computer

७१ वर्षांचे राकेश आणि ६५ वर्षांच्या रश्मींची संपत्ती ४,४००कोटींनी वाढलीय. नक्की काय करतात हे दोघे? वाचा कंपनी आणि तिच्या प्रगतीची यशोगाथा!!

कुठलाही व्यवसाय करायचा असल्यास रिस्कही असतेच. आपला व्यवसाय यशस्वी होतो की नाही ही काळजी प्रत्येक व्यावसायिकाला असते. पण ज्याची दूरदृष्टी चांगली असेल तो यशस्वी ठरतो. आज आम्ही अश्याच एका जोडप्याच्या यशाची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्यांनी कोणीही विचार करत नसताना एक नवी कल्पना राबवली आणि आज ते अब्जाधीश आहेत. ही यशोगाथा आहे राकेश आणि रश्मी वर्मा यांची. राकेश वर्मा यांचे वय ७१ तर रश्मी या ६५ वर्षीय आहेत. त्यांच्या मॅप माय इंडिया या कंपनीमुळे त्यांचा चांगलाच फायदा झाला आहे. पाहूयात मॅप माय इंडिया कशी जन्माला आली.

९० च्या दशकात हे दोघे फिरायला गेले होते. तो परिसर नवीन होता, त्यामुळे त्यांना हवे ते ठिकाण बराच वेळ सापडत नव्हते. तेव्हा त्यांना डिजिटल नकाशाची कल्पना सुचली. हा स्मार्टफोनही नसण्याचा काळ होता. इंटरनेटचा वापर तर खूपच मर्यादित होता. अशा काळात या दोघांना डिजिटल मॅपिंगची कल्पना सुचली. तेव्हा डिजिटल मॅपिंग हा अगदी नवीन प्रयोग होता. हे शब्दही भारतात फारसे कोणाला माहित नव्हते.

पण राकेश आणि रश्मी यांनी तो प्रयोग करायचा ठरवले. त्यांनी मॅप माय इंडिया कंपनी सुरू केली. याला सीई इन्फो सिस्टीम म्हणूनही ओळखले जाते. मॅपिंगचे काम सुरुवातीला हाताने करावे लागत होते. हळूहळू तंत्रज्ञानाचा विकास झाला, त्यामुळे त्यांचे कामही वाढले. एका वर्षाच्या आत कोकाकोलाकडून त्यांना वितरकांचे मॅपिंग करण्याचे काम मिळाले. त्यानंतर Motorola, Ericsson, AB आणि Qualcomm सारख्या अजून नावे जोडली गेली. 2004 मध्ये त्यांनी भारताचा पहिला नकाशा प्लॅटफॉर्म सुरू केला. मॅप माय इंडिया कंपनीने ६० लाख किलोमीटरहून अधिक अंतराचा डिजिटल नकाशा तयार केला आहे.

MapmyIndia मर्सिडीज बेंझ, मारुती सुझुकी आणि भारती एअरटेल सारख्या ५,००० पेक्षा जास्त ग्राहकांना सेवा देते आणि सरकारतर्फे चालवल्या जाणार्‍या भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि भारतीय हवामान विभागासोबत भागीदारी करते.

नुकताच मॅप माय इंडियाच्या आयपीओला शेअर बाजारात धमाकेदार प्रतिसाद मिळाला. शेअर बाजारात त्याची इश्यू किंमत रु. १०३३ आहे. तो ३५ टक्क्यांनी वाढून ती पहिल्याच दिवशी १३९३.६५ रुपयांवर बंद झाला. पहिल्या दिवशी भावात ३५ टक्के वाढ झाली आणि कंपनीचा शेअर ५३ टक्क्यांच्या उसळीसह लिस्ट झाला होता. MapmyIndia च्या IPO ला बाजारातून प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने राकेश आणि रश्मी वर्मा यांची एकूण संपत्ती सुमारे $ ५८६ दशलक्ष म्हणजे ४,४०० कोटी रुपयांनी वाढली. गेल्या वर्षीही Map my India ने सुमारे २ अब्ज रुपये कमावले होते.

राकेश आणि रश्मी वर्मा यांनी १९९० च्या दशकात कंपनी सुरू केली तेव्हा गुगल नव्हते. राकेश वर्मा १९७० मध्ये इंजिनीअरिंग करण्यासाठी भारतातून अमेरिकेत गेले होते. तिथंच शिक्षण पूर्ण करून दोघांनी मोठ्या कंपनीत काम केलं. राकेश वर्मा जनरल मोटर्समध्ये वरिष्ठ अधिकारी होते, तर रश्मीने IBM मध्ये संगणक डेटाबेस तयार केला. त्यानंतर दोघेही भारतात परतले आणि त्यांनी आपले काम सुरू केले. आज त्यांच्यामप् कंपनीच्या मोठ्या नकाशामध्ये PhonePe, Flipkart, HDFC बँक, Airtel, MG Motors सारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. तसेच apple आणि अमेझॉन ही सुद्धा प्रमुख नावे आहेत. म्हणजेच Map my India भारताचे डिजिटल नकाशे आणि भौगोलिक डेटा या कंपन्यांना विकते.

राकेश आणि रश्मी यांची यशोगाथा खूप काही शिकवून जाते.आज त्यांचा कमावलेला पैसा दिसतो. पण २५ वर्षांपूर्वी त्यांनी जी कल्पना लढवून सत्यात आणली त्याचे कौतुक करावे तितके थोडे आहे.आता त्यांची कंपनी भारताच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्चस्व गाजवण्यास तयार आहे.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required