computer

न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदाच एका भारतीयाची वर्णी....कोण आहेत त्या जाणून घ्या !!

२१ वे शतक भारताचे आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हे वाक्य पाऊलोपाऊली सिद्ध करणारे अनेक कर्तृत्ववान भारतीय जगभर आहेत. जगात असे एकही क्षेत्र नसेल जिथे भारतीयांचा वरचष्मा नाही. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासारखे भारतीय जगातल्या सर्वात बलाढ्य कंपन्यांच्या मुख्य स्थानी बसले आहेत.

नुकतीच हावर्ड बिझनेस स्कूलच्या डीनपदी आपले मराठमोळे श्रीकांत दातार यांची नियुक्ती झाल्याची बातमी आली होती. आता या यादीत अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. न्यूझीलँडच्या मंत्रीमंडळात तरुण तडफदार भारतीय तरुणी प्रियंका राधाकृष्णन यांची मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे.

कोरोनाला हरवणारा देश म्हणून प्रसिद्ध झालेला न्यूझीलँड हा देश जेसिंडा अरडर्न या महिलेच्या नेतृत्वाखाली मोठी उंची गाठत आहे. याच अरडर्न यांच्या मंत्रिमंडळात सामाजिक विकास आणि रोजगार मंत्रीपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. 

प्रियांका यांचा जन्म चेन्नई येथे झाला आहे. त्यांचे कुटुंबीय आजही चेन्नईलाच राहतात. सिंगापूरला उच्च शिक्षण घेतल्यावर आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या रिचर्ड यांच्यासोबत लग्न करून त्या न्यूझीलँडमध्ये स्थायिक झाल्या होत्या. तिथे महिला आणि इतर घटकांसाठी काम करत असताना प्रियंका यांचा राजकारणात प्रवेश झाला.

२०१७ साली त्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. तीनच वर्षात त्यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. विशेष गोष्ट म्हणजे न्यूझीलँडमध्ये पहिल्यांदाच एखाद्या भारतीय व्यक्तीची मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे. जगभर आपल्या कर्तृत्वाचा झेंडा रोवणाऱ्या प्रियंका यांच्यासारख्या भारतीयांमुळे भारत जागतिक नकाशावर अभिमानाने झळकत आहे हे निश्चित...

उदय पाटील

सबस्क्राईब करा

* indicates required