computer

टिकटॉकमुळे महिलेला आपला हरवलेला नवरा कसा सापडला ? काय आहे हे प्रकरण ?

टिकटॉक हे रिकामटेकड्यांचं ठिकाण समजलं जातं, पण आज पहिल्यांदाच टिकटॉकने एक पुण्याचं काम केलंय. टिकटॉकने एक संसार वाचवला आहे भौ. तामिळनाडूच्या एका बाईला तिचा हरवलेला नवरा टिकटॉक व्हिडीओमुळे सापडला आहे. हे कसं घडलं ? चला जाणून घेऊया.

(सुरेश आणि जयप्रदा)

त्याचं झालं असं, की तामिळनाडूच्या कृष्णगिरी भागात राहणारा सुरेश हा २०१६ साली अचानक घरातून पळून गेला होता. त्याची पत्नी जयप्रदाने पोलिसांकडे तक्रार केली, पण पोलिसांना सुरेशला शोधता आलं नाही. अशीच ३ वर्ष निघून गेली. नुकतंच जयप्रदाच्या नातेवाईकाने एका टिकटॉक व्हिडीओत सुरेश सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला बघितलं. जयप्रदाने हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला खात्री पटली की हा आपला हरवलेला नवराच आहे.

यानंतर जयप्रदाने पोलिसांना बातमी दिली. पोलिसांनी सुरेशला तामिळनाडूच्या होसूर येथून शोधून काढलं. त्यानंतर उलगडली सुरेशच्या पळून जाण्यामागची गोष्ट.

(टिकटॉक व्हिडीओ)

सुरेश हा कौटुंबिक समस्यांमुळे घरातून पळून गेला होता. त्याने होसूर येथे मकॅनिकची नोकरी पत्करली होती. त्याचे एका ट्रान्सजेन्डर स्त्री सोबत संबंध पण होते. सुरेशच्या व्हिडीओ मध्ये ही स्त्री पण दिसत होती.

पोलिसांनी या कामात ट्रान्सजेन्डर व्यक्तींसाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेची पण मदत घेतली. यानंतर सुरेश आणि जयप्रदाला पोलिसांनी समज दिला आहे. ते परत एकदा एकत्र राहत आहेत की नाही याबद्दल माहिती मिळालेली नाही.

तर मंडळी, टिकटॉकमुळे पहिल्यांदाच कोणाचं तरी भलं झालं आहे असं म्हणायला हरकत नाही.