computer

हजारो वर्षे माणसाच्या इमानाला भूरळ घालणार्‍या हिर्‍यांच्या काही कथा !

अनमोल रत्नांना स्वतःचा असा खास इतिहास असतो.
मार्क अँटनीचा उल्लेख झालासा वाटला आणि एक संदर्भ आठवला एका ओपल रत्नाचा.
नॉनीयस नावाच्या एका सिनेटर कडे हे ओपल होते.
ओपल म्हणजे हिरा नव्हे.ओपलची गणना उपरत्नामध्ये होते.हे फारसे दुर्मीळ नसणारे रत्न आहे.
पण रत्नाची किंमत आपल्याला हवे असणे आणि आपल्याकडे नसणे यावर ठरते .
मार्क अँटनीने नॉनीयस कडे ते रत्न मागीतले .
नॉनीयसने नकार दिला.
या नकारासाठी त्याला वनवासाची शिक्षा मिळाली ती त्यानी स्विकारली पण ओपल देण्यास नकार दिला.

रत्नांना आणि दागीन्यांना एक अंगभूत सवय असते नाहीसे किंवा गहाळ होण्याची. ब्राऊन प्रिन्सशी म्हणजे भारतातील संस्थानीकांशी लग्न करण्याची फॅशन युरोपात अठराशे अठ्ठावन नंतर आली आणि भारतीय राजेरजवाड्यातून रत्ने आणि दागिन्यांना गहाळ होण्याची सवयच लागली.तोपर्यंत गोर्‍या मडमांचे हितरक्षण करण्यासाठी मॅरीड वुमन्स प्रॉपर्टी अ‍ॅक्ट (१८७४)पण आला होता.त्यामुळे देसी राजांच्या गोर्‍या बायकांनी चोरी केली तरी त्याला चोरी म्हणणे शक्य नव्हते.
 

अशीच एक कथा आहे पतीयाळाच्या शिरपेचाची. पतीयाळाच्या महाराजांचा राज्यारोहण समारंभाच खास शिरपेच अचानाक खजीन्यातून नाहीस झाला. दोन वर्षांनी तो सापडला लंडनच्या एका पेढीवर. तपास केल्यावर कळले की महाराजांच्या गोर्‍या विलायती मड्डमेचे ते प्रताप होते.पतीयाळा संस्थानाचा खजीना म्हणजे कुबेराचे भांडारच. अठराशे सत्तावन्नच्या उठावात जे सहभागी झाले नाहीत त्यांचे खजीने भरभरूनवाहत होते. शिखांनी या लढ्यात भाग घेतला नव्हता.त्यामुळे पतीयाळाच खजीना अबाधीत राहीला होता.
 

पतीयाळाच्या नेकलेसची तर एक आणखी एक कथा आहे.जकेस कार्टीयेनी १९२८ साली बनवलेल्या या हारात मुख्य नग दोनशे चौतीस कॅरेटचा एक हिरा होता.प्लॅटीनमच्या गोफात गुंफलेल्या या हारात दोन मोठी ब्रह्मदेशी माणकं आणि लहान मोठे हजार कॅरेट वजनाचे जवळजवळ दोन हजार नऊशे छोटे मोठे हिरे होते. हा हार पण अचानक नाहीसा झाला .एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली लंडनच्या एका जुन्या दागीन्यांच्या व्यापाराकडे सापडला.तोपर्यंत या हारातले मोठे हिरे गायब झाले होते.
विकेड विमेन ऑफ द राज या पुस्तकात अशी बरीच उदाहरणे आहेत.

आता एक छोटी कथा वाचा शिवबहादूर सिंग या लोकसभा खासदाराची.
शिवबहादूर सिंग मध्यप्रदेशातल्या रेवा संस्थानाचे जहागीरदार. त्यांच्या जहागीरीचे नाव आहे चुरहाट. १९४९ साली हे गृहस्थ नेहरूंच्या मंत्री मंडळात मंत्री होते. त्याच साली पन्ना डायमंड सिंडीकेट या कंपनीने त्यांना लिज वाढवून देण्याची विनंती केली .त्यावेळी रेवा विंध्यप्रदेशात होतं नंतर मध्यप्रदेशात विलीन झालं .पाठीमागच्या तारखेपासून -बॅकडेटेड-सही करण्यासाठी त्यांनी लाच मागीतली .लाचेची रक्कम होती पंचवीस हजार रुपये.या सज्जनांना ही रक्कम म्हणजे हाताचा मळ होता. पण म्हणजे आसक्ती मोहाचे फूल !
नगीनदास मेहता या पन्ना डायमंड सिंडीकेटच्या मालकाने लाच देण्यासाठी होकार दिला.
दिल्लीच्या कँस्टीट्युशन हाउस मध्ये लाच दिली गेली आणि शिवबहादूर सिंग ट्रॅपमध्ये अडकले.
सुरुवातीला स्पेशल कोर्टाने त्यांना मुक्त केलं.
सरकार अपीलात गेलं. निकाल सरकारच्या बाजूने लागला.
शिवनारायण सिंग यांनी सुप्रीम कोर्टात अपील केलं .
या अपीलात त्यांना लावलेल्या कलमांविषयी त्यांनी नकार दिला नव्हता .
त्यांचा आग्रह असा होता की विषेश न्यायालयाला ही केस चालवण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिक्षा रद्द व्हावी.सुप्रीम कोर्टाने त्यांची शिक्षा कायम केली. तीन वर्षाची शिक्षा भोगताना तुरुंगातच त्यांना मृत्यु आला.
ही कथा आहे अर्जुन सिंगांच्या तीर्थरुपांची. हे तेच अर्जुन सिंग जे एकेकाळी लोकसभेत मनुष्यबळ मंत्री होते .
अशी ही एक कथा लोकशाहीच्या कारभारातली.

हे सगळं वाचलं की वाटतं बरंय काही नाहीय्ये आपल्याजवळ.
नको तो पतीयाळाचा खजीना .
कबीरानी लिहीलेला एक दोहा रोज रात्री मी वाचतो.
दाता इतना दिजे ।जामे कुटुम समाय
मै भी भूखा न रहू । साधू न भूखा जाय.
एक छोटासा बदल आम्ही केलाय तो एव्हढाच की
मै भी भूखा न रहू । साधू ना प्यासा जाय.

सबस्क्राईब करा

* indicates required