computer

एका मुलीच्या अपहरणातून सुरु झालेली आणि शेकडो मुलांना सुरक्षित करणारी अँबर ॲलर्ट संकल्पना काय आहे?

एखादया दुर्घटनेचा समाजावर इतका परिणाम होतो की परत तसे घडू नये म्हणून त्यातून नवा बदल जन्माला येतो. अर्थात, त्या कुटुंबाला त्यांनी गमावलेल्या व्यक्तीला परत मिळवता येत नाही, पण अशी वेळ परत कोणावर येऊ नये म्हणून त्या कुटुंबातली व्यक्तीच पुढाकार घेऊन नवा आदर्श निर्माण करते. आज अशाच एका घटनेची महिती करून घेऊयात त्यामधून AMBER अलर्ट सिस्टीम जन्माला आली. अँबर ॲलर्ट ही लहान मुलांना पळवून नेण्याबाबतच्या घटनेचा इशारा देणारी संकल्पना आहे. आज आपण या ॲलर्ट मागची खरी कहाणी जाणून घेऊयात..

ही घटना अंबर हॅगर्मन या ९ वर्षांच्या मुलीची आहे. ती आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत आर्लिंग्टन, टेक्सासमध्ये राहत होती. ती गर्ल स्काऊट्समध्ये होती. ती आणि तिचा ५ वर्षांचा भाऊ रिकी या दोघांना एकत्र सायकल चालवायला आवडायचे. १३ जानेवारी १९९६ रोजी अंबर हॅगर्मन तिची सायकल चालवत होती. तितक्यात काळ्या रंगाच्या पिकअप ट्रकमधून एक माणूस बाहेर पडला, त्याने अंबरला जबरदस्तीने पकडून ट्रकच्या कॅबमध्ये भरले. ती किंचाळली, तिने अपहरणकर्त्याला लाथा मारल्या. पण काही उपयोग झाला नाही. तो ट्रक गायब झाला. अंबरचे अपहरण झाल्याचे पाहून काही वेळातच पोलिसांना फोन केला गेला. ५० हून अधिक पोलीस अधिकारी आणि फेडरल एजंट अंबरचा शोध घेत असूनही त्यांना काही सापडले नाही. पाच दिवसांनंतर एका वाटसरूला अंबरचा मृतदेह पार्किंगपासून अंदाजे चार मैलांवर सुजलेल्या अवस्थेत एका खाडीत सापडला. तिचा गळा कापला होता. अंबरचे पालक, डोना व्हिटसन आणि रिचर्ड हॅगर्मन यांना जबरदस्त धक्का बसला. त्यांनी खुन्याला शोधण्यासाठी पोलिसांसोबत सगळे प्रयत्न केले. पण आजपर्यंत अंबरला न्याय मिळाला नाही. आर्लिंग्टन परिसरातील गुप्तहेर त्यांना अधूनमधून टिप्स देतात. जे घडले ते फक्त एका व्यक्तीने पाहिले. पण त्यानंतर काही प्रगती झाली नाही.

अंबर हॅगर्मनच्या अंत्यसंस्कारानंतर थोड्याच दिवसांत तिच्या आईला डोना सिमोनला एका स्थानिक रेडिओ स्टेशनवर बोलावण्यात आले. तेव्हा तिला कल्पना सुचली की जसे स्थानिक माध्यम हवामानाच्या सूचना पाठवतात तसेच अपहरण केलेल्या मुलांसाठीही सूचना किंवा अलर्ट करू शकतात. जसं राष्ट्रीय हवामान सेवा खराब हवामानासाठी इशारा जारी करते, तसाच इशारा मुलं अपहरण झाल्यास मिळाला तर कितीतरी मुलं वाचतील. डॅलस-फोर्ट वर्थ परिसरातील ब्रॉडकास्टर्सने हे सुरू केले आणि १९९६ पासून एम्बर हॅगरमनच्या नावावर असलेली AMBER अलर्ट प्रणाली देशभरात सुरू झाली.

AMBER अलर्ट कसे कार्य करते? एखादी अपहरणाची केस पोलिसांकडून निश्चित झाल्यावर ते अधिकारी प्रसारकांना आणि राज्य परिवहन संस्थांना सूचित करतात. त्या प्रमाणे अलर्ट जारी होतात. ते अलर्ट पूर्ण राज्यात वाहतुकीच्या चिन्हांवर दिसतात, डिजिटल होर्डिंगवर दिसतात आणि सेल फोनवर संदेश म्हणूनही येतात. त्यामुळे सगळीकडे बातमी पसरते. डिसेंबर २०१५पर्यंत अंबर अलर्ट सिस्टीममुळे ८००हून अधिक मुले सुरक्षित सापडली आहेत. अधिकाऱ्यांनी अम्बर ॲलर्ट जारी केल्याचे लक्षात आल्यावर अपहरणकर्त्यांना मुलांना सोडणे भाग पडते नाहीतर तर पकडले जातात.

या घटनेच्या २० वर्षांनंतर २०१६ मध्ये एका मुलाखतीत अंबरची आई म्हणाली, “जर अंबर बेपत्ता झाल्यावर आम्हाला सतर्क केले असते तर काय झाले असते. माझी मुलगी नक्की माझ्याकडे परत आली असती. त्यामुळे अलर्टकडे दुर्लक्ष करू नका." AMBER Alerts लोकांना मुलांच्या अपहरणाच्या सर्वात गंभीर प्रकरणांबद्दल जागरुक करतात. AMBER अलर्ट एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये देता येऊ शकतात.मुलांच्या अपहरण प्रकरणांमध्ये प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. AMBER अलर्ट ऐकताच किंवा पाहताच प्रत्येक जण सतर्क होतो कारण एखाद्या लहानग्याचा जीव वाचवण्यासाठी ते अतिशय महत्वाचे असते.

घटना अमेरिकेत घडली असली तरी हा ॲलर्ट बऱ्याच देशांनी अवलंबला आहे. युरोपातले बरेचसे देश, कॅनडा, मेक्सिको,ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इक्वॅडोर, रशिया यांसारख्या देशात ही प्रणाली वापरली जाते आणि ती बरीच उपयोगीही ठरली आहे.

सबस्क्राईब करा

* indicates required