मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधल्या एक फॉंटनं नवाझ शरीफ सरकारचं भवितव्य धोक्यात आणलंय.. हे त्याचं कारण आहे..

आता मायक्रोसॉफ्ट वर्डमधला एक फॉण्ट बिचारा करून करून असं काय करू शकतो की ज्यामुळं सरकारच कोसळायची वेळ येईल?
पण असं होऊ घातलंय मंडळी... प्रकरण आहे नवाझ शरीफांनी देशाबाहेर केलेल्या बेकायदेशीर गुंतवणूकीचं. पनामा कागपत्रं एप्रिल २०१६ मध्ये लीक झाली आणि शरीफांची ही जादा मालमत्ता जगाला कळाली. या मालमत्ता नवाझ शरीफांच्या तीन मुलांच्या नावानं आहेत आणि कुटुंबाची मालमत्ता जाहीर करताना त्यांत या प्रॉपर्टींचा समावेश केला गेला नव्हता. त्यामुळं सध्या पनामा कागदपत्रांच्या आधारे नवाझ शरीफांची चौकशी चालू आहे!!
ही चौकशी करणाऱ्या समितीला नवाझ शरीफांच्या कन्यारत्नानं-मरियमनं- काही कागदपत्रं सादर केली आहेत. तो दस्ताऐवज लिहिला गेलाय कॅलिबरी नावाच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधल्या फॉंटमध्ये. गंमत म्हणजे ही कागद्पत्रं २००६ सालातली म्हणून सादर करण्यात आली आहेत, पण तेव्हा हा कॅलिबरी फॉंटच मुळात जनतेच्या वापरासाठी उपलब्धच नव्हता.
(मरियम नवाझ -- स्रोत)
चौकशी समितीनं ही कागदपत्रं खोटी म्हणून जाहिर केली आहेत आणि यासाठी त्यांनी या फॉंटच्या विकीपानाचा आधार घेतलाय. या पानावर लिहिल्याप्रमाणं कॅलिबरी फॉंट २००४मध्ये अस्तित्वात आला पण सर्वसामान्यांना वापरण्यासाठी २००७नंतर खुला करण्यात आला.
पाकिस्तानच्या जनतेनं आणि विशेषत: ट्विटरकरांनी या घटनेचा चांगलाच समाचार घेतलाय आणि #fontgate या हॅशटॅगनं भरपूर् धुमाकूळ घातलाय.. कुणी म्हणतं आहे कॅलीबरला राष्ट्रीय फॉंट म्हणून घोषित करा तर कुणी म्हणत आहे, "इन लोगोंका कॅलिबरी ही नहीं है ये देश चलानेका"..
पाहिलंत, कितीही सफाईदार खोटं बोललं तरी सत्य नक्की कुठल्या रूपानं बाहेर पडेल काही सांगता येत नाही.. हो ना?