computer

भारताची ध्वज संहिता म्हणजे काय? काय आहेत झेंडा फडकावण्याचे नवीन नियम?


आता १५ ऑगस्ट जवळ येत आहे. सगळेच ७५ व्या स्वातंत्र्यदिनाची वाट पाहत आहेत. स्वातंत्रदिन साजरा करण्यासाठी ध्वजारोहण ही खूप महत्वाची प्रक्रिया आहे. या पंचाहत्ताराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारने ‘आझादी का अमृत मोहत्सव’ अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ ही जनमोहीम सुरु केली आहे. या चळवळीमुळे भारताच्या ध्वज संहितेमधील नियमांचे काटेकोरपणे पालन करून भारताच्या नागरिकांना आपल्या घरीदेखील ध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आपला तिरंगा हे आपल्या अभिमानाचं प्रतिक आणि सन्मानानीय राष्ट्रीय चिन्हांपैकी एक आहे. राष्ट्रध्वजाच्या वरच्या पट्टीवरील भगवा रंग देशाची शक्ती आणि धैर्य दर्शवतो. मध्यभागी असलेला पांढरा रंग आणि आशोकचक्र शांती आणि सत्याचे प्रतिक आहेत. तर खालच्या पट्टीवरील हिरवा रंग सुपीकता, समृद्धी आणि भूमीचे पावित्र्य दर्शवते.

भारताच्या ध्वज संहितेमध्ये २०२१ साली सुधारणा करण्यात आली आहे. या बदलांमुळे भारताच्या नागरिकांना त्यांच्या घरात, कार्यालयात, कारखान्यात फक्त राष्ट्रीय सणांनाच नाही, तर इतर दिवशी देखील ध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात आली. आता भारताचे नागरिक आपला राष्ट्रीय ध्वज अभिमानाने कुठेही फडकवू शकतात, अर्थातच यासाठी काही नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. आधी भारताचा ध्वज फक्त सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंतच फडकवण्याची परवानगी होती. ३० डिसेंबर २०२१ रोजी भारताच्या ध्वजसंहितेत काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले आणि ध्वज रात्रंदिवस फडकवण्याची परवानगी देण्यात आली. ध्वजसंहिता २०२१ मधील नियम खालील प्रमाणे आहेत.
• खराब झालेला, चुरगळलेला ध्वज फडकवू नये.
• पूर्वी ध्वज तयार करण्यासाठी हाताने विणलेले किंवा कातलेले कापड वापरले जाई, आता यंत्रावरती तयार केलेले कापडदेखील वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
• भारताचा ध्वज उलटा म्हणजेच भगवा रंग तळाशी असा फडकवला जाऊ नये.
• जेव्हा ध्वज फडकवला जातो तेव्हा ध्वजापेक्षा जास्त किंवा त्याच उंचीवर किंवा शेजारी दुसरा कोणताही ध्वज फडकवू नये.
• तिरंग्यावारती कोणत्याही प्रकारची फुले, हार, गुच्छ लाऊ नयेत.
• तिरंगा कोणत्याही परिस्थितीत जमिनीला स्पर्श करता कामा नये.
• एकाच ध्वजरोहणाच्या खांबावरती तिरंग्यासोबत दुसरा कोणताही झेंडा फडकावता येणार नाही.
• भाषणाच्या वेळी भारताचा झेंडा टेबलवरती डेकोरेशन म्हणून वापरता येणार नाही.
• तिरंग्याच्या डिझाईनचे कोणत्याही प्रकारचे कपडे, गणवेश किंवा ॲक्सेसरीज हे कंबरेच्या खाली घालता येणार नाहीत. ‎तसेच नक्षीकाम केलेले किंवा छापील कुशन, रुमाल, नॅपकिन, अंतर्वस्त्रे किंवा राष्ट्रध्वजापासून तयार केलेल्या कोणत्याही ड्रेस मटेरियलचा वापर करणे नियमबाह्य आहे.‎
• नवीन संहितेनुसार तिरंगा घराच्या मोकळ्या जागेत रात्रंदिवस फडकवता येणार आहे.

आपल्या गाडीवरती राष्ट्रीय ध्वज कोण फडकवू शकतो?
• ‎राष्ट्रपती
• ‎उपराष्ट्रपती
• ‎गव्हर्नर आणि लेफ्टनंट गव्हर्नर‎
• ‎भारतीय मिशन पोस्टचे प्रमुख‎
• ‎पंतप्रधान‎
• ‎कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि केंद्रीय उपमंत्री‎
• ‎एखाद्या राज्याचे किंवा केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री‎
• ‎लोकसभा अध्यक्ष,‎
• ‎राज्यसभेचे उपसभापती,‎
• ‎लोकसभा उपाध्यक्ष,‎
• ‎राज्यांमधील विधान परिषदांचे अध्यक्ष,‎
• ‎राज्यांतील विधानसभांचे वक्ते आणि‎
• ‎केंद्रशासित प्रदेश,‎
• ‎राज्यांमधील विधान परिषदेचे उपसभापती,‎
• ‎राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील विधानसभांचे उपसभापती‎
• ‎भारताचे सरन्यायाधीश‎
• ‎सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश‎
• ‎उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश‎
• ‎उच्च न्यायालयांचे न्यायाधीश‎

आपला ध्वज आपला अभिमान आहे आणि त्याचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही याची काळजी घेणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. 'हर घर तिरंगा' उपक्रम साजरा करताना आपण हे सर्व नियम लक्षात ठेवायला हवेत.

सबस्क्राईब करा

* indicates required