गणेशोत्सव: इको-फ्रेंडली गणेश मूर्ती का निवडावी याची ९ महत्वाची कारणं..

गणपती बाप्पा २५ तारखेला आपल्या घरी येतील. यावर्षी मूर्ती कोणती निवडायची हा देखील एक प्रश्न असतोच. पण त्याच बरोबर मूर्ती कशापासून तयार केलेली असावी हा देखील नवीन प्रश्न आहे.. मंडळी पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार आपण प्लास्टर ऑफ पॅरीसने तयार केलेली मूर्ती आणायचो.  पण वाढत चाललेल्या जागतिक पर्यावरणाच्या समस्या बघता अनेकांनी इको-फ्रेंडली गणेश मूर्तीला पसंती दिली आहे. काही वर्षांपासून लोकांमध्ये जागृती वाढत आहे, पण अजूनही अनेकजणांना इको-फ्रेंडली म्हणजे काय आणि मुळात उगाच १० दिवसांसाठी कशाला एवढी काळजी घ्यायची असा वगैरे विचार असतो.
म्हणूनच आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत इको-फ्रेंडली गणेश मूर्ती निवडण्यामागे कोणती महत्वाची करणं आहेत !!

स्रोत

१. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये जिप्सम, सल्फर, मॅग्नेशियम, शिसे, फॉस्फारस असे अनेक विषारी घटक असतात, ज्यामुळे पाणी अस्वच्छ होते. त्याचबरोबर या घातक रसायनांमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. अशा प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आपण जेव्हा समुद्रात विसर्जित करतो त्यावेळी याचा सरळ सरळ परिणाम पाण्यातील जैवघटकांवर होतो.

 

२. इको फ्रेंडली मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यानंतर ४५ मिनिटाच्या आत विरघळून जातात आणि  प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती महिनोंमहिने तशाच पडून राहतात. शिवाय विघटन न झालेल्या मूर्त्यांमुळे पाणी आणि पाण्यात राहणारे  जीव यांच्यावरही परिणाम  होतो.

३. प्लास्टर ऑफ पॅरीसचे जेव्हा विघटन होते त्यावेळी राहिलेली माती तळाला जाऊन एक प्रकारचा जाड थर तयार होतो, ज्यामुळे तलावाचे पाणलोट क्षेत्र कमी होते
४.प्लास्टर ऑफ पॅरिस वापराचा आणखी एक दुष्परिणाम म्हणजे त्याचा नैसर्गिक संसाधनं आणि भूगर्भातील पाण्याच्या पातळीवर याचा परिणाम होतो. 

स्रोत

 

५. प्लास्टर ऑफ पॅरिसचा एक परिणाम असा की अशा घातक रसायन असलेल्या समुद्रातील किंवा नदीतील मासे याच पाण्यावर जगतात आणि शेवटी हेच मासे आपण खातो. अर्थात आपण केलेली घाण पुन्हा आपल्याच पोटात जाण्याची शक्यता आहे. निसर्गाचा नियम इथेही लागू पडतो.

 

६. पाण्याच्या प्रदूषणातून कँसर, त्वचा रोग, श्वसनाचे विकार तसेच ऍलर्जी, डोळ्यांचे आजार यासारखे रोग होण्याची दाट शक्यता असते.

७. मूर्ती शिवाय डेकोरेशनसाठी लागणारे साहित्य- जसे की जास्त वापरले जाणारे थर्माकोल, प्लास्टिकची फुले, दिवे आणि याच प्रकारच्या आणखी गोष्टी ज्यांचे विघटन होऊ शकत नाही अश्यांमुळे प्रदूषणात आणखी वाढ होते.

८. प्लास्टर ऑफ पॅरिसपासून गणेश मूर्ती तयार करताना वापरलेल्या रंगांचा किंवा सजावटीच्या वस्तू या निसर्गाशी जुळवून घेणाऱ्या नसतातच.  पण त्यातून एक प्रकारचा घटक वायू वातावरणात सोडला जातो ज्यामुळे श्वसनाचे विकार होण्याची शक्यता असते. याविरुद्ध इको-फ्रेंडली गणेश मूर्तींमध्ये वापरलेले रंग हे नैसर्गिकरीत्या तयार केलेले असतात.

स्रोत

 

९. जिथं प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती तुम्हाला विकत आणावी लागते त्याच्या अगदी उलट तुम्ही इको-फ्रेंडली मूर्ती शाडूच्या माती पासून अगदी घरच्या घरीच तयार करू शकता. यातून पर्यावरण नेटकं तर राहतंच पण त्याच बरोबर घरच्यांशी मिळून तयार केलेला बाप्पा हा वेगळ्या कौतुकाचा विषय होऊन बसतो. आता राहता राहिला प्रश्न इको-फ्रेंडली मूर्ती मिळणार कुठे? तर मंडळी अनेक प्रमुख शहरांमध्ये इको-फ्रेंडली मूर्ती आता सहज उपलब्ध आहेत. अनेक संकेत स्थळांवर तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. त्याच बरोबर मूर्ती कशी हवी याचे अनेक चॉइसही तुम्हाला मिळतील.
काय राव मग यावर्षीचा बाप्पा इको-फ्रेंडली ना ?

 

सबस्क्राईब करा

* indicates required