computer

अन्वर कोंगो - कधीच कायद्याच्या कचाट्यात न सापडता हजारो हत्या करणारा माणूस !

शेजारच्या एखाद्या 'रिटायर्ड अंकल' टाईप दिसणारा हा माणूस एकेकाळी हजारो लोकांचा काळ होता हे सांगून विश्वास बसणार नाही. 
कोण आहे हा माणूस ? याचं नाव अन्वर कोंगो - इंडोनेशियाच्या उजव्या बाजूला अती जहाल पक्षाचा 'काँट्रॅक्ट किलर'- त्यांच्या डेथ स्क्वाडचा प्रमुख !
अन्वर आणि त्याचा मित्र आदी झुलकाद्री त्यांच्या बालपणापासूनच गुन्हेगारीकडे वळले. आधी खंडणी वसूली -हप्तेबाजी पासून त्यांच्या गुन्ह्याच्या करियरला सुरुवात झाली. त्यानंतर काही वर्षातच भाडोत्री खूनी म्हणून त्यांनी नाव मिळवलं.हॉलीवूडचे माफीया चित्रपट बघून त्याने हाच आपल्यासाठी योग्य मार्ग आहे असं ठरवलं आणि त्यानंतर इंडोनेशियात माफीयाच्या धर्तीवरच कामाला सुरुवात केली.

नंतरच्या काहीच वर्षात म्हणजे १९६५-६६ साली इंडोनेशियाची सूत्र लष्करशाहाच्या हात गेली.नव्या लष्करशहांचा एक कलमी कार्यक्रम होता कम्यूनिस्ट पक्षांच्या सदस्यांना कायमचे संपवणे. कम्युनिस्टांसोबत अल्पसंख्य वंशांच्या  जामती पण संपल्या.या इतिहासाच्या कालखंडाला 'पर्ज'म्हणून ओळखले जाते.
हे घृणास्पद काम करायला अन्वर आणि आदीसारखे लांडगे लष्कराने पाळले.सावजाच्या गळ्याभोवती तारीचा फास आवळून त्याची हत्या करणे ही अन्वर कोंगोची आवडती पध्दत होती असे सांगितले जाते. अशा हजारो हत्या या दरम्यान त्याने केल्या. 
या 'पर्ज'च्या कालखंडात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या ५ ते १० लखाच्या घरात होती. बलात्कार- छळ- शिरच्छेद - गावच्या गावं जाळून भस्मसात करणे हे रोजच त्या कालखंडात घडत होते.या सगळ्या लांच्छनास्पद कामत  अन्वर कोंगो आणि त्याचे साथीदार अग्रेसर होते. 
काहीच दिवसात हे सगळे संपले आणि अन्वर पुन्हा त्याच्या जुन्या धंद्यात - म्हणजे लूटमार -खंडणीच्या धंद्यात आला.;पर्ज'च्या काळात कमावलेला लौकीक इतका मोठा होता की त्याच्या विरोधात जाण्याची कोणाचीच ताकद नव्हती.नंतरच्या काळात त्याच्या डेथ स्क्वाडचे रुपांतर पेमुदा पॅनकासिला या पक्षात झाले. त्याचे नेते होते सरकारमधील  मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकारी. निवडणूकींचे निकाल हवे तसे फिरवणे हेच या पक्षाचे काम होते.या पक्षाच्या तरुण वर्गाचे प्रतिनिधित्व अन्वर कोंगोच्या हातात असल्याने मरेपर्यंत कोणताही आरोप त्याच्यावर लावण्यात आला नाही.

कायद्याच्या कचाट्यात कधीच न सापडता त्याचा मृत्यू २०१९ साली झाला. मृत्यूपूर्वी काही वर्षं त्याने  The Act of Killing, नावाच्या एका डॉक्युमेंटरीत काम केले. त्याच्याच 'पर्ज' मधल्या हत्याकांडावर ही डॉक्युमेंटरी होती पण त्याने पर्जच्या एका बळीची भूमिका त्याने केली.ती भूमिका केल्यावर आपण इतके वर्‍शं काय करत होतो याचा पस्तावा होऊन तो ढसाढसा रडला पण वेळ हातातून निघून गेली होती.

सबस्क्राईब करा

* indicates required