computer

सिनेमाचा खरा शोधकर्ता, त्याचा गूढ मृत्यू आणि त्याचा प्रतिस्पर्धी एडिसन यांच्याभोवतीचं विशाल रहस्य!!

रुपेरी पडद्याबद्दल सामान्यजनांना कुतूहलमिश्रित आकर्षण आहे. लहानपणी पडद्यावरची हालतीचालती चित्रं खरी वाटतात, तर मोठेपणी अनेकजण या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची स्वप्नं बघतात. या आभासी जगाशी समरस होणाऱ्यांची, त्यातून स्वतःचं मनोरंजन करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. पण मनोरंजनाचं हे जग ज्यांच्यामुळे अनुभवता येत आहे त्याचं खरं श्रेय कुणाचं? आपल्याला ज्यांची नावं माहिती आहेत ते खरोखर मोशन फिल्म तंत्राचे जनक आहेत की त्यांनी काही चापलुसी करून इतर कुणाचं क्रेडिट ढापलं आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न.

चालत्याबोलत्या चित्रांचा आणि सिनेमाचा शोधकर्ता म्हणून साऱ्या जगभर थॉमस एडिसन आणि ल्युमियेर बंधुंच्या नावाचा बोलबाला आहे. यासाठी जगाने त्यांना डोक्यावर घेतलं. साहजिकच आहे, त्यांच्यामुळे लोकांना मनोरंजनाचं नवं दालन खुलं झालं होतं. या तिघांनीही मिळणारा मानसन्मान यथेच्छ उपभोगला. पण म्हणून त्यांना जे श्रेय मिळालं होतं त्यावर त्यांचा खरोखर हक्क होता का? अनेकांच्या मते याचं उत्तर 'नाही' असं आहे, कारण याचं खरं श्रेय दुसऱ्याच एका संशोधकाचं होतं. पण स्वामित्व हक्काबद्दलचं युद्ध जिंकून ही त्रयी शिरजोर झाली होती. तिकडे ज्याने सिनेमाचा, मुख्यतः मोशन फिल्म टेक्नॉलॉजीचा, शोध लावला होता तो बाजूलाच राहिला.

एडिसनच्या नावावर अनेक शोध आहेत. एकेका संशोधनासाठी त्याने घेतलेली मेहनत आणि त्याविषयीचे किस्से तर जगजाहीर आहेत. पण म्हणून त्याला इतर कुणी केलेल्या संशोधनावर दावा सांगण्याचा अधिकार नक्कीच नव्हता. मोशन पिक्चरचा शोध आपलाच असं छातीठोकपणे सांगत त्याने पेटंटच्या युद्धात बाजी मारली, तरी हे युद्ध म्हणजे हिमनगाचं टोक होतं. तळाशी मात्र अनेक गोष्टी दडलेल्या होत्या. सगळ्यात भयानक म्हणजे लुई ले प्रिन्स(Louis Le Prince) नावाचा संशोधक यानंतर अचानक रहस्यमयरित्या नाहीसा झाला. एडिसनच्या प्रतिस्पर्ध्यांना लुईसच्या गायब होण्यामागे एडिसनचा हात असण्याची शक्यता वाटत होती. हे असंच घडलं की नाही याला ठोस पुरावा नसला तरी संशयाची सुई एडिसनकडे वळत होती.

पण खुद्द एडिसनला ज्याने स्पर्धा निर्माण केली तो लुई ले प्रिन्स होता तरी कोण?

लुई ऑगस्टीन ले प्रिन्सचा जन्म १८४१ मध्ये झाला. त्याचे वडील एक उच्चपदस्थ अधिकारी होते. म्हणूनच की काय त्याच्या वडिलांची अनेक क्षेत्रातील नामवंतांशी घनिष्ठ मैत्री होती. लुइस डागेह हा यापैकीच एक. या डागेहने फोटोग्राफीच्या क्षेत्रात अनेक प्रयोग केले होते. फोटोची प्रिंट घेताना निगेटिव्हचा वापर न करता थेट चांदीचा थर दिलेल्या तांब्याच्या पत्र्यावर डीटेल्ड इमेज घेण्याचं तंत्र त्याने शोधून काढलं होतं. या प्रोसेसची लहानग्या ले प्रिन्सला भुरळ पडली आणि त्याने त्याच्याकडून रसायनशास्त्र आणि फोटोग्राफी शिकण्यास सुरुवात केली. या प्रक्रियेच्या तो इतका प्रेमात होता, की त्याने पुढे पेंटिंग आणि केमिस्ट्री शिकणं सुरूच ठेवलं. शिक्षण संपल्यानंतर त्याने लंडनला जाऊन रंगछटा आणि छायाचित्रण या दोन्ही विषयात विशेष ज्ञान मिळवलं. नंतर तो अमेरिकेला रवाना झाला.

