चमचा, खड्डा, सुरुंग आणि ३२ यार्डा रांगणे, ६ कैदी कसे पळून गेले जगातल्या एका अभेद्य तुरूंगातुन
एखाद्या हिंदी चित्रपटात तुम्ही अनेकदा हा सीन पाहिला असेल, तुरुंगामध्ये असणारे कैदी एक बोगदा खणतात आणि त्यातून बाहेर पळून जातात. बघायला जरी गंमत वाटत असली तरी हे असे प्रत्यक्षात झालं आहे यावर विश्वास ठेवणे थोडे कठिण जाईल. पण ही घटना नुकतीच घडली आहे आणि तीही सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तुरुंगात!
इस्रायलच्या सर्वात सुरक्षित तुरुंगातून सहा पॅलेस्टिनी कैदी पळून गेले आहेत. यांना पकडण्यासाठी इस्रायली पोलिस शोधमोहीम राबवत आहेत. उत्तर इस्त्रायलमधील गिलबोआ कारागृह सर्वात सुरक्षित समजले जाते. तिथेच ही घटना घडली आहे. त्यामुळे तिथे बरीच खळबळ उडाली आहे. त्या भुयाराचा फोटो आणि व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.
हे पॅलेस्टिनी कैदी गेल्या अनेक महिन्यांपासून जेलमध्ये एक बोगदा खोदत होते. हा बोगदा थेट तुरुंगाबाहेर जाणारा होता. त्याच बोगद्यातून रात्री ते बाहेर आले आणि पळून गेले. या कैद्यांनी बाथरूमच्या आत हे भुसार खणायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी गंजलेल्या चमच्यांचा वापर केला. हे चमचे एका ठिकाणी लपवलेले होते. काही शेतकऱ्यांनी त्यांना शेतातून पळताना पाहिले तेव्हा इस्रायली अधिकाऱ्यांना हे कैदी पळून गेले आहेत याची माहिती मिळाली. त्यांनतर कारागृहातील कर्मचाऱ्यांनी कैद्यांची मोजणी केली तेव्हा त्यात सहा जण कमी होते.
पळून गेलेल्या कैद्यांपैकी पाच इस्लामिक जिहादचे सदस्य आणि पॅलेस्टिनी अतिरेकी गट अल-अक्सा शहीद ब्रिगेडचे माजी नेते होते. इस्त्रायली नागरिकांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी या सहा जणांपैकी पाचजण जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. यातील एक कैदी तर अट्टल खुनी होता, त्याच्यावर दोन डझन खुनाचे खटले चालू होते. कैद्यांना पकडण्यासाठी काम करणाऱ्या इस्रायली सुरक्षा पोलीस आणि लष्कराच्या जवानांनी तातडीने पावले उचलत वेस्ट बँक पासून किंवा जॉर्डनपर्यंत सर्व रस्ते बंद केले आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी सार्वजनिक सुरक्षा मंत्री ओमर-बार-लेव्ह यांना याबाबत कडक शोधमोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की पॅलेस्टिनी कैद्यांनी तुरुंगाबाहेरच्या लोकांशी संपर्क साधला आसवा त्यामुळे त्यांना बाहेरूनही मदत मिळाली. त्यांनी यासाठी मोबाईलचा वापर केला असण्याची शक्यता आहे. याच्या उलट, दुसरीकडे आनंदोउत्सव साजरा केला जात आहे .गाझामधील इस्लामिक जिहादच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून चॉकलेटचे वाटप केले. इस्लामिक जिहाद गटाने कैद्यांना साहसी सैनिक असे म्हणले आहे. पॅलेस्टिनी संघटना हमासच्या नेत्याने याला "एक मोठा विजय" असे म्हटले आहे
कुठल्याही तुरुंगातून असे कैद्यांचे पलायन म्हणजे सुरक्षा यंत्रणेला एक धक्काच असतो. आता हे सहा कैदी सापडतात का ते गुंगारा देण्यास यशस्वी होतात हे पाहाणे महत्वाचे ठरेल.
शीतल दरंदळे




