आणि मद्याच्या नशेत त्यांनी २००० फूट खोल दरीत स्वतःला झोकून दिलं!! 

सद्या वर्षापर्यटनाला सर्वत्रच जोर आहे. पावसामुळे फुलून आलेले सुंदर धबधबे पर्यटकांना आकर्षित करतायत. पण मौजमस्तीच्या नादात केलेल्या कसरती कशा जीवावर बेततात याचं एक थरारक उदाहरण सद्या चर्चेत आलंय. 

ही घटना आहे ३१ जुलैची. सावंतवाडीपासून फक्त २९ किलोमीटर्सच्या अंतरावर सुप्रसिद्ध आंबोली धबधबा आहे. पावसाळ्यात इथं पर्यटकांची तुडूंब गर्दी असते. जवळच कावळेसाद नावाचा लोकप्रिय आणि तितकाच धोकादायक पॉईन्ट आहे. महाकाय दरी आणि दरीत कोसळणार्‍या जलप्रपातांसोबत सेल्फी काढण्याच्या मोहात इथे अनेकांनी आपला प्राण गमावलाय. याच ठिकाणी गडहिंग्लजहून इम्रान गारदी आणि प्रताप राठोड नावाचे युवक आपल्या अन्य ५ साथीदारांसह पर्यटनासाठी आले होते.

३१ जुलै रोजी दोघेही दरीत कोसळल्याची बातमी आली होती. नुकत्याच समोर आलेल्या या व्हीडीओमध्ये तुम्ही त्यांच्या लीला पाहू शकता. मद्यधुंद अवस्थेत एकमेकाला आव्हान देत ते सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या रेलींगवर चढतात. त्यांच्या कसरती पाहणारे पर्यटकही त्यांना यासगळ्यापासून रोखायचं सोडून या थराराचा आनंद घेत, आरडाओरड करातायत. कोणी व्हीडीओही शूट करतोय. एकदा रेलींगवरून आतल्या बाजूला उतरल्यानंतर परत दुसर्‍या वेळी रेलींगवर चढून त्यांनी मृत्यूला हाक दिली. एकमेकाचा हात ओढून त्यांनी सर्वांसमक्ष दरीत झोकून दिलं. नजरेसमोर घडलेल्या या घटनेला एखाद्या सिनेमातल्या सीनप्रमाणे पर्यटकांनी एन्जॉय केलं. पण या दोघांना यापासून परावृत्त करण्याचं धाडस मात्र कोणालाही दाखवता आलं नाही. 

मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि खोल दरीतून या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत. या दोघांसोबत आलेले अन्य ५ साथीदार कुठे होते? हा व्हिडिओ कोणी शुट केला? अनेकांचा जीव घेणार्‍या या पॉईन्टवर पोलीस बंदोबस्त का नाही? असे अनेक प्रश्न आता सर्वांसमोर उपस्थित झालेत. पण शेवटी मनाचा ब्रेक हाच उत्तम ब्रेक असतो हे या साहसी पर्यटकांना कोण समजावणार... 

सबस्क्राईब करा

* indicates required