यांचा कुठलाच सिनेमा प्रदर्शित होत नसताना दरवर्षी दीपिका, ऐश्वर्या आणि सोनम कान्सला जातातच कशाला?

आजकाल रोज दिपिका पदुकोण, ऐश्वर्या आणि आता सोनमचे पण वेगवेगळ्या ड्रेसेसमधले फोटोज सगळीकडे दिसू लागलेयत. काय तर म्हणे कान्स फिल्म फेस्टिव्हल.  त्याचसोबत या सगळ्या हिरॉईन्सचे यापूर्वीच्या कान्स फेस्टिव्हलमधले गाजलेल्या आणि पडलेल्या ड्रेसेसचे फोटो पण तितकेच दिसत आहेत. काय आहे हा कान्स फिल्म फेस्टिव्हल? आणि दरवर्षी त्याच त्या हिरोईन्सच कशा काय  कान्सला जातात?

तर मंडळी, नांवाप्रमाणंच कान्स हा फिल्म फेस्टिव्हल आहे. साधारणत: तो दरवर्षी मे महिन्यात साजरा होतो आणि सन १९४६पासूनची त्याला भव्य परंपराही लाभलीय. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये कुणीही उठला आणि गेला असं होत नाही. त्यासाठी तुम्हांला आमंत्रण असावं लागतं नाहीतर आमंत्रण लाऊन तरी नक्कीच घ्यावं लागतं.

स्त्रोत

कान्समध्ये वेगवेगळ्या जॉन्र(Genre) म्हणजेच  वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे दाखवले जातात. तिथं जर तुमचा सिनेमा दाखवला जाणार असेल तर तुम्हांला आमंत्रण मिळू शकतं. सिनेमे पाहायलाही तिथं जाणं तसं सोपं आहे पण आपल्या भारतीयांच्या दृष्टीनं खूप महागडं. एकतर हे फ्रान्समधलं कान्स शहरच खूप महाग आहे. तिथं राहायचं आणि सिनेमे पाहायचे हे खायचं काम नाहीय. पण तिथं राहाणं सोडलं तर सिनेमे पाहाणं सोपं आहे. असं म्हणतात की कान्स शहरभर हे फिल्म्सचे शोज लावलेले असतात. त्यातले काही फुकटही असतात. कान्स शहराच्या पत्त्याचं  आधार कार्ड तुमच्याकडे असेल, तर सगळे सिनेमे म्हणे फुकटात बघता येतात.

 तुमचा सिनेमा नसेल आणि तुम्हांला नुसतं प्रेक्षक म्हणून जायचं नसेल तर  मग तुम्ही कुठल्या ना कुठल्या ब्रांडचे ऍम्बसॅडर असावे लागता.  ऐश्वर्या, सोनम आणि दिपिका लॉरियल पॅरिसच्या ब्रांड ऍम्बसॅडर आहेत आणि त्यामुळं त्या दरवर्षी तिथं हजेरी लावतात. त्यामुळं या सर्वजणी त्यांचे सिनेमे तिथं प्रदर्शित होणार नसतील तरी तिथं जातात. मग होते यांच्या गाऊन्सची बरी-वाईट चर्चा. फक्त गाऊन्सच नाही, कधीकधी विचित्र रंगाच्या लिपस्टिकचीही चर्चा होते. पण तुम्हांला माहित आहे, ही चर्चा ऐश्वर्या आणि सोनमपेक्षा असते लॉरियल ब्रांडच्या मॉडेल्सची. आणि लॉरियाल पॅरिस गेल्या कित्येक वर्षांपासून कान्स फेस्टिव्हलचा ’ब्यूटी पार्टनर’ आहे. त्यातही पाहा. १७ ते २८ मे म्हणजे ११ दिवस चालणार्‍या या समारंभात आधी दिपिका, नंतर ऐश्वर्या गेली. काल ऐश्वर्या परत आली तर आजपासून सोनम तिकडे जलवा दाखवतेय. म्हणजेच एकमेकींना स्पर्धा पण नाही आणि आपल्या ब्रांड ऍम्बसॅडरपण सतत लोकांसमोर राहतील याची  चांगलीच काळजी घेतली जातेय.

स्त्रोत

हे सगळं ठीक आहे, पण त्या मल्लिका शेरावत काकू पण का तिकडे जातात? त्यांचा तर गेल्या कित्येक वर्षांत सिनेमा-मालिका काहीही आलेलं नाहीय. आम्ही थोडी शोधाशोध केली आणि दिसलं की त्या पण एका संस्थेच्या ब्रांड ऍम्बसॅडर आहेत. मल्लिका चक्क ’फ्री अ गर्ल’ नावाच्या इंटरनॅशनल संस्थेची ब्रांड ऍम्बसॅडर!! आहात कुठं?

पण माहित आहे, आज शबाना आझमींनी एक फोटो शेअर केलाय.  १९७६ साली झालेल्या कान्समधल्या शाम बेनेगलांच्या ’निशांत’ सिनेमाच्या प्रदर्शनाच्यावेळेचा. जेव्हा कपड्यांना नाही, तर टॅलेंटला अधिक वाव होता त्यावेळचा. पाहा बरं..

स्त्रोत

 

पण तुम्ही यावर्षी कान्समधले नंदिता दासचे फोटो पाहिलेयत का? कदाचित तीही काही वर्षांनी फोटो ट्वीट करेल.. “या पोषाखी शो बिझमध्ये टॅलेंट..”म्हणून...

स्त्रोत

काय , खरंय ना?

सबस्क्राईब करा

* indicates required