जोकोविचला ऑस्ट्रेलिया सोडून जाण्याचा आदेश दिला. इथे वाचा या घटनेचा पूर्ण घटनाक्रम!!

कोरोनापासून बचाव करण्याचा आजच्या घडीला उपलब्ध असलेला मोठा मार्ग म्हणजे लस टोचून घेणे. पण यातही काही लोक लस घ्यायला विरोध करत आहेत. हाच हट्ट जगातील आघाडीचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविचला चांगलाच महागात पडला आहे.

१६ जानेवारीपासून ऑस्ट्रेलियन ओपन सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी जगभरातील खेळाडू ऑस्ट्रेलियात दाखल झाले आहेत. नोव्हाक जोकोविच अर्थातच विजेतेपदाचा सर्वात मोठा दावेदार आहे. गेल्यावेळचा विजेता तोच असल्याने यावेळीही त्याच्यावर जगाच्या नजरा खिळल्या होत्या.

अजूनही लस घेतली नाही अशा लोकांना अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत. ऑस्ट्रेलियात कोरोनाचा उद्रेक भयानक आहे. अशा परिस्थितीत हा देश देखील लस घेण्याच्या बाबतीत काटेकोर आहे. जोकोविचला देखील लस घेतली नाही या कारणाने ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर पडून थेट देशच सोडण्याचा आदेश तेथील कोर्टाने दिला आहे.

यावेळी जर जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन जिंकला असता तर तो विक्रमी २१ व्या ग्रँडस्लॅमचा विजेता ठरला असता. पण या सर्व गोष्टीवर पाणी सोडत त्याने आपला लस न घेण्याचा निर्णय बदलला नाही. यावर प्रतिक्रिया देताना आपण निराश झालो असलो तरी न्यायालयाचा सन्मान करू असे वक्तव्य त्याने केले आहे.

जोकोविच या एका कारणाने गेले अनेक दिवस चर्चेत आहे. लस न घेणे, कोरोना झाल्यावरही आयसोलेशनचे नियम न पाळणे यामुळे जगाला हिरो वाटणारा जोकोविच टीकेच्या केंद्रस्थानी आला होता. पण जणू आपल्याला कशाचीही पर्वा नाही या थाटात त्याचा वावर होता. न्यायालयात याचिका दाखल करताना लस घ्यावी की नाही हा आपला वैयक्तिक विषय असल्याचे त्याने म्हटले होते.

या विषयाचा पूर्ण घटनाक्रम पुढीलप्रमाणे आहे.

१६ डिसेंबर - या दिवशी त्याला कोरोना झाला.

१७ डिसेंबर - म्हणजे दुसऱ्याच दिवशी तो सर्बियाची राजधानी बेलग्राड येथे मास्क न घालता दिसला. यावर त्याने तोवर कोरोना टेस्टचा रिझल्ट बाकी असल्याचे सांगितले.

१८ डिसेंबर - परत एकदा त्याने एक मुलाखत आणि फोटोशूट करून आयसोलेशन नियम पाळले नाहीत.

२२ डिसेंबर - या दिवशी त्याची टेस्ट निगेटिव्ह आली.

३० डिसेंबर - ऑस्ट्रेलियन टेनिसने जोकोविचला तिथे जाण्यासाठी तात्पुरती परवानगी दिली.

१ जानेवारी - या दिवशी त्याने स्पष्ट केले की ऑस्ट्रेलियात येण्याआधी १४ दिवस आपण कुठलाही प्रवास केला नाही. पण नंतर एक गोष्ट फुटली ती म्हणजे जोकोविचने सर्बिया ते स्पेन प्रवास केला आहे. ही गोष्ट नंतर त्याला स्वत:ला स्विकारावी लागली.

५ जानेवारी - या दिवशी तो ऑस्ट्रेलियात दाखल झाला.

६ जानेवारी - त्याला एअरपोर्टवर थांबविण्यात आले आणि त्याला सरकारने परत पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे कळवले.

७ जानेवारी - आता त्याला ७२ तासांसाठी आयसोलेट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

१० जानेवारी - न्यायालयाने निकाल दिला की आता जोकोविचला परत पाठवणे योग्य होणार नाही.

१४ जानेवारी - तेथील मंत्री हॉकी यांनी स्वतःचे विशेषाधिकार वापरून जोकोविचला परत पाठवण्याचा निर्णय घेतला. जोकोविच धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

आज न्यायालयाने जोकोविचच्या अपिलावर सुनावणी करताना त्याला परत पाठवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. आता याला जोकीवचचा हट्ट म्हणावा की आगाऊपणा काहीही म्हटले तरी विजेतेपदाचा प्रमुख दावेदार पहिला सामना खेळण्याआधीच बाद झाला हे मात्र नक्की...

उदय पाटील

 

सबस्क्राईब करा

* indicates required