computer

जाणून घ्या काळा पैसा पांढरा करणाऱ्या शेल कंपन्या कशा काम करतात !!

हवाला म्हणजे काय हे आम्ही तुम्हाला यापूर्वीच तुम्हाला सांगितलं आहेच. आज आपण  वाचणार आहोत -टॅक्स हेवन -शेल कंपनी -राउंड ट्रिपींग - याबद्दल!!

सुरुवातीला बघू या मनी लाँडरींग म्हणजे नेमकं काय? लाँडरींग म्हणजे धुलाई. मनी लाँडरींग म्हणजे  मळक्या पैशांची धुलाई! मळलेले पैसे म्हणजे गैरमार्गाने, कायदा धाब्यावर बसवून, कर चुकवून, काही वेळा मानवी हत्येतून, बेकायदेशीर व्यापार करून  जमवलेले पैसे.. थोडक्यात अवैध मार्गाने जमा झालेली पुंजी. ही दोन नंबरची जमापुंजी  कायदेशीर मार्गाने मिळवलेली आहे हे मिळकत खात्यात  दाखवणे म्हणजे मनी लाँडरींग! 

हा मनी लाँडरींग शब्द आला कसा  याला गुन्हेगारीचा इतिहास आहे. अमेरीकेतल्या गुन्हेगारी टोळ्या-माफीया- वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे जुगार, वेश्यागृह, अंमली पदार्थ यातून जी कमाई करायचे ती कायदेशीर मार्गाने आली आहे हे दाखवण्यासाठी लाँड्रोमॅट म्हणजे ठिकठिकाणी वॉशींग मशीन लावून धुलाईकेंद्रे उघडायचे. यावरून  मनी लाँडरींग हा शब्द आला.

भारतात तर अशी लाँड्रोमॅट अस्तित्वात नाहीत, पण देशाप्रमाणे मार्ग बदलतात. आपली अर्थव्यवस्था (अजूनही) रोखीत चालते. सर्वत्र मनुष्य बळाचा वापर होतो. म्हणून आपल्याकडे लेबर काँट्रॅक्ट्स, कंस्ट्रक्शन, फिल्मइंडस्ट्री, शिपींग, एक्सपोर्ट हे मार्ग पैसे 'धुण्यासाठी' वापरले जातात. पण सगळ्यात लोकप्रिय प्रकार म्हणजे सोने खरेदी आणि जमीन खरेदी. जमीन खरेदी करून लँड बँक तयार झाली की ती 'कोलॅटरल' (गहाणवट) ठेवून पुन्हा पैसा उभा करायचा.  भारतात दोन नंबरच्या पैशाने इतका उच्चांक गाठला होता की हा उपाय ही पुरेनासा झाला. त्यानंतर 'शेल' कंपन्यांचे दिवस आले. 

चला तर आता बघू या शेल कंपन्या म्हणजे काय?

शेल कंपन्या म्हणजे (भारतात ज्याला " खोका" कंपन्या म्हणतात)  म्हणजे केवळ कागदपत्रावर अस्तित्वात असलेली कंपनी. या कंपनीची उलाढाल शून्य असते. पण इतरत्र जमा झालेले पैसे जमा करण्यासाठी या कंपनीच्या नावाने बँकेत खाते असते. मग प्रश्न असा येतो की हे उघडकीस कसे येत नाही? त्याची दोन कारणे आहेत. कारण क्रमांक एक असे की या कंपनीत पैसे पोहचण्यापूर्वी ते अनेक वेगवेगळ्या खात्यातून फिरून येतात. या प्रकाराला ' लेयरींग' असे म्हणतात. दुसरे कारण असे की सरकारी लाचलुचपत आणि इतर शोध घेणार्‍या संस्थांवर असलेले राजकीय वर्चस्व !! या दुसर्‍या कारणावर आपण काहीच टिप्पणी करणार नाही आहोत, कारण वाचकांना याचा प्रत्यक्ष अनुभव असेलच! 

