचे सबलीकरण करेल ?

काळी-गोरी- जाडी- सुकडी-घारी- तिरळी- चकणी -वाकडी अशा शब्दात एखाद्या महिलेची ओळख नव्या युगात आपल्या सगळयांना लाज आणणारी गोष्ट आहे.आपण सोडून इतरांची अशी टोपणनावं ठेवणं इतकं सर्वमान्य वर्तन आहे की त्यात काही चूक आहे असं चुकूनही मनात येत नाही. बरं ,यामध्ये स्त्री-पुरुष असा भेदही नाही म्हणजे हे वागणे  जेंडर स्पेसिफिक नाही. पुरुष असो वा स्त्री दोन्हीत  हा सामान्य दोष आहे .पण लक्षात कोण घेतो ?
 

अशाच अनेक महिलांचा विचार करून , त्यांच्यासाठीच खास असे 'Her Circle EveryBody'  नावाचे व्यासपीठ नीता अंबानी यांच्या प्रेरणेने सुरू झाले आहे.
८ मार्च, ह्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने नीता अंबानी यांनी खास महिलांसाठी Her circle नावाचे पोर्टल२०२१ मध्ये सुरू केले आहे. रोज उठता बसता महिलांना त्यांच्या देहावरून सतत टोमणे मारले जातात. त्या कितीही कर्तबगार असल्या तरी अनेकवेळा घरीदारी त्यांच्या रंग, रूप, आकारमान, आचार, विचार, संस्कार ह्याचा उध्दार केला जातो. अनेक महिलांना आर्थिक व्यवहारांपासून दूर ठेवले जाते. त्यांना स्वतंत्र विचार करण्याचे स्वातंत्र्य नसते. अशा कारणांमुळे अनेक महिलांना मानसिक त्रास होत असतो.
 

ह्या उपक्रमात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या कुठल्याही स्त्रीचे जात, रंग, रूप, वजन,आकार,आर्थिक बाजू, समाजातील स्थान काहीही विचारले जाणार नाही. इथे  सर्व महिला सभासदांना एकमेकींशी सुसंवाद साधता येईल आणि एकमेकींना मदतही करता येईल. इथे महिलांच्या आशा, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा, स्वप्ने पूर्णत्वास नेण्यास सर्वतोपरी मदत केली जाईल. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरण, हाच ह्या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.

Her Circle ही एक वेबसाईट आहे आणि ॲपही आहे. हे वापरण्यास अगदी सोपे आहे. google play store मधून ह्याला डाऊनलोड करायचे आहे. महिला इथे विनामूल्य नोंदणी करू शकतात.सध्या भारतीय महिलांसाठी इंग्रजीत असलेले हे पोर्टल हळूहळू सर्व भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. ह्याचे राष्ट्रीय पातळीवर काम सुरू झाले आहे पण पुढे हळूहळू आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांना काम करायचे आहे.
 

नीता अंबानी यांनी उद्घाटनाच्या वेळेस सांगितले की, "जेव्हा दोन स्त्रिया एकत्र काम करतात तेव्हा अविश्वसनीय गोष्टी घडतात. मी आयुष्यभर कर्तबगार स्त्रियांनी वेढलेली आहे. ज्यांच्याकडून मी बरेच काही शिकले. रिलायनस फाउंडेशनच्या महिला असो किंवा जगभरातल्या महिला नेत्या असो, बहुतांशी सगळ्यांच महिलांचे संघर्ष आणि विजय एकत्र नांदतात. Her circle महिलांच्या कलागुणांना वाव देईल आणि त्यांच्या उपक्रमांना बळ मिळेल. समानता आणि भगिनीभाव हे ह्याचे वैशिष्ठ्य असेल." 

हा प्रयोग केवळ - मी  काहीतरी करते आहे - असे दाखवण्यापुरता आहे की खरोखर तो महिलांचे सबलीकरण करेल ? या प्रश्नाचे उत्तर येणारा काळ देईलच , आपण वाट बघू या !

रमा ताम्हनकर

सबस्क्राईब करा

* indicates required