जाणून घ्या ग्रीक संस्कृतीत देवता आणि खेळाडूंचे पुतळे नग्नावस्थेत का असतात !!

मंडळी, ग्रीक शिल्पं ही त्यांच्या अप्रतिम कलाकारीसोबतच नग्नतेमुळेही पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. ग्रीकांच्या पूर्वइतिहासाचा अभ्यास केला तर आपल्याला अशी अनेक शिल्पे दिसतील.  पण ती संस्कृती 'असीरीयन' होती. त्या संस्कृतीत नग्नावस्था ही अत्यंत अपमानास्पद खूण होती. त्याकाळात युध्दात पराभूत झालेल्या सैनिकांचं चित्रण नग्नावस्थेत केलं जायचं आणि विजयी सैनिक पूर्ण पोशाखात दाखवले जायचे. अर्थातच, एखाद्याला सार्वजनीक आयुष्यात नागवं करणं असा शब्दप्रचार आपल्याकडेपण आहे. मग प्रश्न असा पडतो की ग्रीक संस्कृतीत देवता आणि खेळाडूंचे पुतळे नग्नावस्थेत का असतात ?

डिस्कोबोलास (स्रोत)

हे चित्र पाहा. हे चित्र डिस्कोबोलास या खेळाडूचं आहे. थाळीफेक करणार्‍या या शिल्पाकडे बघितलं तर त्याचं  पिळदार शरीर दिसून येतं.  थाळी फेकताना त्याच्या शरीराचा तोल बघितला तर दुसर्‍या क्षणी ती थाळी सरसरत फेकली जाईल असंही वाटतं. खेळाडू नग्न आहे हे अर्थातच दिसतंय,  परंतु या शिल्पातली नग्नता जाणवत नाही किंवा ती बीभत्स वाटत नाही.  ही सर्व शिल्पं इसवीसनपूर्व ३०० ते ५०० वर्षांची आहेत. त्या जमान्यात ‘जिमनॅशियम’- म्हणजेच आपल्या भाषेत  ‘जिम’- बंद खोलीत नसायच्या, तर मोकळ्या मैदानावर असायच्या.  खरंतर जिमनॅशियम या शब्दाचे मूळ ‘जिमनॉस’ या ग्रीक शब्दात आहे. आणि तुम्हांला जाणून आश्चर्य वाटेल, पण ‘जिमनॉस’ म्हणजे ‘नग्न’!!

जिमनॅशियम (स्रोत)

तर, अशा जिमनॅशियम मध्ये संपूर्ण विवस्त्रावस्थेत व्यायाम केला जायचा.  खेळ शिकले जायचे. व्यायाम करताना उन्हापासून बचाव करण्यासाठी खेळाडू वस्त्रगाळ माती आणि ‘ऑलिव्ह ऑईल’चा लेप अंगाला लावायचे. सार्वजनिक ठिकाणी खेळादरम्यान विवस्त्र होणं हे त्यांच्या संस्कृतीत अभिमानाचं मानलं जायचं. त्याचा अर्थ असा होता की नग्न झालो तरी लैंगिकतेला फारसे महत्व नाही. म्हणूनच या शिल्पांमध्ये खेळाडू नग्न दिसतात. ही शिल्पं पाह्यली तर आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की या शिल्पांमधल्या आणि तेव्हाच्या ग्रीक चित्रांमधल्या पुरुषांचे लिंग हे नेहमीच छोटं दाखवलेलं असतं. याचंही कारण थोडं गंमतीशीर आहे. त्याकाळात लहान लिंग हेच पौरुषाचं प्रतिक मानलं जायचं. त्यामुळं त्याकाळातल्या चित्रांत आणि शिल्पांत लिंग लहान दाखवलं जायचं.

(स्रोत)

पण थांबा, याचा अर्थ असा नाही की रोजच्या आयुष्यात ग्रीक नागरिक ‘असंच’ फिरायचे. गुलामांनी विवस्त्रावस्थेत फिरणं सर्वमान्य होतं असंही इतिहास म्हणतो. सर्वसामान्य नागरिक आपल्यासारखेच पूर्ण वस्त्रात वावरायचे. अपवाद फक्त एकाच उत्सवाचा.  एका उत्सवात ‘अथेना’ नावाच्या देवतेच्या सन्मानार्थ अथेन्स ते पार्थनेन या रस्त्यावर वर्षातून एकदा सर्व पुरुष मिरवणुकीत नग्न अवस्थेत धावत जायचे. लठ्ठ आणि आळशी पुरुष जर हळू धावायला लागले तर त्यांच्या ‘पार्श्वभागावर’ फटकेही पडायचे.

आता राहता राहिला प्रश्न देवतांचा.  तर, ‘अॅफ्रोडाईट’ ही ‘लैंगिक सुखाची देवता’ मानली जायची. या देवतेची शिल्पे नग्नावस्थेत असायची. खेळाखेरीजही  ‘सिम्पोझियम’साठी ग्रीक प्रजाजन विवस्त्र व्हायचे. सध्याच्या काळात सिम्पोझियम’साचा अर्थ ‘विचारमंथनासाठी’ एकत्र जमलेल्या विद्वानांचा मेळावा असा समजला जातो. अशा मेळाव्यांना आताशा आपण ‘कॉन्फरन्स’ सुद्धा म्हणतो. पण ग्रीक भाषेत सिम्पोझियमचा अर्थ ‘एकत्र बसून दारू पिणं आणि नंतर स्त्री गमन करणं’ असा होतो.

अॅफ्रोडाईट देवता (स्रोत)

या ग्रीक नग्नतेच्या कथा किती  गंमतीदार आणि सुरस कथा आहेत ना!

सबस्क्राईब करा

* indicates required