१८८० च्या दरम्यान ले प्रिन्सला एका तंत्रात रस निर्माण झाला. ते म्हणजे हालती चालती चित्रं. यामागचं लॉजिक तसं सोपं होतं. चित्राचा जो भाग हलताना दाखवायचा त्याची अगदी थोडी थोडी हालचाल करून प्रत्येक पोझिशनचे फोटो घ्यायचे आणि हे फोटो जलद फिरवून गतीचा आभास निर्माण करायचा. या परिणामाला दृष्टीसातत्य असं नाव आहे. यातूनच पुढे १८८६ मध्ये सोळा लेन्सेस असलेल्या कॅमेऱ्याची कल्पना सुचली. हा कॅमेरा सुरुवातीच्या कॅमेऱ्यांपेक्षा कैक पटीने सरस होता. यामध्ये मूव्हिंग पिक्चर कॅमेरा आणि प्रोजेक्टर दोन्हींचा उपयोग केलेला होता. पुढे यातूनच सिंगल लेन्स सिनेकॅमेरा तयार झाला. हा कॅमेरा आजही सिनेमाच्या इतिहासातला महत्त्वाचा शोध मानला जातो. या कॅमेऱ्याच्या साह्याने त्याने काही शॉर्ट फिल्म्स चित्रित केल्या. शिवाय त्याचा मुलगा ऍकॉर्डीयन वाजवतानाचा व्हिडीओही शूट केला.

प्रयोगाची, त्यासाठीच्या संशोधनांची आणि त्यातून होणाऱ्या निर्मितीची एकेक शिखरं सर करत असताना या प्रवासाला चांगलाच ब्रेक लागला. सप्टेंबर १८९०मध्ये ले प्रिन्स गूढमय पद्धतीने गायब झाला. हे कसं झालं? कुणी घडवून आणलं का? असेल तर ती व्यक्ती कोण? आणि मुख्य म्हणजे हे सगळं कशासाठी? या प्रश्नांची ठोस उत्तरं अज्ञातच आहेत. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यावेळी प्रिन्स त्याच्या सिंगल लेन्स कॅमेऱ्याचं प्रात्यक्षिक द्यायला सज्ज झाला होता. त्याचं हे तंत्रज्ञान आणि सिनेमे पहिल्यांदाच सामान्य नागरिकांसमोर येणार होते. यामुळे एडिसनने केलेल्या नवीन पिक्चरच्या संशोधनाच्या दाव्याला मोठा धक्का बसला असता.

ले प्रिन्स त्याच्या भावाला भेटण्यासाठी डीजॉनला गेला आणि १६ सप्टेंबरला पॅरिसला जाण्यासाठी म्हणून ट्रेनमध्ये चढला. पण तो पॅरिसला पोहोचलाच नाही. ना तो कुठे सापडला, ना त्याचं सामानसुमान. सगळंच जणू वाऱ्याबरोबर उडून गेल्यासारखं गायब झालं. ट्रेनच्या ज्या डब्यात तो चढला होता त्या डब्यातील प्रवाशांनीही त्याला बघितल्याची कबुली दिली नाही. नक्की काय झालं होतं याबद्दल कुणालाही कल्पना नाही.

त्याच्या रहस्यमयरित्या गायब होण्याबद्दल काही प्रवाद आहेत. त्यातील एक म्हणजे त्याने दिवाळखोरीला वैतागून आयुष्याचा शेवट केला. अजून एक म्हणजे तो बुडून अपघाती मरण पावला. या गोष्टीला मात्र थोडी का होईना; पुष्टी मिळते. २००३ मध्ये संशोधकांनी एका बुडालेल्या फ्रेंच माणसाचा फोटो ओळखला होता. ही घटना ले प्रिन्स गायब झाल्याच्या काळातील होती. सकृतदर्शनी तरी या गोष्टीवर विश्वास बसतो, पण त्याचं सामान कसं गायब झालं किंवा त्यावेळच्या प्रवाशांपैकी कुणालाही ट्रेनमधून कुठली व्यक्ती बाहेर पडल्याचं कसं दिसलं नाही, हे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. याबाबतीत अजून एक थिअरी समोर आली ती म्हणजे त्याच्या नाहीसं होण्यामागे खुद्द थॉमस एडिसनचाच हात होता. मोशन पिक्चरचा आपणच संशोधक आहोत हे जगावर ठसवण्यासाठी त्याचा मूळ संशोधक असणाऱ्या ले प्रिन्सचा काटा काढण्याची एडिसनची योजना होती. त्यामुळे संशोधनाचे स्वामित्व हक्क आणि घसघशीत रॉयल्टी हे आयतंच एडिसनचं झालं असतं.

रहस्यांचा हा सिलसिला इथेच थांबला नाही. केसच्या निकालानंतर दोन वर्षांनी ले प्रिन्सच्या मुलाचा संशयास्पदरित्या गोळी लागून मृत्यू झाला. हीही केस 'अनसॉल्व्ह्ड' म्हणून बंद झाली.

ले प्रिन्सचं नेमकं काय झालं हे आपल्याला कधीही कळणार नाही. पण म्हणून त्याच्या संशोधनाचं मोल कमी होत नाही. या प्रकरणाने एडिसनसारख्या जागतिक कीर्तीच्या संशोधकाकडेही संशयाची सुई वळली ते वेगळंच. त्यामुळे पेटंटच्या लढाईत जिंकूनदेखील एडिसन हरला असं अनेकांचं मत आहे. तुम्हाला काय वाटतं?

स्मिता जोगळेकर

सबस्क्राईब करा

* indicates required