computer

महाराष्ट्र पोलिस दलाची ड्युटी सांभाळून- दहा वर्षं मेहेनत करून'अरनॉल्ड' झालेल्या किशोर डांगेंची प्रेरणादायी कथा वाचलीच पाहिजे !!

पोलीस खात्यात काम करणे म्हणजे फिटनेसची पूर्ण काळजी घेणे गरजेचे असते.पोलिसांचे काम ज्या पद्धतीचे असते त्यासाठी मानसिक आणि शारीरिकरित्या कणखर माणूस असणे आवश्यक असते. पण कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा इतर कारणांमुळे अनेक पोलिसांना फिटनेस राखणे शक्य होत नाही. पण काही पोलिसांची बॉडी बघितली तर भल्या भल्या बॉडी बिल्डर्सला देखील मात्र चॅलेंज देतील अशी त्यांची बॉडी असते. आयपीएस सचिन अतुलकर यांची बॉडी समाज माध्यमावर नेहमी चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय असतो.आज अशाच एका पोलीस अधिकाऱ्याची चर्चा आपण करणार आहोत. ज्याला महाराष्ट्र पोलिसातील अरनॉल्ड म्हटले जात असते.महाराष्ट्र पोलिसातील किशोर डांगे यांनी मोठ्या मेहनतीने जबरदस्त बॉडी तयार केली आहे. त्यांच्या बॉडीचे कुतूहल आणि कौतूक अनेक मोठ्या शरीरसौष्ठवपटूंना देखील असते. डांगे यांनी अनेक शरीरसौष्ठव स्पर्धा देखील गाजवल्या आहेत. 

किशोर यांनी तयार केलेल्या या बॉडीमागे त्यांची दहा वर्षांची मेहनत आहे. जिममध्ये कित्येक तास घाम गाळल्यावर आज त्यांची दिसत असलेली ही बॉडी तयार झाली आहे. पोलिसांची ड्युटी म्हटले म्हणजे कामाच्या वेळा निश्चित नसतात. अनेक वेळा अधिक वेळ ड्युटीवर थांबावे लागते. हे सर्व सांभाळून त्यांनी आपला व्यायाम नियमितपणे सुरू ठेवला आहे. त्यांना त्यांचा हा छंद जोपासण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांचे देखील सहकार्य मिळत असते. तसेच ते जेव्हा बाहेर स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी जात असतात. तेव्हा सुटी मिळण्याबरोबर इतर सर्व सहकार्य त्याना केले जात असते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांचा बाहेर स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा खर्च देखील सरकारने उचलला होता.जेणेकरून त्यांच्या आत असलेले गुणांना वाव मिळावा. 

किशोर डांगे यांनी आयर्लंड येथे झालेल्या वर्ल्ड पोलीस आणि फायर गेम्स या स्पर्धांमध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे. एवढेच नाहीतर आपल्या सशक्त शरीरसौष्ठवाच्या जीवावर त्यांनी मिस्टर महाराष्ट्र आणि मिस्टर मराठवाडा हा पुरस्कार अनेकवेळा जिंकला आहे. अमेरिका येथे झालेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी रौप्यपदक जिंकत तेथे देखील आपल्या बॉडीची दखल घ्यायला लावली होती. त्याचप्रमाणे उज्जैन नॅशनल्समध्ये देखील ९५ किलो गटात त्यांनी सुवर्णपदकावर नाव कोरले होते. डांगे यांचा सर्वात अधिक रस जरी बॉडीबिल्डिंग असला तरी ते इतरही अनेक खेळात कार्यरत असतात. किशोर डांगे यांनी अत्यंत गरिबीत दिवस काढले आहेत.पण ही गोष्ट त्यांच्या स्वप्नांच्या आड येऊ शकली नाही.वास्तविक बॉडी बिल्डिंग वाटते तेवढी सोपी नसते. डायट,जिम,ट्रेनर तसेच इतर अनेक गोष्टींवर लाखो रुपये खर्च करून देखील कित्येकांना चांगली बॉडी बनवता येत नाही.पण कुठलेही मोठे समर्थन नसताना आणि संसाधने नसताना देखील डांगे यांनी एवढी मोठी मजल मारली आहे. समर्थन आणि संसाधने कमी असली म्हणजे माणूस मागे राहत नसतो हेच डांगे यांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केले आहे. तसेच पोलीस खात्याबरोबरच पूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा पराक्रम त्यांनी देश विदेशातील अनेक मोठ्या स्पर्धा जिंकून केला आहे.

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required