computer

राव, इथे चक्क प्रेताबरोबर पार्टी केली जाते...वाचा या अनोख्या प्रथे बद्दल !!!

माणूस मेला की कुठे जातो? मृत्यूनंतरचं अलौकिक जीवन कसं असतं? मूत्यूनंतर माणसाला त्याच्या पाप पुण्यामुळं  स्वर्ग किंवा नरक मिळतो का कसे? अनेक प्रश्न पुराणकाळापासून एक कुतूहलाचा विषय बनले आहेत. असं म्हटलं जातं की मृत्यू नंतरच्या जीवनासाठी इजिप्तमधले लोक मेलेल्या फॅरोबरोबर त्याच्या अनेक गोष्टी पुरून टाकत, शिवाय त्याचं रुपांतर ममीमध्ये करत.
आता ही झाली हजारो वर्ष जुनी गोष्ट. आज आपण जाणून घेणार आहोत मृत्यूनंतरच्या आयुष्यासंबंधी मादागास्करमधल्या एका वेगळ्याच परंपरेबद्दल. राव, इथे तर प्रेताला थडग्यातून काढून पार्टी केली जाते !!

काय आहे ही प्रथा?

मादागास्करमधल्या ‘मालागासी’ समुदायाचे लोक ‘फामादिहाना’ नावाचा उत्सव करतात. याला “टर्निंग ऑफ दी बोन्स” म्हणतात. या प्रथेप्रमाणं २ किंवा ७ वर्षांनी आपल्या जवळच्या मृत व्यक्तीचं प्रेत कबरीमधून बाहेर काढलं जातं.


स्रोत

अशावेळी दुःख न करता हे लोक उलट त्याची मिरवणूक काढतात आणि त्याच बरोबर पार्टी, नाचगाण्यात मश्गुल होतात. आपण असं म्हणू शकतो की, हा एक प्रकारे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणण्याचा उत्सव असतो. संपूर्ण कुटुंब कितीही लांब असलं तरी यावेळी एकत्र येतं. यानिमित्ताने कुटुंबातील लोक एकाच प्रकारचे कपडे घालतात. 

या प्रथेमागचं कारण काय ?

मृत व्यक्तीला पुन्हा एकदा आयुष्य जगता यावं म्हणून ही प्रथा पाळली जाते. मालागासी लोकांच्या म्हणण्याप्रमाणं जोपर्यंत माणसाच्या शरीराचं पूर्णपणे विघटन होत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती या जगातून बाहेर पडत नाही. त्यामुळे मेल्यानंतरही जोपर्यंत त्याचं शरीर सुस्थितीत आहे तोवर त्याला आयुष्याची मजा घेऊ द्या!! मृत्यूकडे दुखवटा म्हणून न बघता हे लोक उत्सव म्हणून बघतात.

सेलिब्रेशननंतर प्रेताचं काय होतं ?

उत्सवानंतर प्रेत अत्तर शिंपडून रेशमी कपड्यात गुंडाळून कायमचं थडग्यात पुरलं जातं. यावेळी मृताबरोबर  दारू, पैसे वगैरेंसारख्या त्याच्या आवडीच्या गोष्टी पुरल्या जातात.
मंडळी, या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर खर्चही  होतो. त्यामुळं आज ही प्रथा काहीशी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.. आणि हे प्रत्येकालाच परवडणारं नाही. त्याचबरोबर ख्रिश्चन समाज याला विरोध करत आहे.

पण आहे ना मृत्यूसुद्धा साजरा करणारी आणि त्यासोबत कुटुंबाला बांधून ठेवणारी वेगळीच प्रथा ??

 

 

 

(सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.) 
©बोभाटा

सबस्क्राईब करा

* indicates required