computer

कुत्रा झोपण्यापूर्वी गोलाकार का फिरतो? याला प्राचीन कारण आहे !!

एक संशोधनानुसार भारतात कुत्रा हा ८० टक्के घरगुती पाळीव प्राणी म्हणून पाळला जातो. दरवर्षी साधारणतः ६००००० पाळीव प्राणी दत्तक घेतली जातात. याचे कारणही रोचक आहे. कुत्रा हा मालकासाठी जगत असतो तर मांजर त्या घरासाठी. कुत्रा हा मालक जाईल तिकडे जातो, पण मांजर आपल्या मनाप्रमाणे वागणं पसंत करते. म्हणूनच कुत्रा हा पहिली पसंत असतो. 

कुत्र्याच्या अनेक सवयी आपल्याला ओळखीच्या आहेत. जसे की शेपूट हलवणे, मान तिरकी करून बघणे, धावत्या कारच्या मागे धावणे, इत्यादी. अशीच एक सवय म्हणजे, झोपण्यापूर्वी गोल फिरणे. कुत्रा झोपताना नेहमी त्या जागेभोवती गोल फिरतो आणि मगच झोपतो. अगदी घरात जरी असेल तरीही तो नेहमीच्या जागेभोवती चक्कर मारतो आणि मगच झोपतो. 

आजचा आपला लेख कुत्र्याच्या  याच सवयीशी निगडित आहे. कुत्रा गोल फिरण्यामागे नेमकं काय कारण आहे हे सविस्तर समजून घेऊया. 

कुत्रा हा पूर्वी जंगली प्राणी होता. कालांतराने त्याला माणसाने आपल्या गरजेनुसार पाळीव बनवले. जसे मांजर, गाय, बैल, घोडा हे ही जंगली प्राणीच होते. जंगली प्राणी ते पाळीव प्राणी अशी उत्क्रांती झाली तरी प्राणी आपल्या मूळ जीवनशैलीतील काही शैली बदलू शकल्या नाहीत. कुत्रा जरी माणसाळला तरीही त्याच्या जंगलातल्या काही सवयी तशाच राहिल्या. यापैकी झोपताना गोल फिरून ती जागा सुरक्षित आहे की नाही हे तपासणे ही सवय तशीच राहिली.

हे कारण गृहीत धरले तर असं  म्हणता येईल की, कुत्र्यांची ही सवय अनुवंशिक आहे. जंगलात राहताना सभोवती गवत, पाने, किंवा काटे असतात. त्यामुळे तिथे फिरल्यामुळे ते पायाने दाबली जाऊन सपाट होतात. त्यामुळे त्यावर झोपताना ती टोचत नाहीत.

बर्फाळ जागा असेल तर तिथे ती जागाही सपाट होते. याखेरीज गोल फिरताना ती जागा उकरून थोडी खोल केली जाते जेणेकरून त्या जागेत उब निर्माण व्हावी. आपण झोपताना अंथरूण व्यवस्थित करतो अगदी तसेच आहे हे.

किडे किंवा साप यांना घाबरवण्यासाठीही कुत्रे गोल फिरतात. आणखी एक सवय अशी की कुत्रे नाक वर करून झोपतात, कारण त्यांना झोपेतही सभोवतालचा गंध जाणवत राहतो. फिरताना ते ती जागा स्वतःची हक्काची आहे असाही एक संदेश देण्याचा प्रयत्न करतात.

प्राण्यांचे डॉक्टर सांगतात की, चार ते पाच फेऱ्या मारणे हे सामान्य आहे, परंतु त्यापेक्षा जास्त फेऱ्या मारत असेल तर त्या कुत्र्याला काहीतरी शारीरिक त्रास होत असेल हे समजावं. 

तर, कुत्रा गोलाकार फिरून मगच का झोपतो त्या मागे हे कारण आहे. यापुढे घरातला कुत्रा मऊ गादीवरही गोल फिरून झोपला तर आश्चर्य वाटायला नको.

लेख आवडल्यास नक्की शेयर करा.

 

लेखिका: शीतल अजय दरंदळे

 

आणखी वाचा:

सलग तीन वर्षे किताब मिळवणारी ही खरोखरी सर्वोत्कृष्ट श्वान होती?

कुत्रे चक्क गाणी गातात? ही गाणारी प्रजात ५० वर्षांनी पुन्हा कुठे आणि कशी सापडली आहे?

सबस्क्राईब करा

* indicates required