ब्रूस लीचा मुलगा ब्रॅंडन याचा मृत्यु खोट्या बंदुकीच्या अपघातात झाला होता, नेमकं काय घडलं होते?
हॉलिवूड मालिका-सिनेमे खरे वाटावेत यासाठी ते जास्तीतजास्त ओरिजिनल वस्तूंचा वापर करतात. मग ती बिग बँग थेअरीतली भौतिकशास्रातली समीकरणे असोत किंवा हाणामारीच्या प्रसंगांतल्या बंदुका. अर्थात खऱ्या बंदुकीत गोळी मात्र नकली असते. मात्र 'रस्ट' या सिनेमाच्या शुटिंगवेळी एक प्रसंग शूट करत असताना निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.
ॲलेक बाल्डविन हा प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आहे. नुसता अभिनेताच नाही, तर तो लेखक, सिनेनिर्माता आणि एक जागरुक राजकीय कार्यकर्ताही आहे. हा ॲलेक गोळी चालवण्याचा सीन शूट करत होता. त्याच्या हातात असलेल्या प्रॉप गनने गोळी मारण्याच्या प्रसंगादरम्यान चालवलेली गोळीने या सिनेमाची सिनेमॅटोग्राफर हलिना हचिंस यांना लागली. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातच सिनेमाचे डायरेक्टर जोयल सुजा हेही आधी जखमी झाले होते आणि नंतर उपचार चालू असताना त्यांचाही यात मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे हॉलिवूड जगत मात्र हादरले आहे. ॲलेकला स्वतःलाही चांगलाच धक्का बसला आहे. यानिमित्ताने मात्र ३० वर्ष जुनी घटना मात्र पुन्हा चर्चेत आली आहे. १९९३ साली जगप्रसिद्ध अभिनेता ब्रूसलीचा तितक्याच ताकदीचा अभिनेता मुलगा ब्रॅण्डन ली याचा असाच मृत्यू झाला होता.
ब्रूसलीचा मुलगा म्हणून आधीच त्याच्याभोवती वलय होतं. त्यात तो स्वतः आपल्या काही सिनेमांमुळे आश्वासक अभिनेता म्हणून पुढे आला होता. यातच 'द क्रो' या सिनेमात तो काम करत होता. आजही 'द क्रो' या सिनेमाचे अनेक चाहते दिसतात. सिनेमाच्या शूटिंगमध्ये ब्रॅण्डनला एका सीनदरम्यान गोळी मारण्यात येते असा सीन शूट करायचा होता.
या सीनमध्ये मायकल मास्सी हा अभिनेता ब्रॅण्डनवर गोळी झाडतो. याच्याआधीच्या सीनमध्ये हीच प्रॉप गन वापरली होती. या प्रॉप गनमध्ये खोटी काडतुसे वापरतात. यातून पावडर आणि प्रायमर काढून घेण्यात येते. यावेळी ही सिनेमाची खोटी प्रॉपर्टी सांभाळणाऱ्या गटाने स्वतः खोटी काडतुसे बनविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गनपावडर तर काढून घेतली, पण प्रायमर मात्र तिथेच राहिले.
शूटिंगवेळी रिव्हॉल्व्हर चुकीच्या पध्दतीने बंद करून डिस्चार्ज करण्यात आली होती. यामुळे शिल्लक प्रायमरमध्ये एखाद्याला जखमी करण्याइतकी ताकद राहिली. दुर्दैवानेक्रू मेम्बर्सने ही गोष्ट नोटीस केली नाही किंवा याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा खरोखर शूटिंग झाले तेव्हा ब्रॅण्डनवर १२ ते १५ फूट एवढ्या दुरून गोळ्या झाडण्याचा प्लॅन होता.
मास्सीने जेव्हा गोळी चालवली तेव्हा ती लोडेड गन ज्या फोर्सने झाडली जाते त्याच फोर्सने झाडली गेली. २८ वर्षीय ब्रॅण्डनला गोळी लागल्यावर मागच्या बाजूला पडायचे अशी स्क्रीप्ट होती. पण तो पुढच्या बाजूला पडला. लोकांना वाटले तो अजूनही ऍक्टिंग करतोय. तो जखमी झाल्याचे समजल्यावर ब्रँडन लीला दवाखान्यात नेण्यात आले. अनेक तास त्याच्यावर उपचार सुरू होते. पण शेवटी त्याला मृत घोषित करण्यात आले. आपल्या बाबाप्रमाणेच तो ही अल्पावधीत नाव गाजवून जगाला अलविदा करुन निघून गेला. ब्रूसली प्रमाणेच ब्रँडन लीचा मृत्यूही लोकांना पचणे सोपे नव्हते. त्याच्याही मृत्यूभोवती आजही अनेक थियऱ्या मांडल्या जातात.
मास्सी मात्र या प्रसंगाने पुरता हादरून गेला होता. तो वर्षभर सिनेमांपासून दूर होता. तर २०१६ ला तो वारला तोवर त्याने 'द क्रो' हा सिनेमा पाहिला नव्हता. नुकत्याचा झालेल्या घटनेतही साहाय्यक दिग्दर्शकाने ही गन तपासणे अपेक्षित होते आणि त्यात निष्काळजीपणा झाल्याने दोन मृत्यू झाले, लोकांना मानसिक धक्के आणि तणावांनाही सामोरे जावे लागले. काही असो, हे बळी हकनाक होते हे निश्चित!!
उदय पाटील




