computer

नगरच्या या पट्ठ्याने नागाचा वापर करून आपल्या मृत्यूचा बनाव का रचला? समजावून घेऊया पूर्ण प्रकरण

नुकतीच तुम्ही 'नागाकडून बायकोचा खून' ही धक्कादायक बातमी वाचली असेल. याच सापाचा वापर करुन एकाने स्वतःच्या मृत्यचा बनाव केल्याची अजून एक धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कैदेत टाकले आहे. त्याने असं का केलं आणि त्याला पोलिसांनी कसे पकडले याची सविस्तर माहिती करून घेऊयात.

प्रभाकर भीमाजी वाघचौरे असे त्या पठ्ठ्याचे नाव आहे आणि त्याचे वय आहे ५४ वर्षं. त्याने ५ मिलियन म्हणजे ३७.५ कोटी रुपये जीवन विम्याची रक्कम मिळविण्यासाठी असे डोके चालवले. आणि स्वत:चा मृत्यू घडवून आणण्यासाठी “हत्येचे शस्त्र” म्हणून नाग वापरण्याचा प्रयत्न केला. त्याला या कामात साथ देण्यासाठी चार साथीदार ही होते, त्यांनाही आता अटक झाली आहे.

प्रभाकर भीमाजी वाघचौरे हा मनुष्य गेल्या २० वर्षांपासून अमेरिकेत राहत होता आणि यावर्षी जानेवारी महिन्यात भारतात परतला होता. भारतात आल्यावर तो अहमदनगरमधील राजूर गावात राहत होता. वाघचौरे यांचा मृत्यू झाल्याची बातमी राजूर पोलिस ठाण्याच्या अधिकार्‍यांना २२ एप्रिल रोजी परिसरातील स्थानिक सरकारी रुग्णालयातून मिळाली. वाघचौरे यांचा पुतण्या बनून कोणीतरी मृतदेहाची ओळख पटवली, तोही असून राजूर गावचा रहिवासी होता. मृत्यूचे कारण नागाचा दंश असल्याचे सांगण्यात आले. त्यांनतर अंत्यविधीसाठी मृतदेह त्या कथित पुतण्याच्या ताब्यात देण्यात आला.

परंतु पोलिसांना शंका आली, कारण वाघचौरे यांचा पुतण्या प्रवीण याचा कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याचे वृत्त पोलिसांच्या हाती लागले. याची पुष्टी झाल्यानंतर पोलिसांच्या तपासाला कलाटणी मिळाली. पोलिसांनी आरोपीचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि तो जिवंत असल्याचे त्यांना लक्षात आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.

आता प्रश्न राहतो की वाघचौरे म्हणून दाखवलेला मृतदेह कुणाचा होता? मग पोलिसांना कळले की त्यांनी साप वाचवणाऱ्यांकडून नाग खरेदी केला आणि वाघचौरेसारखा दिसणाऱ्या निराधार व्यक्तीला नागाच्या चाव्याने ठार केले. नवनाथ यशवंत ऐनप असे मृताचे नाव असून तो त्याच परिसरात राहत होता. वाघचौरे याने त्याच्या साथीदारांना ३५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आणि तोतया पुतण्या बनवून विमा कंपनीकडे पैशाची मागणी केली. विमा कंपनीने जेव्हा प्रत्यक्ष माणूस वाघचौरे यांच्या मृत्यूची चौकशीसाठी पाठवला तेव्हा काहीतरी गडबड आहे हे लक्षात आले आणि पोलिसांनी मोठ्या हुशारीने सत्य बाहेर आणून वाघचौरे आणि साथीदारांना अटक केली. पोलिस आता साप विक्रेत्यांवरही कारवाई करणार आहेत.

गुन्हा करणारा कितीही स्वतःला हुशार समजत असला तरी पोलीस त्याच्या अनेक पावलं पुढे असतात. हेच यातून सिद्ध होते.

शीतल दरंदळे

सबस्क्राईब करा

* indicates required