शेल कंपन्यामध्ये दोन प्रकार आहेत. काही कंपन्या देशांतर्गत (डोमेस्टीक शेल) कंपनी आहेत. कलकत्त्याच्या लाल बाजार परिसरातच एका पत्त्यावर ३०० कंपन्या आहेत.  तर दुसऱ्या आहेत ओव्हरसीज म्हणजे परदेशातल्या शेल कंपनी. पुन्हा एक प्रश्न उभा राहतो की अशा कंपन्या बेकायदेशीर आहेत का? त्याचे उत्तर असे आहे की शेल कंपन्या देशात किंवा परदेशात काय,  यावर  काहीही  कायदेशीर निर्बंध नाहीत. जोपर्यंत या कंपन्या धन -शुभ्रीकरण मनी लाँडरींग अ‍ॅक्ट २००२- बेनामी ट्रँझॅक्शन अ‍ॅक्ट२०१६ आणि कंपनी अ‍ॅक्ट २०१३ या  कायद्यांचे उल्लंघन करत नाहीत, तोपर्यंत या शेल कंपन्यांवर लक्ष ठेवणे आवश्यक नसते. 

आता बघू या की शेल कंपन्या कशा वापरल्या जातात? यासाठी एक उदाहरण बघूया. समजा भारतात एक xyz कंपनी आहे. या xyz ची परदेशात dbl नावाची शेल कंपनी आहे. xyz ला युरोपमधून १०० कोटींची मशिनरी आणायची आहे, पण खर्च १००० कोटी केला आहे असे दाखवायचे आहे. अशा वेळी १०० कोटी हवाल्याने बाहेर जातात. तेच पैसे परदेशातून dbl कंपनीत जमा होतात. dbl  कंपनी युरोपातून cbz कंपनीकडून १०० कोटींची मशिनरी घेते, पण डिलीव्हरी घेत नाही.  xyz कंपनी dbl कंपनीकडून तीच मशिनरी १००० कोटीत विकत घेते. dbl कंपनीने डिलीव्हरी घेतलेलीच नसते. dbl कंपनी cbz कंपनीला डायरेक्ट ऑन साइट डिलीव्हरी देण्याचे आदेश देते. थोडक्यात काय झाले की ९०० कोटी देशाबाहेर शेल कंपनीत जमा झाले. कालांतराने  xyz कंपनी बुडली  तरी मालकाला  dbl च्या खात्यात जम झालेला मलिदा खायला मिळतो.

आता दुसरा एक प्रकार बघू या !!

समजा एखाद्या राजकारण्याला  मोठ्या 'डील' मध्ये पैसे मिळाणार आहेत. अशावेळी एखाद्या परदेशी शेल कंपनीत ते पैसे जमा केले जातात. नंतर हीच शेल कंपनी त्या राजकारण्याच्या सगेसोयर्‍याला विकली जाते. हा सोयरा ते पैसे दुसर्‍या इन्वेस्टमेंट कंपनीला ते पैसे देतो. ती कंपनी भारतात गुंतवणूक करते. नफा झाला की पैसे आल्या मार्गाने परत जातात.

पण हे झाले गुंतवणूकीचे. समजा हेच पैसे भारतात आणयचे झाले तर? त्यासाठी इन्वेस्टमेंट कंपनी पैसे आणखी दुसर्‍या देशातल्या अशा शेल कंपनीत पाठवते की जेथे मालकी ' शेअर बेअरर' पध्दतीची असेल. ती कंपनी ते पैसे भारतात पाठवून 'बेअरर' शेअर फुकून टाकते. बेअरर कंपनी नाहीशी झाली की पुढे पैसे भारतात कसे आले याचा मागमूसच लागत नाही. याला म्हणतात  'राउंड ट्रिपींग'. पण अशा कंपन्या तयार करण्यासाठी तसे देश हवेत! तर मंडळी असे देशही आहेत जे 'शेल' कंपन्या स्थापन करण्याची परवानगी देतात. फक्त परवानगीच नव्हे तर जमा पैशावर टॅक्स पण लावत नाहीत. अशा देशांना 'टॅक्स हेवन ' म्हटले जाते.  मग त्यांना काय फायदा? सोपं आहे, हे सगळं करण्यासाठी ते भाडं घेतात. थोडक्यात भानगडी करायला देणारे लॉज असतात तसे हे देश आहेत. 

चला आता पुढच्या भागात दौरा करूया जगातल्या या ओव्हरसीज टॅक्स हेवनचा !!

 

आणखी वाचा :

तीन सीबीआय प्रमुखांची नोकरी घालवणारा नं. १ हवाला किंग !!

काळा पैसा इकडून तिकडे करणारा हवाला असा चालतो ??

सबस्क्राईब करा

* indicates required